'सोशल सैनिक' घरोघरी पोहोचवणार सरकारची कामे; युवासेना, महिला आघाडीचा सहभाग

27 Sep 2024 14:16:42

shrikant shinde
 
मुंबई : महायुती सरकारची कामे घरोघरी पोहोचवण्यासाठी शिवसेनेने ‘महाविजय संवाद’ या राज्यव्यापी दौऱ्याची गुरुवार, दिनांक २६ सप्टेंबर रोजी घोषणा केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा सेना, महिला आघाडी आणि शिवसेना सोशल मीडिया या तीन विभागांकडून शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबरपासून राज्यभरात हे अभियान राबवले जाणार आहे. यात प्रत्येक विधानसभा मतदार संघाचा आढावा घेऊन पक्ष संघटना मजबूत केली जाईल, अशी माहिती शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.

बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिंदे म्हणाले, गेल्या दोन अडीच वर्षांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकारने केलेली कामे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. त्यासाठी पक्षाने ‘महाविजय संवाद’ हे आणखी एक जनसंपर्क अभियान तयार केले आहे. या अंतर्गत दररोज एका नेत्याने व उपनेत्याने एक विधानसभा मतदार संघाला भेट द्यावी. त्यातील ५ ठिकाणी जाऊन गाठीभेटी घेणे, मेळावे घेतले पाहिजेत, असे या दौऱ्याचे स्वरुप आहे. उद्या शुक्रवारपासून महाविजय संवाद अभियान सुरु होणार असून पहिला टप्पा पाच दिवसांचा असेल.

युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात शुक्रवारपासून युवा सेनेकडून भिवंडी ग्रामीणपासून अभियानाची सुरुवात होईल. दररोज ६ विधानसभांना भेट देणार असून यात शाखा भेटी, मेळावे घेतले जातील. नवरात्रौत्सवात मुंबई आसपास विधानसभांना भेटी दिल्या जातील.१३ ऑक्टोबरपासून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि पुढे कोकण असा युवा सेनेचा दौरा असेल, अशी माहिती पूर्वेश सरनाईक यांनी यावेळी दिली.

कोकणपासून विदर्भापर्यंत दौरे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, लेक लाडकी योजना, मुलींना मोफत शिक्षण या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या आहेत का, याचा आढावा महिला आघाडी घेईल, असे शिवसेना नेत्या मीना कांबळी यांनी सांगितले. शिवसेना लाडकी बहिण संपर्क अभियान कोकणपासून विदर्भापर्यंत एकाच दिवशी १८ विधानसभांमधून सुरु होणार असून त्याचे नेतृत्व मीनाताई कांबळी करणार आहेत. शिवसेना युवासेनेचे सरचिटणीस आणि शिवसेना सोशल मीडिया राज्य प्रमुख राहुल कनाल यांच्या नेतृत्वात शिवसेना सोशल सैनिकांकडून उद्यापासून नाशिक, नंदुरबार, धुळे, शिर्डी, नगर असा दौरा सुरु होणार आहे. 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0