रत्नागिरी : हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंनी दापोलीतून विधानसभा निवडणूक लढवून दाखवावी, असं आव्हान शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी दिलं आहे. तसेच पुन्हा एकदा शिंदे साहेबच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांनी शुक्रवारी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला.
योगेश कदम म्हणाले की, "आदित्य ठाकरे याआधीही दोनदा दापोली मतदारसंघात येऊन गेले आहेत. उद्धव ठाकरेसुद्धा एकदा येऊन गेलेत. पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्यानंतर लागलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीतही आम्ही चांगलं काम करून दाखवलं. आदित्य ठाकरेंनी शिंदे साहेबांनी आव्हान दिलं होतं. परंतू, आदित्य ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी दापोलीमध्ये येऊन माझ्यासमोर निवडणूक लढवावी. त्यानंतर जनता कोणासोबत आहे ते बघावं, असं माझं आव्हान आहे."
शिंदे साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार!
ते पुढे म्हणाले की, "गेली ५ वर्षे सातत्याने माझा मतदारसंघात संपर्क आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूकीतील फरक गावोगावी लक्षात येतोय. दापोली मतदारसंघात लोकसभेला जो बॅकलॉग होता त्यापेक्षा ४ ते ५ पट जास्त मताधिक्य विधानसभेत मिळेल, असा माझा अंदाज आहे. लोकसभेपेक्षाही शिवसेना पक्षाचा चांगला परफॉर्मन्स विधानसभेच्या निवडणूकीत पाहायला मिळेल. शिवसेनेच्या कमीत कमी ६५ ते ७२ जागा निवडून येतील आणि पुन्हा एकदा शिंदे साहेबच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.