शिर्डी : आपल्या मंत्रालयात आपण सर्वांना प्रवेश देतो. कुठलीही अडवणूक केली जात नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत लोकं कधी रोष व्यक्त करतात. पण आम्ही त्या महिलेचं म्हणणं काय होतं ते समजून घेऊ, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. गुरुवारी सायंकाळी एका महिलेने मंत्रालयातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयात गोंधळ घालत नासधूस करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिने फडणवीसांच्या नावाची पाटी काढून फेकून दिली. यावर आता फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "त्या महिलेचं काय म्हणणं होतं? तिने ते कशासाठी केलं? हे आम्ही समजून घेऊ. तिने ते उद्विग्नतेने केलं का, तिची काही व्यथा आहे का, हे सगळं समजून घेऊन तिची व्यथा दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू. विरोधक खूप निराश आणि हताश आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे मुद्दे नाहीत. माझ्याकडे त्यांच्यावर टीका करण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. पण कुणी खालच्या स्तरावर उतरल्यामुळे आपण उतरायचं नसतं. एखादी बहिण चिडली असेल तर ते आपण समजून घेऊ. कुणी तिला जाणीवपूर्वक पाठवलं असेल तर तेदेखील समजून घेऊ."
"आपल्या मंत्रालयात आपण सर्वांना प्रवेश देतो. कुठलीही अडवणूक केली जात नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत लोकं कधी पहिल्या मजल्यावरून जाळीवर उडी मारतात तर कधी रोष व्यक्त करतात. याचा अर्थ ते आपले विरोधक आहेत असा होत नाहीत. त्यांच्या काही अडचणी असतात आणि त्या दूर करण्याचा आपण प्रयत्न करतो," असेही ते म्हणाले.