महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे लोककल्याणाला समर्पित जीवन

    28-Sep-2024
Total Views |
 
Punyashlok Ahilyabai Holkar
 
मध्य भारतातील माळवा राज्याची राणी राजमाता अहिल्याबाई होळकर या भारतातील सर्वात दूरदर्शी महिला शासकांपैकी एक मानल्या जातात. त्यांचे जीवन आणि शासन लोककल्याणासाठी समर्पित होते. त्यांचे जीवन आणि प्रशासनाची शैली साधी आणि सोपी, धर्मनिष्ठ, न्याय्य, कल्याणकारी आणि संवेदनशील होती. लोकांनी त्यांना नेहमीच ’लोकमाता’ म्हणून पाहिले. ब्रिटिश इतिहासकार जॉन केयस यांनी त्यांना ’फिलोसॉफर क्वीन’ उपाधी दिली. यंदा अखंड भारत पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांची ३००वी जयंती साजरी करत आहे. त्यानिमित्ताने...
 
भारतभूमी वीरांची जननी आहे. तिने कायमच शूर-नायकांना जन्म दिला. थोर व्यक्तिमत्त्व आणि कर्तव्याप्रती भक्ती असलेल्यांसमोर जग नेहमीच झुकते. या धर्मभूमीवर जन्मलेल्या महाराणी अहिल्याबाई होळकर या अशाच एक महान आणि तेजस्वी-गौरवशाली महिला होत्या, ज्यांनी आपल्या शिवसंकल्पाद्वारे सनातन परंपरा तसेच, विश्वासांनुसार आदर्श प्रशासन आणि राज्यव्यवस्था वसवली. मध्य भारतातील माळवा राज्याची राणी राजमाता अहिल्याबाई होळकर या भारतातील सर्वात दूरदर्शी महिला शासकांपैकी एक मानल्या जातात. त्यांचे जीवन आणि शासन लोककल्याणासाठी समर्पित होते. त्यांचे जीवन आणि प्रशासनाची शैली साधी आणि सोपी, धर्मनिष्ठ, न्याय्य, कल्याणकारी आणि संवेदनशील होती. लोकांनी त्यांना नेहमीच ’लोकमाता’ म्हणून पाहिले. ब्रिटिश इतिहासकार जॉन केयस यांनी त्यांना ’फिलोसॉफर क्वीन’ उपाधी दिली. यंदा अखंड भारत पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांची ३००वी जयंती साजरी करत आहे. हे औचित्य साधत अनेक सामाजिक संस्था आणि महिला संघटना त्यांच्या जयंती वर्षात त्यांच्या विविध गुणांवर प्रकाश टाकणारे कार्यक्रम आणि चर्चासत्रे आयोजित करत आहेत.
 
राजयोग आणि कर्मयोगाचा संयोग असलेले व्यक्तिमत्त्व
 
महाराणीची राजवट ही प्रेम, न्याय आणि सुशासनाचे प्रतीक होती. एक महिला असूनही, त्या केवळ राज्य चालवण्यात निपुण नव्हत्या; तर एक कुशल योद्धादेखील होत्या. त्यांनी बालपणीच सैन्य शिक्षण, घोडेस्वारी, शस्त्रे बाळगणे या कला अवगत केल्या. राघोबाच्या आक्रमणाच्या वेळी आपल्या राज्याच्या संरक्षणासाठी मुत्सद्देगिरीची सुरुवात करताना त्यांनी सिंधिया, भोसले, गायकवाड इत्यादींचे सहकार्य मागितले. जुन्या नातेसंबंधांच्या आधारे राघोबाला योग्य शिक्षा देण्यासाठी त्यांनी ५०० महिलांच्या सैन्याला प्रशिक्षणही दिले. राघोबाला लिहिलेल्या पत्रातून त्यांना असलेली राजनैतिक दूरदृष्टी उघड होते. पत्रात त्या लिहितात, “तुम्ही मला अबला समजून राज्य हडप करण्यासाठी आले आहात. मात्र, माझी शक्ती रणभूमीवर समजेल. मी महिला सेनेसह तुमच्यासोबत झुंज देईन. मी युद्धात हरले तरी कोणीही मला हसणार नाही किंवा तुमचे कौतुक होणार नाही. मात्र, जर तुम्हाला पराजय स्वीकारावा लागला, तर तुम्ही कुठेही तोंड दाखवू शकणार नाही.” केवळ राघोबाच नव्हे, तर आपल्या राज्याच्या सीमेवर राजस्थानकडून उभ्या ठाकलेल्या आव्हानांना साहसाने सामोरे जात शत्रूला जिद्दीने पायदळी तुडविण्याचे महान कार्य पराक्रमी अहिल्याबाईंनी केले. त्यांनी लष्कर, सैनिकांवर वैद्यकीय उपचार इत्यादीही केले. आतापर्यंत आपण अहिल्याबाई यांच्या धार्मिकतेबद्दल ऐकत आलो. परंतु, त्या धाडसाने शत्रूंचे दात घशात घालू शकतात, हे आपल्याला ठाऊक नव्हते. महाराणी अहिल्याबाईंची सत्ता कठोर आणि न्याय्य होती. जात-पात, उच्च-नीच या भेदभावांच्या पलीकडे जाऊन प्रजेला चोरांपासून अभय मिळवून देणार्‍या तरुणाशी त्यांनी आपल्या लेकीचे लग्न लावून दिले. पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या मालमत्तेवर पूर्ण हक्कांची तरतूद आणि स्त्रीला दत्तक घेण्याचा अधिकार देणे यासारखे महिला सक्षमीकरणाचे निर्णय घेतले.
 
महादेव आणि आई नर्मदा यांची सेवा करण्यासाठी महेश्वर राजधानीची स्थापना
 
राज्य चालविण्याचे अनेक सद्गुण असूनही, त्यांचे शासन मुळात धर्मनिष्ठ होते. आपल्या धर्माप्रती असलेल्या भक्तीमुळे राजधानी इंदूरहून पवित्र नर्मदा नदीच्या काठावरील महेश्वर येथे हलवली. राज्य चालवण्याबरोबरच त्या नर्मदा मातेची सेवा आणि पूजा करू शकतील, हा राजधानी महेश्वरला हलवण्याचा उद्देश होता. नर्मदा मातेच्या किनार्‍यावरील राजवाडा हा सर्व-त्याग करणार्‍या तपस्वीनीचा राजवाडा होता. ज्यामध्ये त्यांनी आपल्या आयुष्याची 28 वर्षे घालवली. महेश्वरला स्वावलंबन तसेच, शिक्षणाचे केंद्र बनवण्यासाठी महाराणीने विद्वान आणि धर्माचार्यांना आमंत्रित करून, येथे संस्कृत शाळा सुरू केली. सेवा, त्याग, तपश्चर्या आणि दानधर्म यांचे महत्त्व वैयक्तिक जीवनात असताना, त्यांनी देवळांचा जीर्णोद्धार केला. त्यांची कायमस्वरूपी आर्थिक व्यवस्था केली. वाटसरूंसाठी विश्रांतीची ठिकाणे आणि अन्नछत्रे उभारली. आपले राज्य शंकर भगवानांना समर्पित करून त्याचा प्रतिनिधी म्हणून राज्य केले. भगवान बद्रीनाथ, हिमालयातील केदारनाथ, दक्षिणेला रामेश्वरम, पश्चिमेला द्वारका ते पूर्वेला जगन्नाथ पुरीपर्यंत त्यांचे सुरू असलेले सेवाकार्य आजही प्रसिद्ध आहे.
 
रणरागिणीचे वीर जीवन
 
वडील माणकोजीराव शिंदे आणि आई सुशीलाबाई यांच्या कुटुंबात दि. ३१मे १७२५ रोजी चौंडी (अहमदनगर, महाराष्ट्र) मध्ये जन्मलेल्या अहिल्याबाई यांचे जन्मगाव आता अहिल्यानगर म्हणून ओळखले जाते. धनगर जातीत जन्म झाल्यानंतर त्यांची प्रतिभा लक्षात घेऊन पेशवे बाजीराव तसेच, मल्हारराव होळकर दोघांच्या परस्पर विचार-विनिमयानंतर अहिल्याबाई यांचा विवाह मल्हाररावांचे पुत्र खंडेराव यांच्यासह करण्यात आला. युद्धात वीरगती प्राप्त झाल्याने अहिल्याबाईंना पतिवियोग सहन करावा लागला. त्यांना पतीच्या मृत्यूनंतर आपल्या सासर्‍यांच्या आग्रहास्तव राज्यकारभाराची जबाबदारी सांभाळावी लागली. सासरे मल्हारराव युद्धावर गेल्यानंतर महाराणी अहिल्याबाई राज्याची धुरा कुशलतेने हाताळत. पत्रव्यवहाराच्या माध्यमातून मल्हाररावांना राज्याची बित्तंबातमी पाठविणे. तसेच, प्रत्युत्तरात राज्य संचालनाकरिता सासर्‍यांचे मत, शिफारसी लक्षात घेणे, ही त्यांची नियमित प्रक्रिया होती. सेवा त्याचप्रमाणे रसद साहित्याची व्यवस्था, कर वसुली इत्यादी व्यवस्था मोठ्या निपुणतेने करत. त्यांनी आपल्या जीवनकाळात सासरे मल्हारराव होळकर, नातू (मुलीचा मुलगा) तसेच, मुलगी सर्वांचा अकाली मृत्यू पाहिला. या असहय्य वेदना सहन करत शूरपणे आणि धैर्याने वयाच्या ७० पर्यंत एक आदर्श राजमातेचे यशस्वी जीवन पूर्ण करत सन १७९५ मध्ये शेवटचा श्वास घेतला.
 
आर्थिक विकासाचा दृष्टिकोन
 
अहिल्याबाईंनी आर्थिक विकासासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांपैकी एक म्हणजे महेश्वरी साडी, जी आजही जगप्रसिद्ध आहे. या उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी त्या स्वतः महेश्वरचे कपडे वापरत आणि देश-विदेशातून येणार्‍या मान्यवरांना भेट म्हणूनही देत असत. त्यांनी नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकर्‍यांना मदत करण्याची आणि सैन्याच्या हालचालीमुळे झालेल्या पिकांसाठी नुकसान भरपाई देण्याचीही व्यवस्था केली.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदूर येथील आपल्या भाषणात सांगितले की, “मी देवी अहिल्याबाईंना नमन करतो आणि त्यांच्या सद्गुणांचे स्मरण करतो. पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी प्रशासनात छोट्या गरजांना प्राधान्य दिले. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अध्याय इतका प्रेरणादायी आहे की, येणार्‍या पिढ्या त्यांच्याकडून शिकत राहतील. लोकमाता महाराणी अहिल्याबाईंच्या जीवनातून प्रेरणा घेऊन, त्यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त, आपण त्यांनी दाखवलेल्या मार्गावर एकसंध, समृद्ध, सुसंवादी आणि शक्तिशाली भारत निर्माण करण्याचा आणि आपल्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान बाळगत जागतिक कल्याण करण्याचा संकल्प करुया!” महाराणी अहिल्याबाई होळकर यांना त्यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त ही खरी श्रद्धांजली ठरेल.
(लेखक भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री आहेत)
 
लेखक - शिवप्रसाद