सांगली : मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणूक लढवली नाही तर ते शरद पवारांच्या इशाऱ्यावर चालतात, हे स्पष्ट होईल, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. तसेच यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या जागांबद्दलही भाष्य केले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "लोकसभेमध्ये मी निवडणूक लढवणार, असं मनोज जरांगेंनी जाहीर केलं होतं. त्यानंतर आता विधानसभेलाही त्यांनी तेच जाहीर केलं आणि अर्ज मागवले. अनेक गरीब मराठ्यांनी अर्ज केलेत. तिथल्या १५० उमेदवारांनी अर्ज केले आणि जरांगेंना सांगितलं की, तुम्ही उमेदवार द्या, आमच्यापैकी एकही जण बंडखोरी करणार नाही. कार्यकर्त्यांची मानसिकता झालेली आहे. त्यामुळे जरांगेंनी जर आता निवडणूक लढवली नाही तर ते शरद पवारांच्या इशाऱ्यावर चालतात ही सामान्य माणसाची भूमिका आता पक्की होईल," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी जरांगे पाटलांच्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीला जाहीर पाठींबा दिला आहे. काल मी सांगली जिल्ह्यात होतो. त्यावेळी ओबीसी संघटनांची एक बैठक झाली. तेव्हा मी एक बदल पाहिला. ओबीसी संघटनांनी आता शरद पवारांना मराठ्यांचे नेते असं विशेषण लावायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मराठवाड्याचं लोण हे हळूहळू पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा पोहोचत आहे. आरक्षण हा सर्वात महत्वाचा विषय होईल, असं दिसतंय."