कुलगम मध्ये २ दहशतवाद्यांना कंठस्नान.

    28-Sep-2024
Total Views |

kulgam
 
 
नवी दिल्ली: जम्मू काश्मीर मधल्या कुलगम येथे शनिवारी सकाळी २ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सैन्याला यश आले आहे. या चकमकीत, ५ सुरक्षारक्षकांना जखमी झाले असून सुदैवाने कुठलीही जीवीतहानी झालेली नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कुलगाममधील अदिगाम परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.
 
अदिगाम येथे दहशतवादी असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच, सैन्य, पोलीस, आणि सीआरपीएफची तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिक रहिवाशांना कुठल्याही प्रकारे हानी पोहोचणार नाही, याची दक्षता घेत, सुरक्षारक्षक पाऊले टाकत होती. त्याच क्षणी अचानक, दहशतवाद्यांनी हल्ला सुरु केला ज्यात सुरक्षारक्षक जखमी झाले. या दरम्यान, २ दहशतवाद्यांना ठार मारण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी या पूर्वी पोलिस, सुरक्षा रक्षक, आणि स्थानिक रहिवाशांवर गोळीबार केला होता. डोडा, कठुआ, राजौरी, पुंछ आणि रियासी अशा डोंगराळ भागात, काही काळ या दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. तसेच, कुठल्याही दहशतवादी संघटनेकडून या हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आलेली नाही.

सध्या जम्मू काश्मीर मध्ये निवडणुकांचे वारे वाहत असून, ३ टप्प्यांमध्ये मतदान सुरु आहे, मतमोजणी आणि निकाल ८ ऑक्टोबर २०२४ रोजी जाहिर होईल.