चतुरंग : महाराष्ट्राची ओळख ठरलेली सांस्कृतिक चळवळ

    28-Sep-2024
Total Views |
 
चतुरंग सुवर्णरत्न सन्मान 
 
‘चतुरंग’ संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी सांगता सोहळ्यानिमित्त शनिवार, दि. २८ आणि २९ सप्टेंबर रोजी मुंबईतील यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज, रविवार, दि. २९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी होणार्‍या कार्यक्रमात प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी, प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत, पं. उल्हास कशाळकर, पं. हरिप्रसाद चौरसिया, क्रिकेटपटू चंदू बोर्डे, ख्यातनाम उद्योजक बाबा कल्याणी, ज्येष्ठ साहित्यिक महेश एलकुंचवार, संगीतकार अशोक पत्की, मेजर महेशकुमार भुरे, या ११ मान्यवरांना ‘चतुरंग सुवर्णरत्न सन्माना’ने गौरवण्यात येणार आहे. त्यानिमित्त हा विशेष लेख...
 
कला, शिक्षण, साहित्य, नाट्य, संगीत, चित्रपट अशा अनेकविध क्षेत्रांतील दिग्गजांना एकत्र आणून रसिकांशी त्यांची गाठभेट घालून देणं, हे काम रसिकपणे सातत्यानं करत राहणं, हे अजिबात सहजसाध्य नाही. त्यातही दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण कार्यक्रमांच्या अत्यंत आपुलकीनं केलेल्या संयोजनाचा मानदंड निर्माण करणं, ही तर अक्षरशः तपश्चर्याच म्हणावी लागेल. कोकण आणि मुंबईत सुरू झालेल्या ‘चतुरंग प्रतिष्ठान’ या संस्थेने गेली ५० वर्षे अव्याहतपणे सुरू ठेवलेली ही तपश्चर्या हा महाराष्ट्राच्या औत्सुक्याचा विषय आहे. म्हणूनच आता ही केवळ ध्येयनिष्ठ रसिक कार्यकर्त्यांनी उभारलेली संस्था राहिली नसून, ती उभ्या महाराष्ट्रानं आपली ओळख म्हणून सांगावी अशी सांस्कृतिक चळवळच झाली आहे.
 
महाराष्ट्र म्हणजे स्वातंत्र्यपूर्वकाळापासून कार्यकर्ते आणि संस्था/संघटनांचं मोहोळ आहे. खुद्द महात्मा गांधीजींसह अनेकांनी त्याबद्दल महाराष्ट्राचा नेहमीच गौरव केला आहे. माणसाच्या मूलभूत गरजा भागल्या तरीही प्रत्येकाची एक सांस्कृतिक भूक शिल्लक राहतेच. तिच्या तृप्तीसाठी आपल्या आजूबाजूला गुणवत्तासंपन्न, विधायक काम करणार्‍या संस्था असतील, तर त्या समाजजीवनाला आपोआपच एक सांस्कृतिक समृद्धी मिळू लागते. मनोरंजनासह ज्ञान-प्रबोधनात्मक दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती आणि त्यांचे विविध कला प्रकारांतून आकर्षकपणे सादरीकरण करत राहणे, ही या सांस्कृतिक समृद्धीची सर्वात महत्त्वाची खूण म्हणावी लागेल. ‘चतुरंग’ने आपल्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीत अशा पाऊलखुणांचा जणू महामार्गच तयार केला आहे.
 
कोकणातील चिपळूण परिसरातील खेडेगावांमधील शैक्षणिक काम असो की डोंबिवली-मुंबई परिसरातील सांस्कृतिक कार्यक्रम असोत - तिथे ‘चतुरंग’ची स्वतंत्र, वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण झाली आहे. कोणीही पदाधिकारी नसलेलं दीड-दोनशे कार्यकर्त्यांचं निःस्वार्थ संघटन वर्षानुवर्षे समाजसहभागासह सांभाळणं, हे महाकठीण काम. जागतिकीकरणाच्या लाटेमुळे गेल्या ३०-३५ वर्षांमध्ये तर हे काम सातत्यानं करणं हे आणखीनच अवघड झालं होतं. पण, विद्याधर निमकर यांच्यासह ‘चतुरंग’मधील सर्वांनीच अगदी आपला जीव ओतून हे ‘चतुरंग’चं रोपटं खास निगराणीसह वाढवत ठेवलं आहे.
 
समाजाची शैक्षणिक, सांस्कृतिक उंची वाढवण्यासाठी आपापल्या आवडीच्या क्षेत्रात आयुष्यभर ज्यांनी योगदान दिलं आहे, अशांना सन्मानित करण्याची योजना ‘चतुरंग’ने आखली. पण, त्यासाठी एकच एक धनवान दाता घेतला नाही, तर समाजातील रसिकांनी प्रत्येकी एक हजार रुपये देऊन ही धनराशी तयार झाली. त्यातून सुरू झालेल्या पुरस्काराचं खुद्द पु. ल. देशपांडे यांनीच बारसं केलं - ‘जीवनगौरव पुरस्कार.’ ‘चतुरंग’मधील कार्यकर्त्यांच्या हस्तक्षेपाशिवाय समाजातील जाणत्या मान्यवरांच्या दरवर्षी नव्याने तयार होणार्‍या समितीकडून पुरस्कारासाठी सुयोग्य व्यक्तीची निवड होत असते. सध्या तीन लाख रु. आणि सन्मानचिन्ह, मानपत्र असं घसघशीत स्वरुप प्राप्त झालेला हा ‘चतुरंग जीवनगौरव पुरस्कार’ हजारो रसिकांच्या साक्षीनं एका रंगसंमेलनात ज्या सन्मानपूर्वक दिला जातो, त्यामुळं सार्‍या महाराष्ट्राचीच ही कौतुकाची थाप आहे, असं पुरस्कारप्राप्त मान्यवरांना वाटत राहतं.
 
चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, पु. ल. देशपांडे, सुधीर फडके, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पांडुरंगशास्त्री आठवले, भारतरत्न लता मंगेशकर, नानाजी देशमुख, डॉ. जयंत नारळीकर, पं. सत्यदेव दुबे, साधनाताई आमटे, डॉ. विजय भटकर, प्रो. राम ताकवले, विजया मेहता, डॉ. गो. बं. देगलूरकर, सय्यदभाई अशी ‘चतुरंग जीवनगौरव सन्मान’ लाभलेल्या दिग्गजांची नावं पाहिली की ऊर भरून येतो. त्यांचा सन्मान करण्यासाठी लाभलेल्या अशाच दिग्गज हातांची नावं पाहिली तर तीही अशीच विलक्षण आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, उपपंतपधान लालकृष्ण अडवाणी, सरन्यायाधीश यशवंतराव चंद्रचूड, एअरचीफ मार्शल अनिल टिपणीस, लोकमान्यांचे नातू जयंतराव टिळक, प्रख्यात कवी-गीतकार गुलजारजी, श्याम बेनेगल, ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, प्राचार्य शिवाजीराव भोसले..... अशी ही यादी मोठी आहे.
 
या ‘जीवनगौरव पुरस्कार’ सोहळ्याच्या निमित्तानं दरवर्षी आयोजित केलं जाणारं रंगसंमेलन ही तर ‘चतुरंग’ची निजखूण आहे. एकाच वेळी साहित्य, नाट्य, संगीत, चित्र, नृत्य, गायन, वादन, व्याख्यान, मुलाखत अशा बहुविध कलांचा आविष्कार या रंगसंमेलनातून रसिकांना साक्षात अनुभवता येतो. पं. बिरजू महाराज, उस्ताद झाकीर हुसेन, माधुरी दीक्षित, आर. के. लक्ष्मण, मन्ना डे, महेंद्र कपूर, अरुण दाते, श्रीनिवास खळे, भारतरत्न भीमसेन जोशी, पं. हरिप्रसाद चौरसिया, पं. शिवकुमार शर्मा, मंगेश पाडगावकर, हेमामालिनी, ज्योत्स्ना भोळे, शंकर महादेवन अशा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांसह भारतीय सेना दलाच्या तिन्ही प्रमुखांची ‘चतुरंग’च्या रंगमंचावरील उपस्थिती ही रसिकांसाठी डोळ्यांचं पारणं फेडणारीच झाली आहे.
 
बरं, यासाठी केलं जाणारं आयोजन हे इतक्या बारकाईनं, नीटनेटकं, सौदर्यसंपन्न, आखीव-रेखीव असतं की, रसिक श्रोते अवाक होऊन जातात. कार्यक्रमांच्या निमंत्रणापासून ते कार्यक्रमाच्या समारोपानंतर नाट्यगृहाबाहेर ‘चतुरंग’चे कार्यकर्ते दोन्ही बाजूला विनम्रपणे उभे राहून ज्या पद्धतीने कृतज्ञता व्यक्त करतात, ती पाहिली की, महाराष्ट्राची सांस्कृतिक समृद्धीची खूण तर पटतेच, पण अजूनही टिकून असलेल्या सौजन्यशील आपुलकीचाही दुर्मिळ अनुभव येतो. विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आणि कार्यक्रमांचे उत्तम आयोजन, व्यवस्थापन करण्यामधील चतुरंगच्या मंडळींची गेल्या ५० वर्षांतील हातोटी लक्षात घेता मी तर त्यांना नेहमीच सुचवत आलो आहे की, तुम्ही अशा कार्यक्रमांच्या व्यवस्थापनाचा एक प्रशिक्षण वर्ग सुरू करा. महाराष्ट्रात गावोगावी होणार्‍या कार्यक्रमाच्या संयोजकांना त्याची नितांत गरज आहे. चिपळूण, गोवा, मुंबई, डोंबिवली आणि गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यनगरीत ‘चतुरंग’ची रंगसंमेलनं झाली आहेत. अशी संमेलनं, विविध सांस्कृतिक कार्यक्रम ‘चतुरंग’नं आता उर्वरित महाराष्ट्रात आणि बृहन्महाराष्ट्रात देखील घ्यायला हवेत, असं वारंवार वाटत राहतं. ‘चतुरंग’चे कार्यक्रम म्हणजे सृजनांचे स्नेहमेळावेच असतात. त्यानिमित्ताने घ्यावयाचे औपचारिक उपक्रमदेखील किती जिव्हाळ्यानं, आपुलकीनं, अनौपचारिकपणे, शिस्तीला-अगत्यशीलतेची जोड देऊन कसे करता येतात? हे अनुभवायचं असेल, तर त्यासाठी ‘चतुरंग’ हे दीपस्तंभासारखे उदाहरण आहे. येणार्‍या प्रत्येकच रसिकाला अतिथी समजून त्याचं सांस्कृतिक विश्व अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असलेली, आग्रही असलेली ‘चतुरंग’ ही आता महाराष्ट्राची सांस्कृतिक चळवळच झाली आहे. तिनं आता सीमोल्लंघन करायला हवं. वेगानं बदलत चाललेला आपला देश आणि नवी पिढी अशा अनेक ‘चतुरंगी’ संस्थांच्या प्रतिक्षेत आहे.
‘चतुरंग’च्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
 
 
 लेखक - डॉ. सागर देशपांडे