मुंबई : वेदांता लिमिटेडच्या भागधारकांसाठी लवकरच मोठा निर्णय कंपनीकडून घेण्यात येणार आहे. वेदांता लिमिटेड कंपनी पुन्हा एकदा आपल्या भागधारकांना लाभांश देण्याची तयारी करत असून कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत धातू आणि खाण क्षेत्रात कार्यरत असणारी कंपनी वेदांता कंपनी गुंतवणूकदारांसाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कंपनीचे प्रमुख अनिल अग्रवाल यांच्या कंपनी पुन्हा एकदा आपल्या भागधारकांना लाभांश देण्याची तयारी करत आहे. यावृत्तानंतर कंपनीचा शेअर भांडवली बाजारात ३.३० टक्क्यांनी वाढून ४९५.४५ रुपयांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे वेदांता कंपनीने चालू आर्थिक वर्षासाठी चौथ्यांदा अंतरिम लाभांश जाहीर केला असून कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.
वेदांताने एक्सचेंज फाइलिंगमध्ये सांगितले की, २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी चौथ्या अंतरिम लाभांशावर विचार करण्यासाठी आणि मंजूर करण्यासाठी दि. ०८ ऑक्टोबर रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीकडून पुन्हा एकदा लाभांश देण्याची तयारी करण्यात येत आहे. आगामी बैठकीत घोषणा होण्याची शक्यता आहे.