लादेन हा ए.पी.जे. अब्दुल कलामांच्या तोडीचा मुसलमान; आव्हाडांच्या पत्नीची मुक्ताफळे!
27-Sep-2024
Total Views |
ठाणे: येनकेन प्रकारे नेहमीच बरळणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनीही पतीचा कित्ता गिरवत भयंकर मुक्ताफळे उधळली आहेत. त्यांनी माजी राष्ट्रपती भारतरत्न ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची तुलना चक्क खुंखार आतंकवादी ओसामा बिन लादेन याच्याशी केली आहे. ऋता आव्हाड यांनी “ओसामा बीन लादेनला समाजाने आतंकवादी बनवले. नाही तर, तोदेखील ए. पी. जे. कलाम यांच्याच तोडीचा मुसलमान होता,” अशी मुक्ताफळे उधळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
‘एनएसपी केअर फाऊंडेशन’ नामक तथाकथित सामाजिक संस्थेने बुधवार, दि. २५ सप्टेंबर रोजी मुंब्य्रातील कौसा येथील सिमला पार्क येथील नुरबाग सभागृहात महिला आणि युवती मार्गदर्शन मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला शरद पवारांच्या कन्या राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे, अभिनेत्री स्वरा भास्कर संबोधित करणार होत्या. मात्र, सुळे मुंब्य्रात आल्याच नाहीत. त्या कार्यक्रमात उपस्थित महिलावर्गाला संबोधित करताना जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी देशाच्या माजी राष्ट्रपतीबाबत आक्षेपार्ह मुक्ताफळे उधळली. म्हणे, “ओसामा बिन लादेन हा ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या तोडीचा मुसलमान होता.” म्हणजेच, लादेनमध्ये आव्हाडांच्या पत्नीला हिरो दिसतोय. जगातील कुख्यात दहशतवाद्याचे इतके जाहीर समर्थन एका राजकारण्यांची पत्नी करते, हे खरोखरच दुर्दैवी असल्याची चर्चा सर्वत्र रंगली असून संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, इतकी भयानक मुक्ताफळे उधळल्यानंतर पुन्हा प्रसारमाध्यमांशी बोलताना ऋता आव्हाड चक्क पत्रकारांवरच घसरल्या. “आजकाल पत्रकारांचे वाचनच नसते. हल्लीच्या पिढीला मोबाईलचे वेड लागले आहे. त्यामुळे वाचन अजिबात होत नाही. अशा पत्रकारितेची खूप कीव करावीशी वाटते,” असे सांगून “ओसामा बिन लादेन याचा एन्काऊंटर नव्हे, तर वध झाला आहे,” असे ऋता आव्हाड म्हणतात.