महाराष्ट्रासह गुजरात, पश्चिम बंगाल, सिक्कीम या राज्यांना सतर्कचा इशारा
27-Sep-2024
Total Views |
मुंबई : राज्यात मागील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २८ सप्टेंबर रोजीपर्यंत राज्यात विविध ठिकाणी कमी-अधिक पाऊस पडणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात दिनांक २८ सप्टेंबर रोजीपर्यंत पावसाची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासह गुजरात, उपहिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम या राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान, अतिवृष्टीची शक्यतादेखील अनेक ठिकाणी वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ नरेश कुमार म्हणाले की, “आज महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडेल. तसेच, चक्रीवादळाचे परिचलन पश्चिमेकडे सरकले आहे. दरम्यान, कोकण-गोवा, गुजरात प्रदेश आणि महाराष्ट्रासाठी ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे,” असेही त्यांनी सांगितले.
“पुढील दोन ते तीन दिवसांत पश्चिम हिमालयीन प्रदेश, मध्य, पूर्व आणि ईशान्य भारतामध्ये मुसळधार पावसासह वाढीव पावसाची शक्यता आहे. दिल्लीत दोन दिवस हलका पाऊस पडू शकतो. तर, उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्येही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, गुरुवार, दि. २६ सप्टेंबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस वर्तवण्यात आला होता. तर, आज शुक्रवार, दि. २७ सप्टेंबर रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे,” असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
महाराष्ट्रात विजांसह गडगडाटी पावसाचा इशारा
हवामान विभागानुसार, गोंदिया, भंडारा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, नाशिक, जळगाव, नंदूरबार, नगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांत विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील ४८ तास घाटक्षेत्रात पर्यटन टाळावे
पालघर, ठाणे, मुंबई-उपनगरे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आदी ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पुढील ४८ तास घाटक्षेत्रात पर्यटन टाळावे. फ्लॅश फ्लड, दरड कोसळणे, झाडे, भिंती पडणे शक्य असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.