मुंबई : मराठी बिग बॉसचा पाचवा सीझन लवकरच संपणार आहे. यावेळी ७० दिवस असणाऱ्या या सीझनमध्ये नुकताच फ्रिज-अनफ्रिजचा खेळ बिग बॉसने घरातील सदस्यांसोबत खेळला. यावेळी त्यांना भेटायला त्यांच्या घरातील नातेवाईक आले होते. त्यांना पाहून सर्वच सदस्य भावनिक झाले होते. पण आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणायला घरात गेली आहे रिअल ड्रामा क्वीन राखी सावंत. राखीला पाहून निक्की तंबोळीची मात्र बोलतीच बंद झालेली पाहायला मिळाली आहे.
बिग बॉसच्या घरात निक्कीचा ठणाणा पाहता सर्वांनीच
राखी सावंतला आणा अशी मागणी प्रेक्षकांनी केली होती. अखेर 'ड्रामा क्वीन' राखीची घरात एन्ट्री होत आहे. कलर्सने नवीन प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये घरातील सर्व सदस्यांना फ्रिज होण्यास सांगितलं. तेवढ्यात दार उघडतं आणि घरात राखी सावंतची एन्ट्री होते. गुलाबी ड्रेसमध्ये राखी डान्स करत येते. 'हॅलो बिग बॉस तुमची पहिली बायको' असं ती म्हणते. राखीला पाहताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं. पण निक्की मात्र म्हणते, 'हाय रब्बा'. राखी निक्कीला पाहताच म्हणते, 'निक्की, सस्ती राखी सावंत. आता घरात चालणारे माझाच ठणाणाणा...निक्की तांबोळी, सोडून येणार तुला आंबोली.'
निक्की तांबोळी आणि राखी सावंत एकत्रित बिग बॉस हिंदीच्या १४ व्या पर्वात सहभागी झाल्या होत्या.त्यावेळी घरात दोघींची जबरदस्त भांडणं झाली होती. आता इतक्या वर्षांनी पुन्हा निक्की आणि राखी समोरासमोर आल्या आहेत. 'राखीशिवाय सीझन पूर्ण होऊ शकत नाही', 'चला शेवट तरी गोड होतोय' अशा मजेशीर कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. राखी आल्याने घरात तुफान मनोरंजन होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तिच्या येण्याने घराची राणी निक्कीची काय अवस्था होते हे पाहायला मजा येणार आहे.