जम्मू-काश्मीरमध्ये दुसर्या टप्प्यात "इतके" टक्के मतदान
‘एलओसी’वरील पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांतील १०६ केंद्रांवर शांतता
26-Sep-2024
Total Views |
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीच्या दुसर्या टप्प्यात बुधवार, दिनांक २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत ५४.११टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या दुसर्या टप्प्यात सहा जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या २६ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान झाले. त्यासाठी ३ हजार, ५०२ मतदानकेंद्रे उभारण्यात आली होती. निवडणुकीच्या या टप्प्यात २३३ पुरुष आणि सहा महिला उमेदवारांसह २३९ उमेदवार रिंगणात होते. दुसर्या टप्प्यात मतदान झालेले सहा जिल्हे म्हणजे बडगाम, गंदरबल, पुंछ, राजौरी, रियासी आणि श्रीनगर हे आहेत.
‘केंद्रीय निवडणूक आयोगा’ने दिलेल्या माहितीनुसार, बडगाम जिल्ह्यातील पाच मतदारसंघांमध्ये ५८.९७टक्के मतदानाची नोंद सायंकाळी ७ वाजेपर्यंत झाली आहे. त्याचप्रमाणे, गंदरबलमधील दोन मतदारसंघांमध्ये ५८.८१ टक्के, पूंछमधील तीन मतदारसंघांमध्ये ७१.५९टक्के, राजौरीतील पाच मतदारसंघांमध्ये ६८.२२ टक्के, रियासीमधील तीन मतदारसंघांमध्ये ७१.८१,तर श्रीनगरमधील आठ मतदारसंघांमध्ये २७.३७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.