मुंबई : भाजपचे मुंबई उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांची श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवार, दि. २६ सप्टेंबर रोजी याबाबतचे राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले.
दि. २२ जानेवारी २०२१ रोजी महाविकास आघाडी सरकारने या न्यासावर नियुक्त केलेल्या कोषाध्यक्ष आणि इतर सदस्यांचा कालावधी संपुष्टात आल्याने महायुती सरकारने नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, कोषाध्यक्ष पदावर आचार्य पवन त्रिपाठी, तर गोपाळ दळवी, जितेंद्र राउत, मिना कांबळी, राहुल लोंढे, भास्कर शेट्टी, महेश मुदलियार, मनिषा तुपे, सुदर्शन सांगळे, भास्कर विचारे यांची सदस्य पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या पदाधिकाऱ्यांचा कालावधी अधिसूचना प्रसिद्ध केल्यापासून तीन वर्षांपर्यंत मर्यादीत राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.