"गणेशभक्तांवरील गुन्हे आठ दिवसांत मागे घ्या, अन्यथा.."

विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या पत्रकार परिषदेत साधुसंतांचा आंदोलनाचा इशारा

    26-Sep-2024
Total Views |

vhp
 
 
ठाणे : भिवंडीत गणेश विसर्जनादरम्यान दगडफेक करून गणेश मूर्तीची विटंबना करीत हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अनादर करणार्‍यांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांकडून हिंदू समुदायावरच गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटना आणि साधूसंत संतप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवार, दि. २५ सप्टेंबर रोजी विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या नेतृत्वाखाली साधुसंतांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेतली. आठ दिवसांत गणेश भक्तांवरील गुन्हे मागे न घेतल्यास भारतभरातील साधुसंतांसह लाखो हिंदुत्ववादी भिवंडीत रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
 
अनंत चतुर्दशीच्या दिवशी भिवंडीतील निजामपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वंजारपट्टी नाका येथे गणेश विसर्जनच्या मिरवणुकीवेळी काही धर्मांध मुस्लिमांनी दगडफेक करून श्रीगणेश मूर्तीची विटंबना केली होती. यावेळी पोलिसांकडून हिंदू समाजाला टार्गेट करीत लाठीचार्ज केला होता. गुन्हेही दाखल केल्याने या संदर्भात ’विश्व हिंदू परिषद’ कोकण प्रांतच्या नेतृत्वाखाली साधुसंतांनी बुधवारी ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली.
 
साधुसंतांनी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषद घेऊन, पोलीस प्रशासनाच्या उफराट्या भूमिकेचा पाढा वाचला. भिवंडीत गणेश भक्तांवर दाखल केलेले गुन्हे आठ दिवसांत मागे घ्यावेत, अन्यथा भारतभरातील तमाम साधुसंत, विविध आखाड्याचे महंत, वारकरी संप्रदाय, ५०० नागा साधूंसह लाखो हिंदुत्ववादी मंडळी भिवंडीत धडकून आंदोलन छेडतील, असा इशारा यावेळी देण्यात आला. या पत्रकार परिषदेला स्वामी भारतानंद महाराज, स्वामी शिवरूपानंद सरस्वती, परागबुवा रामदासी, स्वामी शिवगिरी महाराज, महंत चिदानंद महाराज यांच्यासह अनेक साधुसंतासह ’विश्व हिंदू परिषदे’चे राजेश कुंटे, आशुतोष तिवारी, वैभव महाडिक, दादा गोसावी आदी उपस्थित होते.
 
भिवंडीत गणेश विसर्जन मिरवणुकीत कार्यकर्त्यांना पोलिसांनी निघून जाण्यास सांगितले होते. हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांना कार्यक्रम आटोपता घेण्यासाठी पोलीस आग्रही होते. त्याच सुमारास दगडफेकीचे प्रकार घडले, तर पोलीस प्रशासन म्हणतात, लहान मुलांनी दगड मारले असावेत. मग या दगडफेकीमागे कोण आहे? असा सवाल करून साधुसंतांनी पोलीस उपायुक्त पराग मणेरे व श्रीकांत परोपकारी यांच्या आदेशाने गणेश भक्तांवर चारवेळा लाठीचार्ज झाल्याचे सांगितले. गणेश विसर्जनासाठी जमलेल्या हिंदू समुदायावर लाठीचार्ज होण्याची कदाचित राज्यातील पहिलीच घटना असावी आणि ज्यांच्यावर लाठीचार्ज केला यांच्यावरच गुन्हे दाखल केले, असा आरोप केला. तर अखिल भारतीय संत संप्रदाय समितीचे महामंत्री भारतानंद महाराजांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. दादा गोसावी सारख्या गोरक्षक मानवतावादी कार्यकर्त्याला आतंकवादी संबोधता? जे साधुसंत मानवतावादी काम करीत आहेत, त्यांनाच कोठडीत डांबण्याचे काम केले जात आहे. केवळ हिंदू समुदायालाच टार्गेट केले जात आहे. शांतताप्रीय असताना हिंदूंना वेठीस धरले जात आहे. आता सहन करणार नाही, आठ दिवसांत १८ ते २२ जणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अन्यथा भारतभरातील तमाम साधुसंत, विविध आखाड्याचे महंत, वारकरी संप्रदाय, ५०० नागा साधुंसह लाखो हिंदुत्ववादी कार्यकर्ते भिवंडीत येऊन आंदोलन छेडतील. पोलीस प्रशासनाकडून अशाच स्वरुपाची भूमिका कायम राहिल्यास हिंदू समाजाला स्वाभिमान, आत्मसम्नान आणि देशहितासाठी वेगळा मार्ग अवलंबवावा लागेल. याची महाराष्ट्र सरकार व भिवंडीतील प्रशासनाने दखल घ्यावी, असा इशाराही साधुसंत मंडळींनी पत्रकार परिषदेत दिला.

बांग्लादेशाचे विभाजन करा
बांग्लादेशात सध्या सुरू असलेल्या राजकीय रणकंदनात तेथील हिंदूंवर अत्याचार होत आहेत. बांग्लादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर अन्याय सुरू आहेत. नवरात्रीच्या पुजेच्या आयोजनासाठी तेथे पैसे उकळले जात आहेत. त्यामुळे बांग्लादेशचे विभाजन करून वेगळा हिंदू देश निर्माण करा, अशी सूचना साधू महंतांनी केली.

सर्व हिंदू देवस्थाने हिंदूंकडे सोपवा
तिरुपती देवस्थानाच्या प्रसादात भेसळ करून हिंदूंच्या भावनांशी खेळणार्‍यांना फाशीची शिक्षा द्या. तिरुपतीच्या देवस्थानात काम करणारे सर्व कर्मचारी हिंदू असताना त्यांच्यावरील मुख्य व्यवस्थापक इसाई जातीचा का नेमला आहे, असा प्रश्न उपस्थित करून, स्वामी भारतानंद महाराजांनी हे बंद करून सर्व हिंदू देवस्थाने हिंदूंकडेच सोपवावीत, अशी मागणी केली.
 
जिहाद्यांवर वचक बसवा
मागील काही काळापासून हिंदू महिला, मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात ओढून पळवून नेण्याचे, त्यांचे जबरी धर्मांतर करण्याचे प्रकार समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी पीडितेचा बचाव करण्यास गेलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर जिहादी मानसिकतेतून जीवघेणा हल्ला झाला होता. तेव्हा, केंद्र सरकारला आवाहन करतो की, समान नागरी कायदा लागू करा. धर्मांतरण विरोधी कायदा, लव्ह जिहाद कायदा तसेच, लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करा, असेही साधुसंतांनी स्पष्ट केले.