'क्यूआयपी'द्वारे ३ हजार कोटींची निधी उभारणी; थकीत वेतन देण्यासाठी कंपनीचा निर्णय
26-Sep-2024
Total Views |
नवी दिल्ली : विमान कंपनी स्पाइसजेटने कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा केले आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे वेतन कर्मचाऱ्यांना कंपनीकडून देण्यात आले आहे. थकीत वेतन देण्याकरिता स्पाइसजेटने कंपनीने काही दिवसांपूर्वीच क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट(क्यूआयपी)च्या माध्यमातून निधी उभारणी केली आहे.
कंपनीने काही दिवसांपूर्वीच क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट(क्यूआयपी)द्वारे ३ हजार कोटी रुपये उभारत कर्मचाऱ्यांचे वेतन देय दिले आहे. स्पाइसजेटने ऑगस्टमध्ये एकूण देशांतर्गत उड्डाणांतून ३ लाखांहून अधिक प्रवाशांची वाहतूक केली आहे. ही आकडेवारी वार्षिक अंदाजानुसार ४४ टक्के घट दर्शवित आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय(डीजीसीए)ने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये स्पाइसजेटचा देशांतर्गत प्रवासातील हिस्सा केवळ २.३ टक्के होता.
कंपनीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी क्यूआयपीद्वारे भांडवल उभारण्याव्यतिरिक्त, एअरलाइन स्पाईसजेटने फंडिंग फेरीतून अतिरिक्त ७३६ कोटी रुपये उभे करेल, असे स्पाइसजेटने सांगितले. विमान भाडेकरूंना 'कथित डिफॉल्ट', आर्थिक समस्यांमुळे देखभाल समस्या, विमानाच्या सुट्या भागांची कमतरता आणि घटकांची अनुपलब्धता यामुळे स्पाइसजेटच्या ५८ पैकी ३६ विमाने ग्राउंडेड करण्यात आली होती.