चमका चमका किस्मत का तारा...

27 Sep 2024 22:21:56
 
Tomas Neff
 
रशियाकडून मिखायलोव्ह आणि अमेरिकन गृहखाते यांच्यात रीतसर करार झाला. १९९३ पासून २०१३ पर्यंत तब्बल २० वर्षे सोव्हिएत प्रक्षेपणास्त्रे डिसमेंटल होत राहिली आणि युरेनियम अमेरिकेच्या बाल्टिमोर बंदरात उतरत राहिले. किमान दोन हजार वॉरहेड्स निकामी करण्यात आली आणि किमान १५ हजार टन युरेनियम अमेरिकेला मिळाले.
 
१ सप्टेंबर १९३९ या दिवशी हिटलरच्या जर्मन नाझी सेना पोलंडवर तुटून पडल्या आणि दुसर्‍या महायुद्धाला अधिकृतपणे सुरुवात झाली. पण, महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन आणि त्याच्यासारख्याच अनेक द्रष्ट्या लोकांना १९३३ सालापासूनच युद्धाची चाहूल लागली होती. पहिल्या महायुद्धातील पराभवाने कमालीचा संतापलेला जर्मनी, संपूर्ण जग साम्यवादाच्या लाल पंजाखाली आणण्याची राक्षसी महत्त्वाकांक्षा बाळगणारा सोव्हिएत रशिया आणि आमच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नाही, या पिढीजात मिजासीत वावरणारा ब्रिटन यांच्यात जबरदस्त संघर्ष होणार, हे या द्रष्ट्यांना दिसत होते.
 
दि. २ ऑगस्ट १९३९ या दिवशी म्हणजे महायुद्ध सुरु होण्याच्या ठीक एक महिना अगोदर अल्बर्ट आईनस्टाईनने अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांना एक पत्र लिहिले. त्याचा आशय असा होता की, जानेवारी १९३९ मध्ये अणुविज्ञान क्षेत्रात काही फारच महत्त्वपूर्ण संशोधन झालेले आहे. परिणामी, हिटलरच्या नेतृत्वाखालील नाझी पक्षाचे सरकार त्यातून अणुबॉम्ब निर्माण करण्याचा आदेश जर्मन लष्कराला देऊ शकते. तेव्हा अमेरिकन सरकारनेही त्वरेने निर्णय घेऊन अण्वस्त्रसज्ज व्हावे. याला म्हणतात द्रष्टेपणा. या पत्रावर आईनस्टाईनची सही असली, तरी त्यातले विचार त्याचे एकट्याचे नव्हते. लिओ झिलार्ड, एडवर्ड टेलर, यूजिन विग्नर इत्यादी भौतिकशास्त्रज्ञांनी मिळून काळजीपूर्वक त्या पत्राचा मसुदा बनवलेला होता.
 
राष्ट्राध्यक्ष रूझवेल्टने या पत्रावर तातडीने कारवाई सुरु केली. तरीसुद्धा ‘मॅनहॅटन प्रोजेक्ट’ हा अत्यंत, गुप्त, संवेदनशील प्रकल्प उभा राहून लास आलमॉस येथे प्रत्यक्ष अणुबॉम्ब बनवण्याची प्रयोगशाळा उभी राहीपर्यंत १९४२ साल उजाडले. या प्रयोगशाळेत निर्माण झालेले दोन अणुबॉम्ब १९४५साली जपानवर पडले. अत्यंत भीषण असा संहार झाला आणि महायुद्ध संपले, हे आपल्याला माहीतच आहे.
 
प्रत्यक्ष रणांगणावरचे युद्ध संपले, तरी यापेक्षाही अधिक भीषण असे शीतयुद्ध लगेचच सुरु झाले. याला कारणीभूत होती जोसेफ स्टालिन या सोव्हिएत रशियन सत्ताधीशाची जबरदस्त महत्त्वाकांक्षा. हिटलरला संपूर्ण जग नाझी साम्राज्याच्या टाचेखाली घालायचे होते, तर आता स्टालिनला जगभर लाल साम्यवादी क्रांतीचा फैलाव करायचा होता आणि हा भविष्यकाळ नव्हता. हिटलरच्या तावडीतून सोडवलेल्या पूर्व युरोपीय देशांमध्ये आता सोव्हिएत रशियन सेना ठाण मांडून बसल्या, जर्मन सेना पराभूत झाल्यावर आता सोव्हिएत सेना आणि अँग्लो-अमेरिकन सेना यांच्यात युद्ध पेटण्याची शक्यता दिसू लागली.
 
मोठ्या मिनतवारीने हे प्रत्यक्ष युद्ध थांबले. पण, अमेरिकेच्या नेतृत्वाखालचे लोकशाही देश आणि सोव्हिएत नेतृत्वाखालचे साम्यवादी देश, असे दोन अत्यंत शक्तिशाली राजकीय-लष्करी गट निर्माण झाले. हे गट म्हणजे त्यांच्या सेना कायम एकमेकांविरुद्ध युद्धाचा पवित्रा घेऊन उभ्या राहिल्या.
 
विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची घोडदौड सुरुच होती. नाझी राजवटीच्या अखेरच्या कालखंडात हिटलरच्या शास्त्रज्ञांंनी नुसती अण्वस्त्रेच सज्ज केली होती, असे नव्हे, तर अण्वस्त्रवाहक अग्निबाण किंवा क्षेपणास्त्रेदेखील जवळपास पूर्णत्वाला नेली होती. म्हणजे, अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकताना तेे विमानातून त्या शहरांच्यावर आकाशातून टाकले होते. जर्मन हवाईदलाला याची गरज नव्हती. ते क्षेपणास्त्राच्या माथ्यावर अणुबॉम्ब बसवून ते क्षेपणास्त्र शत्रूच्या शहरावर डागण्याच्या जवळपास सिद्धतेत आलेले होते. याला तांत्रिक भाषेत ‘बॅलेस्टिक मिसाईल्स विथ ऑटोमिक वॉर हेड्स’ असे म्हटले जाते. परंतु, ही सिद्धता पूर्ण होण्याआधीच जर्मनीला शरणागती यावी लागली. जर्मन राजधानी बर्लिनच्या चॅन्सलरीवर म्हणजे प्रमुख सरकारी कार्यालयावर सर्वप्रथम सोव्हिएत लाल सेनेने आपले विजयी निशाण फडकावले खरे, पण अँग्लो-अमेरिकेने खरी बाजी मारली. त्यांनी हिटलरचे अनेक प्रमुख अणुशास्त्रज्ञ, प्रक्षेपणास्त्रतज्ज्ञ यांना अगोदरच पळवून आणले आणि लंडनमार्गे अमेरिकेत नेले. काही थोडे जर्मन शास्त्रज्ञ सोव्हिएत सेनेच्याही हाती लागले. त्यांना मॉस्कोला नेण्यात आले.
 
आता शीतयुद्धात आण्विक प्रक्षेपणास्त्र स्पर्धा सुरु झाली. जास्तीत जास्त तांब पल्ल्याची बॅलेस्टिक मिसाईल्स बनवणे, त्यांच्या वॉरहेडवर अधिकाधिक संहारक अण्वस्त्रे बसवणे आणि या सगळ्याची भरपूर जाहिरात करून प्रतिपक्षाला दबावात आणणे, हीच एक नवी स्पर्धा लागली. मग त्यातून असे म्हटले जाऊ लागले की, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणि सोव्हिएत राष्ट्राध्यक्ष मनात आणतील तर बसल्याजागी फक्त एक बटण दाबून प्रतिस्पर्धी गटाची आणि त्याचबरोबर संपूर्ण जगाची फक्त दोन मिनिटांत राखरांगोळी करू शकतील. ही साहित्यिक कल्पना नसून वस्तुस्थिती होती. जसजशी वर्षे मागे पडत होती, तसतशी दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध सज्ज करून ठेवलेल्या क्षेपणास्त्रांची संख्या वाढतच होती. अगोदर यांच्यावरील अण्वस्त्रे युरेनियमने बनवलेली होती. मग ती अधिक उच्च दर्जाच्या युरेनियमची, मग प्लुटोनियमची झाली. म्हणजे, अधिक तीव्र संहारक बनत गेली. हिरोशिमा-नागासाकीवर वापरले गेलेले अणुबॉम्ब हे कसे प्राथमिक दर्जाचे होते आणि आता या एकेका वॉरहेडवरचा अणुबॉम्ब त्यांच्यापेक्षा कित्येक पट जास्त संहारक कसा आहे, हे दोन्ही गट चवीचवीने वर्णन करून सांगत असत.
 
अखेर १९९१ साली सोव्हिएत रशियाच्या पतनाबरोबरच हा सगळा फुगा फुटला. पण, म्हणजे काय झाले? हा काही नुसताच हवा भरून फुगवलेला फुगा नव्हता. तिथे खरोखरचीच अण्वस्त्रे ठेवलेली होती. अनंत संहारक आणि म्हणूनच अत्यंत संवेदनशील. त्यांचे प्रत्यक्षात काय झाले? ‘नाटो’ गटाने म्हणजेच अमेरिका आणि तिच्या नेतृत्वाखालील युरोपीय राष्ट्रांनी आपल्या हद्दीतील क्षेपणास्त्रे अतिशय पद्धतशीरपणे, शिस्तीने काढून घेतली-डिसमेंटल केली. यांच्यामधील युरेनियम, समृद्ध युरेनियम, प्लुटोनियम इत्यादी द्रव्ये योग्य त्या व्यवस्थेसह विविध प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आली. पाश्चिमात्य देशांना वीजनिर्मितीसाठी त्यांचा उपयोग होताच.
 
युरोपच्या इतिहासात पूर्वी राष्ट्रनेत्यांनी वेळेनुसार दोन्ही प्रकारच्या घोषणा दिलेल्या होत्या-‘तलवारी मोडा नि नांगर बनवा’ किंवा ‘नांगराचे फाळ आता भाल्यांचे फाळ बनू द्या’ इत्यादी. जनतेनेही प्रसंग ओळखून त्याप्रमाणे वागून आपल्या नेत्यांना प्रतिसाद दिला होता. आता पुन्हा तलवारी मोडून शेतीला उपयुक्त असे नांगर बनवण्याचा काळ होता. पण, काळानुसार घोषणापण थोडी बदलली-‘मेगाटन टु मेगावॅट’. अमुक मेगाटन क्षमतेचा बॉम्ब नकोय, अमुक मेगावॅट शक्तीचे टर्बाइन हवेय. पण, इकडे युरोप-अमेरिकेत त्या संहारक साहित्याचे रुपांतर रचनात्मक शक्तीत होत असताना सोव्हिएत बाजूला काय घडत होते?
 
सोव्हिएत गटाचा पराभव हा रणांगणावर झालेला नसून आर्थिक आघाडीवर झालेला होता. सोव्हिएत राज्यपद्धती आणि समाजव्यवस्थेतून निर्माण झालेली सुबत्ता ही पूर्णपणे खोटी होती. स्टालिन, खुश्चेव्ह आणि ब्रेझनेव्ह यांनी खोट्या सुबत्तेचे ते नाटक ७० वर्षे रेटून नेले. पण, पैशाची सोंगे किती काळ चालणार? १९८५ साली सोव्हिएत राष्ट्राध्यक्ष बनलेले मिखाईल गोर्बाचेव्ह यांना हा पोकळ, खिळखिळा डोलारा चालवणे अशक्य होऊन बसले आणि त्यांनी स्वतःच्या हाताने ते पोकळ साम्राज्य विसर्जित करुन टाकले.
 
दि. ३१जुलै १९९१ या दिवशी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश थोरले आणि सोव्हिएत राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेेव्ह यांनी एका ऐतिहासिक करारावर सह्या केल्या. त्याला ‘स्टॅ्रटेजिक आर्म्स रिडक्शन ट्रिटी’ किंवा ‘स्टार्ट’ असे नाव नंतर दिले गेले. दोन्ही प्रतिस्पर्धी गटांनी एकमेकांविरुद्ध सज्ज ठेवलेली आण्विक क्षेपणास्त्रे टप्प्याटप्प्याने काढून घेऊन निकामी करणे, हा या कराराचा मुख्य भाग होता. अमेरिकन गट आपल्या क्षेपणास्त्रांची विल्हेवाट लावण्यास सर्व दृष्टींनी सक्षम होताच. पण, सोव्हिएत गट? सोव्हिएत गटाची आर्थिक तंगी इतकी जबर होती की, अनेक ठिकाणच्या प्रक्षेपणास्त्र प्रकल्पांवरच्या वैज्ञानिकांपासून ते साध्या शिपायापर्यंतच्या कर्मचार्‍यांचे अनेक महिन्यांचे पगार थकले होते. अशा तंगीमुळे हेे वैज्ञानिक त्या प्रक्षेपणास्त्रांचे सुटे भाग, नकाशे किंवा समृद्ध युरेनियम हे उत्तर कोरिया, चीन किंवा इराणला विकणार तर नाहीत ना, अशी भीती अमेरिकन आणि सोव्हिएत दोन्हीकडच्या नेत्यांंना वाटत होती. यावरचा सोपा उपाय म्हणजे अँग्लो-अमेरिकन तज्ज्ञांना सोव्हिएत प्रकल्पांमध्ये प्रवेश देऊन त्यांच्याकरवी ती प्रक्षेपणास्त्रे निकामी करवून घेणे. पण, याचा दुसरा अर्थ आपली सगळी वैज्ञानिक गुपिते त्यांना उघड करून देणे. सोव्हिएत शास्त्रज्ञांची याला अर्थातच तयारी नव्हती.
 
अशा कुचंबलेल्या बैठकीतून सोव्हिएत अणुशक्ती खात्याचा उपमंत्री व्हिक्टर मिखायलोव्ह हा सिगारेट फुंकायला बाहेरच्या गॅलरीत आला. अमेरिकन अणुशक्ती खात्यातला एक भौतिक शास्त्रज्ञ टॉमस नेफ हा त्याच्यापाठोपाठ बाहेर आला. अनौपचारिक गप्पा मारता मारता नेफने मिखायलोव्हसमोर अगदी, व्यावहारिक प्रस्ताव ठेवला-‘जे आम्हाला हवं ते तुम्ही द्या. जे तुम्हाला हवं ते आम्ही देतो.’ आम्हाला वीज बनवण्यासाठी युरेनियम हवे आहे. तुम्ही अण्वस्त्रांमधून युरेनियम घेऊन आम्हाला पुरवा. प्रक्षेपणास्त्रांच्या निकामीकरणाचा तुमचा प्रश्न सुटला. आम्हाला युरेनियम मिळाले आणि आम्ही तुम्हाला रोकडा पैसा देतो. तुम्ही जितके युरेनियम द्याल, तेवढा बाजारभावाने पैसा. म्हणजे तुम्हाला त्या युरेनियमसाठी बाजारपेठ शोधत बसायला नको. आता तुम्हाला त्वरित रोख पैसा हवाच आहे.
 
अनौपचारिक गप्पा फळाला आल्या. रशियाकडून मिखायलोव्ह आणि अमेरिकन गृहखाते यांच्यात रीतसर करार झाला. १९९३ पासून २०१३ पर्यंत तब्बल २० वर्षे सोव्हिएत प्रक्षेपणास्त्रे डिसमेंटल होत राहिली आणि युरेनियम अमेरिकेच्या बाल्टिमोर बंदरात उतरत राहिले. किमान दोन हजार वॉरहेड्स निकामी करण्यात आली आणि किमान १५ हजार टन युरेनियम अमेरिकेला मिळाले. हे सगळे अगदी छान पार पडले, असे नव्हे. अमेरिकन गृहखात्यात काहीतरी भानगड झाली. पैसे वेळेवर पोहोचले नाहीत. पुढची शिपमेंट थांबवण्यात आली. मिळेल ते विमान पकडून टॉमस नेफला मॉस्कोकडे धाव घ्यावी लागली, हे अनेकदा घडलेच. पण, अखेर सगळा व्यवहार ठरवल्यानुसार पार पडला.
 
असा हा डॉ. टॉमस नेफ दि. ११ जुलै २०२४ रोजी वयाच्या ८०व्या वर्षी मरण पावला. अनौपचारिक गप्पांमधून त्याने संपूर्ण अमेरिकेला दोन वर्षे वीज पुरवेल इतके युरेनियम मिळवले.
 
Powered By Sangraha 9.0