मुंबई : धर्मवीर चित्रपटाने सगळीकडे धुमाकूळ घातल्यानंतर शुक्रवार, २७ सप्टेंबर रोजी ‘धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याआधी गुरुवारी या चित्रपटाचा ग्रँड प्रिमियर सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी 'धर्मवीर ३' ची पटकथा मी लिहिणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "धर्मवीर २ ची सर्वांनाच उत्सुकता होती. सगळेजण या चित्रपटाची वाट पाहत होते आणि सर्वांनाच याबद्दल उत्कंठा होती. आज ती उत्कंठा पूर्ण होत आहे. ज्याप्रकारे धर्मवीर १ ला लोकांनी डोक्यावर घेतला आणि मनापासून तो सिनेमा बघितला त्याचप्रकारे आता धर्मवीर २ हा सिनेमासुद्धा लोकांना खूप आवडेल. सत्य कथेवर आधारित आणि ज्या लोकांचं जीवन आपण बघितलं आहे, अशा चरित्रनायकांच्या संदर्भात हा सिनेमा असल्याने तो सर्वांना आवडेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हे वाचलंत का? - मंत्री छगन भुजबळांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल!
प्रचंड संशोधन करून छोट्यातले छोटे बारकावे या चित्रपटात दाखवले आहेत. त्यांनी धर्मवीर २ च्या सर्व टीमचे अभिनंदन करत या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. तसेच सर्वांनी धर्मवीर २ सिनेमा बघावा, असे आवाहन केले. दरम्यान, भविष्यात तुम्हीसुद्धा असा एखादा चित्रपट काढणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर धर्मवीर ३ ची पटकथा मी लिहेन, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.