प्रत्येक संतावर कोणी काय लिहिलयं? याचा तौलानिक अभ्यास करून, विठ्ठलाच्या (परब्रह्माच्या) सगुण भक्तीत रमणार्या, भाववेड्या संतांनी तत्कालीन बोलीभाषेत अभंग, ओवी निर्मिती सुरू केली. त्याचा आढावा, वर्णन आपल्या खास शैलीत सुजितने या कवितासंग्रहात सादर केले आहे. कीर्तन, भारुड, आख्यान, प्रवचन, गवळण, दोहे यांसारख्या माध्यमातून बहुजन समाजात, अखिल महाराष्ट्रात, पूर्ण भारतात आणि संपूर्ण विश्वात देखील, वारकरी संप्रदायाचा सर्व संतांनी प्रचार-प्रसार सुरू केला. त्यावेळी संतसाहित्याने मोठ्या प्रमाणावर समाजप्रबोधन केले, हा या ‘संतवारी’चा मुख्य उद्देश आहे.
सुप्रसिद्ध कवी सुजित कदम यांचा श्रीगणेश चतुर्थीच्या शुभदिनी प्रकाशित झालेला, चौथा कवितासंग्रह अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण ठरला आहे. या अष्टाक्षरी कवितासंग्रहाचा प्रवास, मी जवळून पाहिला आहे. सुजितने यानिमित्ताने केलेला संतकाव्याचा अभ्यास, त्याची सृजनशील धडपड, ज्ञानलालसा आणि आव्हानात्मक नवनिर्मितीचा ध्यास, शब्दमांडणी, आखणी याचा मी साक्षीदार आहे. मराठी भाषेचे ’अभिजात साहित्य वैभव’, अलौकिक असे ’अक्षरधन’ कवीने अत्यंत साध्या सोप्या शब्दांत तसेच, लयबद्ध अष्टाक्षरी छंदात मोठ्या कौशल्याने शब्दबद्ध केले आहेत.
संतांचे विचार, त्यांचेजीवनकार्य, संतसाहित्य
भारतीय भक्ती संप्रदायात, वारकरी संप्रदायाचे अनमोल योगदान आहे. संतसाहित्याची ही शिदोरी पुढच्या पिढीपर्यंत कवीने अभ्यासपूर्वक पोहोचवली आहे. तत्त्वज्ञान हे केवळ विचारप्रणाली न राहता, ती नीती-मूल्यांची जपणूक करणारी, संतसाहित्याची अभूतपूर्व नांदी ठरली. वारकरी संप्रदाय हा भक्तिमार्ग संप्रदाय असून, या भक्ती संप्रदायाने अद्वैत तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केला आहे. या संप्रदायाचा पाया रचण्याचे श्रेय त्याने या रचना करून सर्व संतांना दिले आहे.
प्रत्येक संतावर कोणी काय लिहिलयं? याचा तौलानिक अभ्यास करून, विठ्ठलाच्या (परब्रह्माच्या) सगुण भक्तीत रमणार्या, भाववेड्या संतांनी तत्कालीन बोलीभाषेत अभंग, ओवी निर्मिती सुरू केली. त्याचा आढावा, वर्णन आपल्या खास शैलीत सुजितने या कवितासंग्रहात सादर केले आहे. कीर्तन, भारुड, आख्यान, प्रवचन, गवळण, दोहे यांसारख्या माध्यमातून बहुजन समाजात, अखिल महाराष्ट्रात, पूर्ण भारतात आणि संपूर्ण विश्वात देखील, वारकरी संप्रदायाचा सर्व संतांनी प्रचार-प्रसार सुरू केला. त्यावेळी संतसाहित्याने मोठ्या प्रमाणावर समाजप्रबोधन केले, हा या ‘संतवारी’चा मुख्य उद्देश आहे.
’संत’ आणि ’वारी’ या दोन शब्दांवर लक्ष केंद्रित करून, या वारीचा लेखनप्रवास सुरू झाला आहे. यातील अनेक बारकाव्यांनी मनात घर केले आहे. आठ शतकांचे समाज परिवर्तन, मौलिक योगदान या संत साहित्याने केले आहे. याची जाणीव कवीला आहे, हे पदोपदी जाणवते. संतकवींनी प्रपंचातून परमार्थ साधताना ईश्वर भक्तीचा लळा लावला. बोलीभाषा साहित्यात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संतसाहित्याने केले. कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग यांचा प्रचार-प्रसार झाला. मोक्षप्राप्तीसाठी, ईश्वरकृपेसाठी यज्ञयाग, व्रतवैकल्ये, तीर्थयात्रा, वाणवसा, अवाजवी कर्मकांड यांचे स्तोम माजवू नका, असे संतांनी वेगवेगळ्या मार्गाने निक्षून सांगितले. ‘माणूस जाणा, माणूस वाचा, माणूस जोडा, माणूस जपा, आणि ईश्वरी कृपा प्राप्त करा’ हा मौलिक संदेश या सर्व संतांनी दिला. याचे दर्शन या रचनातून घडते.
कर्मयोगाला ज्ञानाची जोड मिळाली. भक्तियोगाला वारीच्या माध्यमातून सामाजिक अधिष्ठान प्राप्त झाले. संत गोरा कुंभार, संत नरहरी सोनार, संत चोखामेळा, बंका महार, संत सखु, संत जनाबाई,संत मुक्ताबाई, संत एकनाथ, संत नामदेव, संत विसोबा खेचर, संत जनार्दन स्वामी, संत चोखामेळा, संत रोहिदास, संत कनकदास, संत पुरंदर दास, संत मीराबाई, संत कान्होपात्रा, संत चांगदेव, संत रामदासस्वामी, संत गजानन महाराज, संत स्वामी समर्थ, अशा कितीतरी संतविभूतींनी केलेले कार्य या ‘संतवारी’त अतिशय समर्पक शब्दांत समाविष्ट झाले आहे.
कल्पना, वैविध्य, नाविन्य, आशय घनता, उच्च यमक संगती, शब्द सौंदर्य, नादसौंदर्य, भावसौंदर्य, अंतरिक उत्स्फूर्तता, प्रासादिकता, या कवितेतल्या साहित्यिक मूल्यांची, यथार्थ जडणघडण या ‘संतवारी’ने केली आहे. ’स्वेद’, (घाम) ’स्तंभ’ (निःस्तब्ध होणे), (एकाच जागी थिजून जाणे), ’रोमांच’ (अंगावर काटा येणे), ’स्वरभंग’ (आवाज कातर हळवा होणे), ’कंप’ (शरीराला कप सुटणे), वैवर्ण्य (चेहर्याचा रंग बदलणे) ’अश्रू’ डोळे भरून येणे आणि ’प्रलय’ (संत विचारात मन हरवून जाणे.. मती गुंग होणे) अशा आठ भाव अवस्था.. अष्ट सात्विक भाव या रचनांमध्ये अनुभवता येतात. या सर्व संतांचा एक उज्वल व स्फूर्तीदायक आदर्श, प्रबोधन विचार या रचनांमध्ये जाणवतो.
तत्त्वज्ञानाची विवेकपरता, योग्याची निरामयता, संतांची भूतदया व साहित्यिकाची पद्यमय सौंदर्यदृष्टी, या ‘संतवारी’त अनुभवता येते. समता, बंधुता, मानवता आणि ईश्वरभक्ती या मूल्यांची जोपासना करणारा हा वैशिष्ट्यपूर्ण संग्रह आहे. सोळाव्या शतकापासून नावारूपाला आलेली, सर्व संतमंडळी, त्यांचे काव्यमय जीवनचरित्र या संग्रहात काव्यमय स्वरूपात वाचायला मिळते. उच्च यमकांची साथ लाभल्याने तसेच, अष्टाक्षरी छंद अवगत असल्याने हा संग्रह लयबद्ध आणि आशयसंपन्न झाला आहे.
वारीच्या माध्यमातून एकात्मता, विश्वबंधुता, अस्तित्वात आली भेदाभेद, विषमता, जातियता, दूर झाली. समतेच्या झेंड्याखाली बहुजन समाजातील, सर्व वारकरी एकत्र आले, याचा पुन:प्रत्यय या ‘संतवारी’ने दिला आहे. प्रत्येक संतांच्या जीवनचरित्राने काय दिले, याचे उत्स्फूर्त वर्णन कवितेतील एकेका ओळीने केले आहे. या रचना लिहिताना, बरेच संत रसिकांना नव्याने माहिती होणार आहेत.
कवी सुजित यांनी मनोगतात सांगितल्याप्रमाणे, या ‘संतवारी’त, ’माऊलींचा आशीर्वाद’ आहे आणि ’भावभावनांची गाथा’ आहे, ’प्रपंचाचे भारुड’ आहे, ’सुखदुःखाचे संकीर्तन’ आहे, ’जाणिवांनेणिवांचे टाळ’ आहेत ’कर्तव्यपरायणतेची लय’ आहे. ’स्वप्नपूर्तीचा ध्यास लागलेलं तुळशीचं रोपट आहे’ गणेश, दत्तगुरु आणि माता सरस्वतींचे आशीर्वाद आहेत. कैवल्य, अध्यात्म, द्वैत-अद्वैत हे शब्द, या सर्व संतांनी अत्यंत सोप्या पद्धतीने समाजमनात जनमानसात रुजवले आणि ‘संतवारी’ प्रत्येक वैष्णवांच्या मनात नांदू लागली. हाच धागा हे सूत्र कवीने संपूर्ण संग्रहात लिलया सांभाळले आहे.
विठ्ठल भक्ती आणि संत जीवनचरित्र याची अनुभूती या ‘संतवारी’ने दिली आहे. पावन, पवित्र, मंगलमय असा व्यासंगी साहित्य प्रवास, छंदोबद्ध साहित्यनिर्मिती आणि अनोखा व्यासंग, सर्व रसिकांना (माझ्यासह) लाभला, हा ही एक ईश्वरी कृपाप्रसाद आहे.
सार्थ ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, एकनाथी भागवत, संतमंडळांचे ऐतिहासिक कार्य, संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती, वारी एक सांस्कृतिक संचित, तुकाराम गाथा, वारकरी संत दर्शन, दासबोध आणि ३८ संतांची सचित्र संक्षिप्त चरित्रे, संदर्भ ग्रंथ म्हणून अवलोकन करून ही ‘संतवारी’ अतिशय देखण्या स्वरूपात साकार झाली आहे.
मुखपृष्ठापासून, मलपृष्ठापर्यंत अनेक वैशिष्ट्यांनी परीपूर्ण असा हा अष्टाक्षरी कवितांचा संग्रह वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रासादिक ठरला आहे. सर्वांनी संग्रही ठेवावा, असा हा संग्रह आहे. कवीला पुढील उज्वल वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
काव्यसंग्रहाचे नाव : संतवारी
कवी : सुजित शिवाजी कदम
प्रकाशन : राजयोग प्रकाशन
मूल्य : २२० रुपये
लेखक - विजय सातपुते