'म्हाडा' मुंबई मंडळ २०२४ सोडत काही दिवसांवर

26 Sep 2024 16:09:34

mhada (1)
 
 
मुंबई :'म्हाडा' मुंबई मंडळाच्या २ हजार ३० घरांसाठी अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया गुरुवार, दिनांक १९ सप्टेंबर रोजी संपुष्टात आली. मुंबई मंडळाने अर्ज विक्री-स्वीकृतीसाठी दिलेल्या विहित मुदतीत अनामत रकमेसह एक लाख १३ हजार इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत. प्राप्त अर्जांची मुंबई मंडळाकडून छाननी पूर्ण करण्यात आली असून गुरुवार, दिनांक २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पात्र अर्जदारांची प्रारूप यादी मुंबई मंडळ ‘म्हाडा’च्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.
 
 
मुंबईतील गोरेगाव, बोरिवली, जुहू, पवई, विक्रोळी, ताडदेव, दादर, वरळी, वडाळा आदी ठिकाणच्या २ हजार ३० घरांसाठी ९ ऑगस्टपासून सोडत पूर्व प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. दिनांक ९ ऑगस्ट ते दि. १९ सप्टेंबरदरम्यान ही प्रक्रिया सुरू होती. या कालावधीत मुंबई मंडळाकडे अनामत रकमेसह एक लाख १३ हजार अर्ज सादर झाले आहेत. या अर्जांची छाननी करण्यात आली असून, छाननीत पात्र-अपात्र ठरणार्‍या अर्जदारांची यादी शुक्रवार, दिनांक २७ रोजी सायंकाळी ६ वाजता ‘म्हाडा’च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर अपात्र ठरलेल्या अर्जदारांना सूचना-हरकती नोंदविण्यासाठी कालावधी देण्यात येणार आहे. या कालावधीत आपल्या अर्जातील त्रुटी दूर करणार्‍या आणि आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणार्‍या अर्जदारांची नव्याने पात्रता तपासत एकूण पात्र अर्जदारांची अंतिम यादी दिनांक ३ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. पात्र अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडत काढली जाणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे उपस्थित राहणार आहेत.


 
Powered By Sangraha 9.0