
मुंबई: अंत्यविधीसाठी होणारा लाकडांचा वापर थांबवून, त्याऐवजी गायीच्या शेणापासून तयार केलेले गोकाष्ठ वापरण्याबाबत महायुती सरकारने सकारात्मक पाऊल टाकले आहे. यासंदर्भात अभ्यास समिती गठित करण्यात आली असून, दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
एका अंत्यविधीसाठी साधारणतः ३५० किलो लाकडे लागतात. राज्य पातळीवर याचा विचार करता, बेसुमार वृक्षतोड करावी लागते. तसेच, अंत्यविधीसाठी लाकडाचा वापर केल्यामुळे कार्बन-डाय-ऑक्साईड, मिथेन यांसारखे वायू आणि उष्णता मोठ्या प्रमाणात बाहेर पडते. त्यामुळे हवेचे प्रदूषण होऊन आरोग्याला आणि पर्यावरणाला धोका पोहचतो. याउलट, गायीच्या शेणापासून तयार केलेल्या गोकाष्ठाचा वापर अंत्यविधीसाठी केल्यास धूर कमी प्रमाणात निघतो. गोकाष्ठांमध्ये कापूर, तूप, चंदनाचा वापर केलेला असल्याने ऑक्सिजन बाहेर पडतो. प्रदूषण कमी होऊन वृक्षतोड थांबण्यास मदत होते. त्यामुळे या सर्व बाबी ध्यानात घेऊन महायुती सरकारने अंत्यसंस्कारासाठी ‘एसओपी’ तयार करण्याकरिता अभ्यास समिती गठित करण्याचा निर्णय घेतला आहे. नगर परिषद प्रशासन संचालनालयाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या या समितीने दोन महिन्यांत आपला अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. अहवाल तयार करताना अभ्यास समितीच्या बैठकीला समाजातील सर्व संबंधित घटक, सामाजिक संस्था, पर्यावरण विभाग आणि वनविभागाचे अधिकारी, तसेच संबंधित तज्ज्ञांना निमंत्रित करून त्यांची मते जाणून घ्यावीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
गोकाष्ठ वापरल्याचे फायदे
गायीच्या शेणापासून तयार केलेल्या गोकाष्ठांमध्ये गुलाब, चंदन, कापूर, तुपाचा वापर केला जातो. त्यामुळे कार्बनचे प्रमाण कमी होऊन अवघ्या दहा टक्क्यांवर येते. वातावरण ‘बॅक्टेरिया’मुक्त होऊन ऑक्सिजनची निर्मिती होते. त्याचप्रमाणे, अंत्यविधीनंतर राखेचे प्रमाण कमी होते. शिवाय, वृक्षारोपणासाठी या राखेचा वापर होऊ शकतो.