‘धर्मवीर’च्या तिसऱ्या भागात ‘हा’ अभिनेता साकारणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भूमिका

27 Sep 2024 12:58:04
 
dharmaveer 2
 
 
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : प्रविण तरडे लिखित-दिग्दर्शित आणि झी स्टुडिओज व मंगेश देसाई निर्मित ‘धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ हा चित्रपट आज २७ सप्टेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटात दिघे साहेब आणि हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाची व्याख्या काय होती हे अधोरेखित करण्यात आले. आणि महत्वाची बाब म्हणजे नगरविकास मंत्री असताना शिवसेनेत नेमकं काय घडलं? ज्यामुळे एकनाथ शिंदेंनी मोठं पाऊस उचललं आणि थेट गुवाहाटी गाठली? महाराष्ट्राच्या राजकारणात २०२२ ला घडलेल्या राजकारणातील नाटकाचा पडदा लवकरच धर्मवीर चित्रपटाच्या तिसऱ्या भागात उघडला जाणार आहे. भाजपसोबत पुन्हा युती करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काय भूमिका होती हे देखील तिसऱ्या भागात दिसणार असून त्यांची भूमिका मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते साकारणार आहेत.
 
‘धर्मवीर २’ चित्रपटाच्या शेवटी तिसऱ्या भागाची नांदी करण्यात आली. यावेळी एकनाथ शिंदे यांना फोनवर दिलासा देत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा निर्धार देणारे देवेंद्र फडणवीस दिसले. धर्मवीरच्या तिसऱ्या भागात अभिनेते सुनील बर्वे देवेंद्र फडणवीसांची भूमिका साकारणार आहेत. ‘दै. मुंबई तरुण भारत’शी बोलत असताना सुनील बर्वे म्हणाले की, चित्रपटाच्या तिसऱ्या भागात प्रेक्षकांना राजकारणाची तिसरी बाजू देखील दिसणार आहे. आणि त्यात मी देवेंद्र फडणवीस यांची भूमिका साकारत असल्याचा मला अत्यानंद झाला आहे”, अशा भावना सुनील बर्वे यांनी व्यक्त केल्या.
 
दरम्यान, धर्मवीर २ चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांची तर क्षितीश दाते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटात सच्चा शिवसैनिक आणि कट्टर हिंदुत्ववादी असणाऱ्या साहेबांबद्दल अनेक गोष्टींचा उलगडा नक्कीच करण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0