मुंबई : धारावी विधानसभेची जागा आम्ही लढावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे, असं विधान उबाठा गटाचे नेते संजय राऊतांनी केलं आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर उबाठा गटाचा डोळा असल्याचं स्पष्ट झालंय. धारावी बचाओच्या नेत्यांनी शनिवारी संजय राऊतांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
संजय राऊत म्हणाले की, "धारावी बचाओचे सर्व कार्यकर्ते मला भेटले. धारावी विधानसभेची जागा आम्ही लढावी, अशी त्यांची मागणी आहे. धारावीचं आंदोलन शिवसेनेने जिवंत ठेवलंय. आम्ही या आंदोलनाचं नेतृत्व करत आहोत. त्यामुळे धारावी विधानसभा शिवसेनेने लढावी, अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. त्यासाठी धारावी बचाओच्या कृती समितीचे लोक वारंवार शिवसेनेच्या नेत्यांना भेटत आहेत. आज पुन्हा ते माझ्याकडे आले होते. मी त्यांची भूमिका उद्धव ठाकरेंच्या कानावर घालेन. तसेच याबाबत काँग्रेस हायकमांडशीही चर्चा करणार आहे," असं सांगत राऊतांनी धारावीच्या जागेवर एकप्रकारे दावाच सांगितलाय.
हे वाचलंत का? - अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल!
धारावीमध्ये वर्षा गायकवाड या तीन टर्म निवडून येत आल्यात. परंतू, त्या सध्या लोकसभेवर निवडून गेल्याने त्यांची जागा रिक्त झाली आहे. दरम्यान, जागावाटपात ही जागा पुन्हा काँग्रेसलाच जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसने याठिकाणी कुणाला उमेदवारी देणार, याबाबत स्पष्ट केलेलं नाही. मात्र, त्याआधाची उबाठा गटाने धारावीत दावा केल्याचं दिसतंय.