नाशिक : नाशिक जिल्ह्यातील भगूर हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मस्थान. देशाच्या स्वातंत्र्यानंतर भगूरमध्ये सावरकरांचे जन्मभूमी स्मारक व्हावे यासाठी भगूरमधील राष्ट्रभक्त मधुकर अण्णा जोशी, एकनाथराव शेटे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी तत्कालीन जनसंघाचे आ. रामभाऊ म्हाळगी यांच्या माध्यमातून अतोनात प्रयत्न, आंदोलन तथा संघर्ष केला.
अखेर, पुढे भाजप-सेनेच्या युती शासन काळात भगूरमध्ये सावरकरांचे जन्मभूमी स्मारक निर्माण झाले. परंतु, या स्मारकात सुरूवातीस अपेक्षित असलेले सावरकर साहित्य, त्यांच्या प्रतिमा, विक्रीस समग्र सावरकर साहित्य उपलब्ध नव्हते. पुढे देवेंद्र फडणवीस यांच्या शासन काळात प्रथमच महाराष्ट्राच्या इतिहासात मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत भगूरला स्वा. सावरकर जयंती उत्सव मोठ्या अभिमानाने संपन्न झाला. नंतर रणजीत सावरकरांच्या सहकार्याने स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई मार्फत सावरकर साहित्य उपलब्ध झाले, पुढे राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा व विवेक व्यासपीठ, मुंबई यांच्यावतीने सावरकर विचारांच्या प्रचार प्रसारासाठी सावरकर थीमपार्क संकल्पना उदयास आली होती. सावरकरांचे कोणतेही काम हे अडथळ्यांशिवाय पूर्ण होत नाही, म्हणतात ना तसे विविध प्रक्रिया होते.
आता महायुती सरकारच पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनपट उलगडून दाखवणारे स्मारक सांस्कृतिक थीमपार्कच्या रुपात ४० कोटी रुपयांचा खर्च करून साकारणार आहे. सावरकर यांच्या निवासस्थानाजवळच दोन हेक्टरवर हे थीमपार्क साकारण्यात येईल. या ठिकाणी त्यांच्या शपथेपासून संपूर्ण जीवन संघर्ष दर्शन, त्यांचे लेखन, क्रांतिकारकांच्या भेटी, अंदमान वास्तव्य, जन्मठेप शिक्षा हे सर्व कथाकथन दृकश्राव्य माध्यमातून सादर केले जाणार आहे. सावरकरांच्या थीमपार्कमुळे भगूर हे गाव पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर प्रकाशमान होणार आहे. भगूर शहराचा या सावरकर थीमपार्कमुळे सर्वांगीण विकास साधला जाणार आहे. भगूरमध्ये पर्यटकांची संख्या वाढत जाणार आहे.
भगूर येथील बाजारपेठेतील व्यापार प्रगत होण्यास नव्याने चालना मिळणार आहे. भगूर शहरातील रस्ते, पूल व परिसर सुव्यवस्थित होण्यास मदत होणार आहे. विविध प्रकारचे व्यवसाय त्यात हॉटेल इतर अनेक छोटे मोठे उद्योग व्यवसाय वाढीस लागण्यास निश्चित उपयोग होईल, अनेक व्यवसायामुळे शहरातील तरुणांना रोजगार संधी प्राप्त होणार आहे. गावातील शिक्षण, सहकार, बँका आणि पतसंस्था आदी क्षेत्र विकसित होत सर्वांची प्रगती साधणार आहे. शहरातील व परिसरातील बेकारी, अस्वछता, रोगराई नष्ट होईल. भगूर शहर हे महाराष्ट्राच्या इतिहासात प्रेक्षणीय स्थळ म्हणून, देशभक्तीचा संस्कार देणारे ऊर्जा केंद्र बनणार आहे. सावरकरांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडविणारे भगूर शहर हे सर्व समाजातील सर्वांना प्रेरणादायी तीर्थक्षेत्र ठरणार आहे.भगूर शहराचा सर्वार्थाने सर्वांगीण विकास साधला जाणार आहे. तसेच, क्रांतिसुर्य सावरकरांच्या या सांस्कृतिक थीमपार्कमुळे भगूरमध्ये विकासाची पहाट होणार असा विश्वास व्यक्त करून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पवित्र स्मृतींना कोटी कोटी प्रणाम करतो.
वंदे मातरम्!