राज्यातील महिलांना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे! मंत्री मंगल प्रभात लोढांची घोषणा

28 Sep 2024 18:30:20
 
Lodha
 
मुंबई : राज्यातील महिलांना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी 'हर घर दुर्गा' अभियान राबवले जाणार असल्याची घोषणा कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी शनिवार, दि. २८ सप्टेंबर रोजी केली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
 
चर्चगेट येथे आयोजित पत्रकार परिषदेत लोढा म्हणाले, दि. ३० सप्टेंबर रोजी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते हर घर दुर्गा अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे, त्याचबरोबर 'केरला स्टोरीज' चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री अदाह शर्मा यावेळी उपस्थित राहणार आहे.
 
हे वाचलंत का? -  निवडणूकीपूर्वी घड्याळ चिन्ह गोठवा! शरद पवार गटाची मागणी
 
या अभियानामार्फत शासकीय औद्योगिक संस्थांमधील तरुणींना स्वरक्षणाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण फक्त काही दिवसांपुरते मर्यादित राहणार नसून, शासकीय औद्योगिक संस्थांमध्ये संपूर्ण वर्षभर आठवड्यातून २ ते ३ वेळा तासिका स्वरूपात हे प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. ज्याप्रमाणे इतर विषयांचे अभ्यासक्रम आणि तासिका असतात त्याप्रमाणे आत्म संरक्षणाच्या सुद्धा तासिका असाव्यात, अशी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांची संकल्पना होती. त्यानुसार 'हर घर दुर्गा अभियान उदयास आले आहे.
 
कुर्ला 'आयटीआय'चे नामकरण होणार!
 
राज्यातील १४ आयटीआय चे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाद्वारे नुकताच घेण्यात आला. त्या अनुषंगाने या कार्यक्रमात कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेचे नामकरण महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक संस्था असे करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमात डिजिटल एक्सलन्स सेंटर देखील येथे उभारण्यात येणार आहे, असे देखील मंत्री लोढा यांनी सांगितले.
 
स्वसंरक्षण ही काळाची गरज!
 
"स्वरक्षण ही आजच्या काळाची गरज आहे. हर घर दुर्गा अभियानाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक महिलेला स्वतःचे रक्षण करण्यासाठी सुसज्ज करत आहोत. हा उपक्रम फक्त आत्मरक्षणाचे कौशल्य शिकवणार नाही, तर आपल्या महिलांमध्ये आत्मविश्वास आणि धैर्य निर्माण करेल. स्त्री सक्षमीकरण हा फक्त प्राधान्याचा नाही, तर आपल्या सर्वांच्या जबाबदारीचा मुद्दा आहे. हर घर दुर्गा अभियानाच्या माध्यमातून अधिक सक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण पिढी घडवण्यासाठी आपण पायाभरणी करत आहोत. हा उपक्रम स्त्री सुरक्षा आणि समानतेबाबतीत महायुती सरकारची कटिबद्धता दर्शवतो," असे मंत्री लोढांनी यावेळी सांगितले.
Powered By Sangraha 9.0