यापूर्वी जेव्हा ईशनिंदेच्या अपराधासाठी अथवा बिनबुडाच्या आरोपांमुळे वेठीस धरले गेलेले काफिर जीवाच्या भीतीने कळवळून क्षमायाचना करीत, तेव्हा त्याच्या जीवावर उठलेल्या क्रूरकर्म्यांना त्यांची क्षमायाचना बेगडी वाटे. ते शिक्षा बेदरकारपणे अमलात आणत. त्या क्रूरकर्म्यांना प्रोत्साहन देणारा तारिक मसूद आता वारंवार क्षमायाचना करतो आहे. हा नियतीने त्याच्यावर उगवलेला सूड आहे. ती शिक्षा त्याने आता भोगावी. आतापर्यंत पडलेल्या पायंड्यांप्रमाणे पाकिस्तानी न्यायालये त्याचे प्रलाप ऐकल्यावर ‘सर तन से जुदा’चीच शिक्षा देतील, हे नक्की!
तारिक मसूद हा पाकिस्तानी मुल्ला त्याच्या आक्रस्ताळ्या भाषणांसाठी प्रसिद्ध आहे. भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मांच्या विरोधात जेव्हा स्थानिक मुल्ला-मौलवींनी रान उठवले, त्या आगीत तेल ओतण्याचे काम आपल्या भडकाऊ भाषणांनी तारिक मसूदने केले होते. त्यावेळी तो भारतीय हिंदूंच्या डोळ्यात भरला होता. नुपूर शर्मांना ‘सर तन से जुदा’ची शिक्षा ठोठावणारा तारिक मसूदच होता. त्याच्यामुळे भारतातील भडकाऊ मुल्ला आणि अतिरेकी मानसिकतेच्या मुस्लिमांना अधिकच पाठबळ मिळाले. नुपूरजी आणि त्यांच्या कुटुंबीयांना अज्ञातवासात जावे लागले. त्यांना व्हॉट्सअॅपवर पाठिंबा दिल्यामुळे काही हिंदूंचे गळे कापण्यात आले आणि त्यांचे चित्रिकरण करून ते ई-माध्यमांमधून वितरित करण्याची विकृत मनोवृत्ती ते करणार्यांनी दाखवली. अशी विकृत मनोवृत्ती इतरांमध्ये जोपासणार्या मुल्ला तारिक मसूदवरच आता ईशनिंदेचा आरोप होऊन त्याला ‘सर तन से जुदा’ ला सामोर जावे लागते आहे. त्याला पळता भुई थोडी झाला आहे. त्याचे कारणही तसेच आहे.
अतिरेक्यांच्या दृष्टीने तारिक मसूदने अक्षम्य गुन्हा - गुस्ताकी केली आहे. तो पै. मुहंमदांच्या संदर्भात जे बरळला, त्यामुळे त्याच्या विरोधात पाकिस्तानात गदारोळ उठून अनेकांनी त्याला ‘सर तन से जुदा’ची शिक्षा ठोठावली. आता तारिक जीवाच्या भीतीने म्हणे लपून बसला आहे. त्याने चारवेळा ‘युट्यूब’वर ‘आवाम’ समोर माफी मागितली आहे. त्याने मनापासून क्षमायाचना - ‘तोबा तोबा’ करण्याची ग्वाही दिली आणि तसे करणार्याला अल्ला आणि त्याचे बाशिंदे माफ करतात, असा निर्वाळा दिला आहे. यापूर्वी जेव्हा ईशनिंदेच्या अपराधासाठी अथवा बिनबुडाच्या आरोपांमुळे वेठीस धरले गेलेले काफिर जीवाच्या भीतीने कळवळून क्षमायाचना करीत, तेव्हा त्याच्या जीवावर उठलेल्या क्रूरकर्म्यांना त्यांची क्षमायाचना बेगडी वाटे. ते शिक्षा बेदरकारपणे अमलात आणत. त्या क्रूरकर्म्यांना प्रोत्साहन देणारा तारिक मसूद आता वारंवार क्षमायाचना करतो आहे. हा नियतीने त्याच्यावर उगवलेला सूड आहे. ती शिक्षा त्याने आता भोगावी. आतापर्यंत पडलेल्या पायंड्यांप्रमाणे पाकिस्तानी न्यायालये त्याचे प्रलाप ऐकल्यावर ‘सर तन से जुदा’चीच शिक्षा देतील, हे नक्की.
तारिक मसूदचे प्रलाप
तारिकने एका मुल्ला-मौलवींच्या सभेत बोलताना सच्चा मुसलमानाला चीड येतील अशा विधाने केली. तो म्हणाला, “पै. मुहंमद निरक्षर (ILLETERATE)होते. कुराण हे व्याकरणदृष्ट्या चुकीचे पुस्तक आहे. अल्लानेही त्यात सुधारणा केली नाही. असे असल्याने आम्ही त्यांचे अनुयायित्व का पत्करावे? ते सुशिक्षित नव्हते. त्यांची (अरबी) संस्कृती वेगळी, भाषा आणि संस्कृती आपल्यापेक्षा अगदी वेगळ्या आहेत. (PAKISTAN UNTOLD).” इतके बोलूनच हे महाशय थांबले नाहीत. त्याने आपले अरबीचे ज्ञान पाजळले. पवित्र कुराणात ग्रंथित झालेल्या काही व्याकरणाच्या चुका तेथे बसलेल्या मुल्लांच्या निदर्शनास आणल्या. मी ती चित्रफित दोन-दोनदा पाहिली. इतर वेळी कुठलीही आगळीक झाली तरी अंगावर धावून जाणारी मुल्लांची ही कडवी पिलावळ त्यावेळी शांतपणे ऐकत होती. त्यांच्यातील एकही मसूदवर धावून गेला नाही. जर तारिक चुकीचे बोलत असता, तर त्याची अवस्था ‘सर तन से जुदा’ होण्यासाठी वेळ लागला नसता.
तारिकचे भाषण प्रसारित होताच संपूर्ण पाकिस्तानात एकच गदारोळ झाला. पै. महंमदांना निरक्षर, अशिक्षित म्हणून हिणवणारा, पवित्र कुराणातील चुका न सुधरवता तशाच कायम ठेवल्या, त्या अल्लाला वेठीस धरणारा हा कोण उपटसुंभ निपजला, अशी भावना पाकिस्तानी जनतेत प्रबळपणे उठली. शेवटी तारिक जे म्हणाला त्या विधानाने कहर केला, “अशा अशिक्षिताचे आम्ही का अनुयायी व्हावे?” मी जेव्हा त्याची चित्रफित ऐकली, तेव्हाच मनात पाल चुकचुकली की, आता मुल्ला तारिकचे काही खरे नाही! पै. महंमदांच्या धार्मिक श्रेष्ठतेला केवळ अक्षरज्ञान नाही म्हणून नाकारण्यास मागेपुढे न पाहणारा तारिक ‘सर तन से जुदा’ होण्यासाठी अथवा दीर्घकाळासाठी अज्ञातवासी होण्याला सामोरा गेला.
पवित्र कुराणाचे अवतरण
पै. महंमदांना लिहिता-वाचता येत नव्हते, हे संपूर्ण इस्लामी परंपरा मान्य करते. त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण हिरा गुहेत उपासनेदरम्यान देवदूताच्या अगदी पहिल्याच झालेल्या साक्षात्काराच्या वेळी त्यांनी देवदूत जिब्रैलला स्पष्ट शब्दात सांगितले होते की, ते निरक्षर- ‘उम्मी’ आहेत. ‘कुपिबंद अमृत’ या पैगंबरांच्या चरित्रात दिल्याप्रमाणे (२०१९ आवृत्ती, पृ. ८०), कित्येक रात्री ते गुहेत प्रार्थनेत आणि उपासनेत घालवायचे. अशा अवस्थेत त्यांना आविष्करण (साक्षात्कार) प्राप्त झाले. देवदूत त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, “वाचा!” पैगंबर म्हणाले, “कसे वाचावे हे मी जाणत नाही.” पुढे काय घडले, ते पैगंबरांनी स्पष्ट केले. “त्यानंतर त्याने मला इतके घट्ट धरले का माझा श्वास कोंडला जाऊ लागला. त्यानंतर त्याने मला सोडले” आणि म्हणाला, “वाचा!” तरीही मी म्हणालो, “कसे वाचावे हे मी जाणत नाही.” पुन्हा त्याने मला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, “वाचा!” मी म्हणालो, “कसे वाचावे हे मी जाणत नाही.” त्याने मला तिसर्यांदा मिठी मारली आणि पठन केले.
वरील प्रसंगातून तीन गोष्टी समजतात. पै. महंमदांनी स्पष्ट शब्दांत स्वीकारले की, त्यांना लिहिता-वाचता येत नव्हते. देवदूताने त्यांना दोन वेळा मिठी मारून आवाहन केले की ‘वाचा!’ याचा अर्थ असा की, पवित्र मिठीद्वारे त्यांना कमीतकमी वाचन करण्याचे ज्ञान संक्रमित व्हावे. तसे घडले नाही. शेवटी देवदूताने पहिल्या वेळी अवतरलेल्या सहा आयता पाठ करवून घेतल्या. तिसरे म्हणजे तेव्हापासून तो शेवटची आयत अवतरेपर्यंत तोच परिपाठ राहिला.
मक्केतील वास्तव्यात अनेक वर्षे त्यांना मोजकेच अनुयायी मिळाले. त्या दरम्यान अवतरलेल्या ‘सुरा’ मुखोग्दत करण्याची पद्धत पाळली गेली. पुढे जाऊन जेव्हा अनुयायांची संख्या वाढली, तेव्हा त्यांच्यातील अनेक साक्षर होते. जेव्हा पैगंबरांना आयत अवतरण होईल, हे जाणवत असे, तेव्हा ते साक्षर अनुयायांपैकी कुणालातरी बोलावून घेत आणि उतरलेली आयत लिहून घेतली जाई. ती नंतर हाडांच्या किंवा चामड्यांच्या तुकड्यांवर लिहिली जात असे. पै. महंमद हयात असेपर्यंत पवित्र कुराणाचे अंश विखुरलेल्या स्थितीत होते. त्यांच्या पश्चात आयता पाठ असलेले अनुयायी विखुरले. जसा जसा इस्लामचा प्रसार झाला आणि इस्लाम गैर-अरब समाजांमध्ये पसरू लागला, तसे त्यांची भाषा, उच्चार, शब्दांचे अर्थ यात फरक पडू लागला. त्यातून प. कुराणाची विश्वासार्ह आणि सर्वसंमत प्रत निश्चित करण्याची फार निकड भासू लागली. ती विश्वासार्ह प्रत ठरल्यावर इतर सर्व प्रती जाळण्यात, नष्ट करण्यात आल्या.
तारिकची गुस्ताकी
तारिकने आरोप केला की, अल्लानेही प. कुराणातील व्याकरणाच्या चुका बरोबर करून ते पैगंबरांच्या वाणीतून आविष्कारित केले नाही. हे विधान जागतिक मुस्लीम समुदायाच्या पारंपरिक समजूतींवर आघात करणारे ठरले. सय्यद नस्र यांच्या ‘द स्टडी कुरान’ या ग्रंथात दिल्याप्रमाणे (२०१५ आवृत्ती, पृ. १६०७,) पै. महंमदांच्या समकालीन सहकार्यांच्या, (अब्द-अल-मुत्तलिब) सहाबांच्या समजूतीप्रमाणे संपूर्ण कुराणातील आयता एका रात्रीतून सर्वोच्च स्वर्गातून अल्लाने अगदी खालच्या स्वर्गात अवतरवल्या. पैगंबरांच्या हयातीत प्रसंगोपात्त, अल्लाच्या मर्जीनुसार त्यातील व्याकरणाच्या चुका आणि अनेकार्थी आयतींसह प्रकट होत गेल्या. एकापेक्षा अनेक अर्थ असणार्या आयतांमुळे त्यात अस्पष्टता आली. आयत २.२६ ही आयत अनेक प्रकारे उलगडता येते. नस्रच्या ग्रंथात त्या आयतीचे चार अर्थ दिले आहेत. (पृ. १६०३). ही अर्थनातील अस्पष्टता अल्लालाच अभिप्रेत होती. त्याच वेळी कुराणातील एकही शब्द वावगा-अनर्थकारक नाही, त्यात कानामात्रेचा फरक झालेला नाही, अशी ठाम समजूत प्रत्येक सच्चा मुसलमान उराशी बाळगत असतो. पै. महंमदांच्या हयातीतच कुराण अवतरणाची आणि इस्लाम धर्म परिपूर्णतेस नेण्याची प्रकिया पार पडली, या अर्थाची ५.३ ही आयत आहे. या पार्श्वभूमीवर अल्लाने पाठविलेल्या प. कुराणातील त्रुटी काढणारी तारिक मसूदची वक्तव्ये प्रत्यक्षात ईशनिंदाच ठरते. त्या गुस्ताकीची शिक्षा ‘सर तन से जुदा’ हीच असेल. ती देण्यासाठी शासकीय यंत्रणेची आवश्यकता नाही. कोणीही सच्चा मुस्लीम ती शिक्षा कोणत्याही ठिकाणी, कशीही आणि केव्हाही देऊ शकेल. त्याची अनेक उदाहरणे भारत आणि पाकिस्तान, या दोन्ही देशांत घडलेली आहेत. अतिरेकी कृत्यांसाठी सामान्य मुस्लीम तरुणांना भडकावून असली घृणास्पद कामे करवून घेण्यात येतात. हे त्या उतावळ्या तरुणांच्या लक्षात येत नाही. कोण्या मुल्लाने कधीतरी स्वत: जाऊन अशा माना कापल्या आहेत? किंवा ‘अश्रफ’ वर्गात मोडणार्या कोण्या पुढार्याने असे आततायी कृत्य स्वत: केले आहे? या घृणास्पद कृत्यांचे कर्ते-करवीते इतरांकडून ती करवून स्वत: नामानिराळे राहतात.
दुहेरी शस्त्र
अतिरेकी मानसिकता तयार करणारी शिक्षण व्यवस्था आणि ‘सर तन से जुदा’ही दुहेरी शस्त्रे आहेत. पाकिस्तानने गेली तीन दशके जी अतिरेकी शिकवण मदरशांमधून दोन पिढ्यांच्या गळी उतरवली, तिची कटू फळे आता पाकिस्तान भोगतो आहे. तेथील समाजजीवनात आत्यंतिक अस्थिरता येऊन जगणे कठीण झाले आहे. लोक बदला घेण्याच्या मानसिकतेतून एकमेकांवर आक्रमक होत आहेत. अमेरिकेच्या सचिव पदावर असलेल्या कोंडोलिसा राईस यांनी पाकिस्तानातील राज्यकर्ते आणि लोकांना चेतावणी दिली होती की, ‘अतिरेक्यांच्या रूपात तुम्ही घरात साप पाळत आहात. ते नेहमीच शेजार्याला चावतील, हे धरून चालू नका. ते तुम्हालाही चावतील.’ ती परिस्थिती पाकिस्तानात गेल्या दशकापासून आली आहे. आता तिचे लोण भारतातही पोहोचले आहे. दि. २७ सप्टेंबरच्या एका वाहिनीवरील बातमीप्रमाणे गाझियाबाद येथील मदरशातील एका १४-१५ वर्षांच्या विद्यार्थ्याने त्याचा शिक्षक मुल्ला त्याला रागावला म्हणून त्या मुल्लाचाच गळा चिरण्याचा प्रयत्न केला. ‘सर तन से जुदा’ची शिकवण देणार्या मुल्लावर त्याचीच शिकवण उलटली होती. या घटनेचा भारतातील मुस्लिमांनी विचार केला पाहिजे. हिंदूंविरोधात ‘सर तन से जुदा’ गळी उतरविणार्यांच्या गळ्यांवरून सुरे फिरू लागले, तर त्यांची समाजव्यवस्था मोडून पडेल. ती वेळ त्यांच्या घरवापसीची असेल.
लेखक - डॉ. प्रमोद पाठक