मुंबई, दि. २७ : (MIHAN project)सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह याचिका रद्द केल्यामुळे नागपुरातील जागतिक दर्जाच्या ब्राऊनफिल्ड विमानतळाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे नागपुरात नवे जागतिक दर्जाचे विमानतळ तयार होणार आहे. यात दोन धावपट्ट्या असणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणार्या या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाल्याने देवेंद्र फडणवीसांनी आनंद व्यक्त केला आहे. “या प्रकल्पामुळे नागपूरच्या विकासाला चालना मिळेल आणि शहराचे मोठ्या लॉजिस्टिक हबमध्ये रूपांतर होईल,” असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाबाबत दाखल क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवार, दि. २७ सप्टेंबर रोजी बंद करण्याचे आदेश दिले. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी ही याचिका चालविण्यायोग्य नसल्याचे मत व्यक्त केल्यावर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्या. संजीव खन्ना, न्या. जे. के. माहेश्वरी आणि न्या. बी. आर. गवई यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. विमानतळ विकास कंत्राटाची संपूर्ण प्रक्रिया रद्द करण्यात आल्यानंतर जीएमआर एअरपोर्ट आणि जीएमआर नागपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट या कंपन्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने जीएमआरला कंत्राट देण्याविरुद्ध क्युरेटिव्ह याचिका फेटाळली. यामुळे नागपूर येथे दोन धावपट्ट्यांसह ब्राऊनफिल्ड ब्रॅण्ड नवीन विमानतळ आणि आंतरराष्ट्रीय कार्गो विमानतळ बांधण्याचा मार्ग मोकळा होईल. तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यकाळात या प्रकल्पांचे नियोजन आणि कंत्राटही देण्यात आले होते. यामुळे नागपूर येथील ‘मिहान प्रकल्पा’च्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे मला आनंद झाला आहे. नागपुरातील जागतिक दर्जाच्या ब्राऊनफिल्ड विमानतळ उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे कार्गो विमानतळसुद्धा असेल आणि दोन धावपट्ट्या असतील. नागपूरचे हे नवे विमानतळ माझे स्वप्न होते आणि त्यासाठी मी सातत्याने परिश्रम घेतले. यामुळे नागपूरचा ‘मिहान प्रकल्प’ खर्या अर्थाने ‘टेकऑफ’ घेणार आहे.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
प्रकल्पाचे मुख्य फायदे
- वर्धित हवाई संपर्क
- व्यापार आणि वाणिज्य वाढेल
- रोजगारनिर्मिती आणि आर्थिक वाढ
- सुधारित पायाभूत सुविधा
- नागपूरचे लॉजिस्टिक हबमध्ये रूपांतर
नागपूर विमानतळ विकास आणि ‘मिहान’
- दोन धावपट्ट्यांसह ब्राऊनफिल्ड विमानतळाचे बांधकाम
- आंतरराष्ट्रीय कार्गो विमानतळ विकास
- ‘मिहान (मल्टी-मॉडल इंटरनॅशनल कार्गो हब आणि विमानतळ) प्रकल्पा’ला चालना
‘मिहान प्रकल्पा’चा परिणाम
- विमानतळ, सेझ, औद्योगिक क्षेत्राचा एकात्मिक विकास
- आयटी - आयटीइएस, उत्पादन आणि सेवांची वाढ
- वाढीव गुंतवणूक आणि आर्थिक देवाणघेवाण वाढेल
- स्थानिकांचे जीवनमान सुधारेल