मुंबई : मराठी बिग बॉसच्या पाचव्या सीझनचा फिनाले जवळ येत चालला आहे. तसे, दिवसेंदिवस टास्क अधिक कठोर आणि कधी सदस्यांच्या डोळ्यांत पाणी आणत त्यांना भावनिक करणारे आहेत. नुकताच, बिग बॉसच्या घरात फ्रिझ-रिलिजचा टास्क झाला आणि दरम्यान, घरातील सदस्यांना भेटायला त्यांच्या घरातील मंडळी आले होते. कधीही आजवर मुंबईत न आलेल्या वडिलांना या टास्कमुळे आणि बिग बॉसमुळे आलेलं पाहून अंकिता वालावलकरला अश्रु अनावर झाले होते.
इतके दिवस घरापासून आणि कुटुंबीयांपासून लांब राहिलेल्या आपल्या माणसांना पाहून घरातील सदस्य भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे. नुकत्याच टेलिकास्ट झालेल्या भागात वर्षाताई, अभिजीत, धनंजय आणि जान्हवी या सदस्यांचे कुटुंबीय घरात आलेले दिसले. या सदस्यांना बिग बॉसने खास सरप्राइज दिलं. आता कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावालकरला बिग बॉसकडून एक सुखद धक्का मिळाला आहे.
अंकिताच्या बहिणींबरोबरच तिचे वडीलही कोकण हार्डेट गर्लला भेटण्यासाठी बिग बॉस मराठीच्या घरात येणार आहेत. बिग बॉसच्या घरातील एक व्हिडिओ समोर आला असून यात अंकिताच्या बहिणी सुरुवातीला घरात आल्याचं दिसत आहे. त्यानंतर अंकिताला बिग बॉसकडून एक सरप्राइज मिळतं. कोकण हार्टेड गर्लच्या ध्यानीमनी नसतानाही बिग बॉसच्या घरात तिच्या बाबांची एन्ट्री होती. वडिलांना पाहताच अंकिताला रडू कोसळतं आणि ती ढसाढसा रडत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे.
कधीच मुंबईत न आलेल्या वडिलांना 'बिग बॉस मराठी'मुळे मुंबईत येण्याची संधी मिळाली, यासाठी अंकिता 'बिग बॉस मराठी'चे मनापासून आभारही मानत असल्याचं दिसत आहे. दरम्यान, ६ ऑक्टोबरला 'बिग बॉस मराठी'चा अंतिम सोहळा रंगणार असून 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता मिळणार आहे. आता घरात राहिलेल्या वर्षाताई, अभिजीत, पॅडी, अंकिता, सूरज, जान्हवी, निक्की, धनंजय या सदस्यांपैकी कोण 'बिग बॉस मराठी'ची ट्रॉफी नावावर करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.