मुंबई : मिठी नदीलगतच्या सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या प्रार्थनास्थळांवर कारवाई करण्याची ग्वाही पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे. तसेच त्यांनी याविरोधात स्थानिक हिंदूंनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.
मिठी नदीलगतची सरकारी जमिनी आणि असल्फा येथील महानगरपालिका उद्यानात अतिक्रमण करून बांधलेली अनाधिकृत प्रार्थना स्थळे आणि कर्णकर्कश भोंग्याविरुद्ध निर्णायक कार्यवाहीबाबत स्थानिक हिंदूंनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. शुक्रवार, दि. २७ सप्टेंबरपर्यंत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी गुरुवारी पालिका प्रशासनासोबत बैठक घेतली.
बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना लोढा म्हणाले की, "याप्रकरणी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे. ते काय कारवाई करतात, ते पाहून उद्याच्या मोर्चाबाबत निर्णय घेतला जाईल. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात मुंबईत बांगलादेशींची संख्या वाढली. हिंदूंच्या व्यवसायांवर गंडांतर आणण्याचे षड्यंत्र सुरू आहे. स्टेशनच्या ५०० मीटर परिसरात फेरीवाले नको, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्याचे पालन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अन्यथा धारावीतील मशीदीवर तोडक कारवाई!
धारावीतील सुबहानी मशीदीचा अनधिकृत भाग स्वतःहून हटविण्याची लेखी हमी विश्वस्तांनी दिली आहे. त्यांनी त्याची पूर्तता न केल्यास महापालिकेच्या वतीने संबंधित बांधकाम पाडले जाईल, असा इशाराही मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिला आहे.