मुंबई : सीएनजी मॉडेल कारला भारतीयांची अधिक पसंती असल्याचे दिसून आले आहे. देशातील कार ग्राहकांसाठी सीएनजी हा एक नवा इंधन पर्याय बनताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे सीएनजी कारने यावर्षी जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत पेट्रोल, डिझेल, हायब्रीड आणि इलेक्ट्रिक कार(ईव्ही)ला मागे टाकले असून सीएनजी वाहनांच्या विक्रीत ४६ टक्क्यांची वाढ झाली आहे.
दरम्यान, गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत सीएनजी वाहनांच्या तुलनेत पेट्रोल मॉडेलच्या विक्रीत ४.५ टक्के इतकी घट दिसून आली आहे. परंतु, डिझेल मॉडेल्सच्या विक्रीत ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सीएनजी वाहनांची विक्री आता पेट्रोल वाहनांच्या विक्रीच्या सुमारे एक तृतीयांश ३० टक्के झाली आहे. या प्रमाणात मारुती सुझुकी ३ कारपैकी एक सीएनजी कार विकत आहे.
सीएनजी कार विक्रीत मारुती सुझुकी कंपनीच्या एकूण कारमध्ये सीएनजीचा वाटा ३४ टक्क्यांवर पोहोचला होता. सीएनजी कारच्या मागणीत ४६ टक्के वाढ नोंदवत पेट्रोल आणि इलेक्ट्रिक वाहनांना मागे टाकले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशात प्रथमच सीएनजी प्रवासी वाहनांनी विक्रीच्या आघाडीवर डिझेल वाहनांना मागे टाकले आहे. तिमाहीत राजस्थान, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, केरळ आणि बिहार यांसारख्या राज्यात सीएनजी वाहनांमध्ये जोरदार वाढ झाली आहे.