मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौर्यावर प्रश्न उपस्थित करणार्या संजय राऊतांचा बुधवार, दिनांक २५ सप्टेंबर रोजी भाजप नेते नितेश राणे यांनी खरपूस समाचार घेतला. “संजय राऊतांमध्ये हिंमत असेल, तर पत्राचाळीच्या चौकात पत्रकार परिषद घ्यावी,” असे आव्हानही त्यांनी दिले.
माध्यमांशी संवाद साधताना नितेश राणे म्हणाले, “भाजपचा कार्यकर्ता कितीही मोठा झाला, तरी तो प्रथम पक्षाला प्राध्यान्य देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस हे त्याचे उत्तम उदाहरण आहेत. हा विषय संजय राऊतला समजण्यापलीकडे आहे. कारण, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांना वेळ दिला नाही, त्यांची भेट घेतली नाही. त्यामुळे तुला आणि तुझ्या घरकोंबड्या मालकाला भाजप कार्यकर्ते कळणार नाहीत,” असा टोला त्यांनी संजय राऊतांना लगावला.
‘वापरा आणि फेका’ ही उद्धव ठाकरेंची वृत्ती
“भाजप अजित पवारांचा काटा काढणार,” अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले, “अजित पवार यांचे काय वाईट झाले? कोणी वापरले आणि सोडले, हे अजित पवारांना माहीत आहे. ‘वापरा आणि फेका’ यात तुमच्या मालकाने ‘पीएचडी’ केली आहे. भाजप हरेल, हे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ आहेत. आमच्या विजयी मिरवणुकीत संजय राऊत नाचताना दिसतील,” असा टोलाही राणे यांनी लगावला.