४० कोटींच्या खंडणीसाठी मुलाचे अपहरण

 दहा जणांच्या टोळीला मुद्देमालासह १२ तासांत अटक, बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाची सुखरूप सुटका  

    26-Sep-2024
Total Views |

polis
 
मुंबई :हिंदी चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे मुलाचे अपहरण करण्याची घटना अंबरनाथमध्ये घडली. ४० कोटींच्या खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाचे अंबरनाथमध्ये अपहरण करण्यात आले होते. अवघ्या १२ तासात मुद्देमाल व टोळीच्या म्होरक्यासह दहा जणांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद करून मुलाची सुखरूप सुटका केली आहे.
अंबरनाथ येथील बांधकाम व्यावसायिक संजय शेळके यांच्या २० वर्षीय मुलाचे मंगळवार, दि. २४ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास रस्त्यात कार आडवी घालून अपहरण केले होते. त्यानंतर अपहरण करणार्‍यांनी संजय शेळके यांना मोबाईलवरून ४० कोटी रुपये खंडणी देण्याची मागणी केली. खंडणी न दिल्यास मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. यावरून अंबरनाथ पोलीस स्थानकात गुन्हा करण्यात आला होता. टोळीतील म्होरक्या देविदास वाघमारे, दत्तात्रय पवार यांच्यासह आठ जणांना पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले आहे.
अपहरण करणार्‍यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून तीन चारचाकी वाहने, गावठी कट्टा, पिस्तूल, धारदार सुरा, नायलॉनची दोरी, काळ्या रंगाचे मास्क, पाच मोबाईल फोन, असा १२ लाख, ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.