नवी दिल्ली: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावरील ‘म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथोरिटी’ (मुडा) घोटाळ्याच्या आरोपांची चौकशी लोकायुक्तांमार्फत करण्यात येणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अडचणींत सातत्याने वाढ होताना दिसत आहे.
यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना झटका बसला होता. त्यानंतर बुधवार, दिनांक २५ सप्टेंबर रोजी बंगळुरु येथील विशेष न्यायालयानेही तपासाचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात दाखल केलेल्या ‘मुडा’ घोटाळा खटल्यात कर्नाटक लोकायुक्तांच्या सक्षम अधिकार्यांकडून तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याचिकाकर्त्या कार्यकर्त्या स्नेहमोयी कृष्णा यांनी वैयक्तिक तक्रारीसह लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले. कर्नाटक लोकायुक्तांच्या आदेशानुसार म्हैसूर जिल्हा पोलीस ‘मुडा’ घोटाळ्याची चौकशी करून तीन महिन्यांत अहवाल सादर करतील, असे न्यायालयाने म्हटले आहे.