उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आता या भेसळीविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. सर्व ढाबे-रेस्टॉरंटमध्ये स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यांच्या बुलडोझर कारवाईचा कित्ता गिरविणार्या राज्य सरकारने आपल्या राज्यातही अशाच प्रकारच्या अन्नभेसळीविरोधात मोहीम सुरू करणे गरजेचे आहे.
तिरुपती बालाजी मंदिरात भक्तांना प्रसाद म्हणून दिल्या जाणार्या बुंदीच्या लाडवांसाठी वापरलेल्या तुपात प्राण्यांच्या चरबीचा वापर झाल्याच्या बातमीने खळबळ उडाली आहे. तिरुपती मंदिरात मिळणारा हा प्रसादाचा लाडू नारळाच्या आकाराइतका मोठा असतो आणि तो एक-दोन आठवडे टिकून राहतो, असे सांगितले जाते. आता देवाचा प्रसाद म्हणून दिल्या जाणार्या या लाडवात जनावरांची चरबी मिसळली जात असेल, अशी कोणी कल्पनाही केली नव्हती. पण, हा लाडू नेहमीपेक्षा अधिक दिवस टिकून राहतो, यामागे त्यात काही प्राणीजन्य पदार्थ मिसळले गेले असण्याची शक्यता आहे. कारण, कोणताही खाद्यपदार्थ हा भारतासारख्या हवामानात इतके दिवस खराब न होता टिकून राहणे शक्य नाही. म्हणून या लाडवाच्या तुपात ही चरबी मिसळली जाते, असे सांगितले. मंदिर व्यवस्थापनाने पैसे वाचविण्यासाठी कमी दराच्या ठेकेदारांकडून कमी दर्जाचे तूप विकत घेतल्याचे सांगितले जाते. या मंदिराच्या व्यवस्थापन समितीत आणि अध्यक्षपदी पूर्वीच्या जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारच्या काळात मुस्लीम समाजातील व्यक्तींच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या आणि त्यानंतरच हा वाद निर्माण झाला आहे, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आता या नियुक्त्या रद्द केल्या आहेत.
तिरुपती लाडवाच्या वादानंतर लगेचच वृंदावनमधील बाकेबिहारी मंदिराच्या पेढ्यांमध्येही अशाप्रकारे चरबी मिसळली जात असावी, असा आरोप समाजवादी पक्षाच्या खा. डिंपल यादव यांनी केला आहे. या मंदिराच्या व्यवस्थापनानेही आपल्या स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्या तुपाचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यानंतर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नवा आदेश जारी केला असून, खाद्यपदार्थांची विक्री करणार्या सर्व दुकानांमध्ये स्वच्छतेचे सर्व नियम कसोटीने पालन करण्याचा आदेश दिला आहे. वेटर आणि स्वयंपाकी यांना हातमोजे आणि तोंडावर मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. हाच नियम त्या राज्यातील सर्व रेस्टॉरंट आणि हॉटेल्सनाही लागू करण्यात आला आहे. सर्व रेस्टॉरंटचे मालक आणि मुख्य स्वयंपाकी यांची नावे, दूरध्वनी क्रमांक आणि पत्ते ग्राहकांना दिसतील, अशाप्रकारे ठेवण्याचीही सूचना करण्यात आली आहे.
काही महिन्यांपूर्वी उत्तराखंड व उत्तर प्रदेशात चालणार्या कावड यात्रेच्या मार्गावरील सर्व ढाबे आणि हॉटेलांचे मालक कोण आहेत, त्यांची नावे त्या ढाब्याच्या दर्शनीभागात ठळकपणे लावण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी जारी केले होते. कारण, या मार्गावरील अनेक ढाबे आणि खाणावळींचे मालक हे मुस्लीम आहेत. कावड यात्रेकरूंना आपल्या दुकानात आकर्षित करण्यासाठी ते आपल्या दुकानांना हिंदू देवतांची नावे देत, हिंदू देवतांचे फोटो आतील भागात लावीत असत. मात्र, याच ढाब्यांच्या स्वयंपाकघरात मांसाहारी पदार्थही शिजविले जात आणि शाकाहारी व मांसाहारी पदार्थांसाठी एकाच भांड्यांचा वापर केला जात असे. या यात्रेकरूंची ही फसवणूक होती. अनेक स्वयंपाकी हे धर्माने मुस्लीमही होते. यात्रेकरूंच्या विश्वासाचा आणि श्रद्धेचा तो उघडपणे अपमान केला जात होता. ही फसवणूक टाळण्यासाठी योगीजींनी हा आदेश काढला होता. त्यामुळे, अनेक कथित हिंदू ढाबे आणि रेस्टॉरंटचे खरे स्वरूप उघड झाले आणि संबंधित हॉटेलमालकांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम झाला. तेव्हा त्या आदेशाचे राजकारण करण्यात आले आणि अखेरीस हा वाद न्यायालयात गेला. अपेक्षेप्रमाणेच, न्यायालयाने या आदेशाला स्थगिती दिली आहे.
वृंदावन पेढ्यांतील भेसळीच्या वादानंतर मुख्यमंत्री योगीजींनी आता हाच आदेश थोड्या वेगळ्या स्वरूपात जारी केला आहे. सर्व हॉटेल, ढाबे आणि रेस्टॉरंटमध्ये स्वच्छतेच्या नियमांचे कसोटीने पालन करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाची फिरती पथके विविध ढाब्यांतील स्वयंपाकघरांची आणि पदार्थांची तपासणी करीत आहेत. हे सर्व करण्याची मोहीम उघडावी लागली आहे, यावरून योगीजींनी हा प्रश्न किती गांभीर्याने घेतला आहे, ते दिसून येते. अन्नभेसळ ही काही नवी समस्या नाही. देशात वर्षानुवर्षे सर्व प्रकारच्या खाद्य आणि पेयपदार्थांमध्ये भेसळ केली जात आहे. दूध, खवा, मिठाई याचप्रमाणे, दारूमध्येही भेसळ केली जाते. हे प्रकार केवळ स्वस्त किंवा रस्त्यावरील ढाबे-रेस्टॉरंटमध्येच घडतात असे नव्हे, तर काही नावाजलेल्या हॉटेल-रेस्टॉरंटमध्येही भेसळ केली जाते. कमीत कमी पैशात जास्तीत जास्त नफा कमाविणे हेच ध्येय असलेल्या काही व्यावसायिकांचा हा नेहमीचा खेळ.
पण, अलीकडच्या काळात या पैशाच्या लालसेला धार्मिकद्वेषाचाही पैलू पडला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये पेयजन्य पदार्थामध्ये किंवा रोटी आणि भाज्यांमध्ये थुंकणार्या आचार्यांचे व्हिडिओ प्रसृत झाले होते. रस्त्यावर पाणीपुरी व भेळ विकणार्या काही विक्रेत्यांनी तर यापुढेच मजल मारली आहे. नुकताच एक पाणीपुरी विक्रेता आपले मूत्र पाणीपुरीच्या पाण्यात मिसळून देत असल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर प्रसारित झाला होता. हे प्रकार गावखेड्यामध्ये नव्हे, तर मुंबई-दिल्ली-लखनौ यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये घडत आहेत, ही विशेष चिंताजनक बाब आहे. असे प्रकार करणारे जवळपास सर्वच विक्रेते हे विशिष्ट धर्म समुदायाचे असावेत, हा योगायोग म्हणता येणार नाही.
योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीला मोठा लगाम घातला आहे. राजकीय वरदहस्त लाभलेल्या अनेक माफियांना त्यांनी शब्दश: मातीत मिसळवले आहे. मोठ्या माफियागुंडांची साम्राज्ये त्यांनी बरखास्त केली असून, त्यांच्या अवैध संपत्तीवर बुलडोझर फिरविला आहे. आता त्यांच्या या बुलडोझर कारवाईला न्यायालयाने बंदी घातली असली, तरी जनमत हे योगीजींच्या कारवाईमागे आहे. इतकेच नव्हे, तर काही गुंडांना त्यांनी एन्काऊंटरद्वारे थेट नरकाचा रस्ता दाखविला आहे. त्या कामातही त्यांनी कसलाही जाती-धर्मभेद केलेला नाही!
मोठ्या माफियांना वठणीवर आणणे हे कठीण काम त्यांनी शक्य करून दाखविले असले, तरी रस्त्यावरील या छोट्या-मोठ्या विक्रेत्यांकडून होणारी ग्राहकांची फसवणूक आणि भेसळयुक्त पदार्थांची विक्री थांबविणे, ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. एक तर असे छोटे विक्रेते अनेक ठिकाणी विखरलेले असतात. अशा किती विक्रेत्यांवर सरकार नजर ठेऊ शकेल, हा प्रश्नच आहे. तरीही योगीजींनी हा प्रश्न हाती घेतला, ही चांगलीच गोष्ट आहे. खरे तर ग्राहकांची पिळवणूक करून खिसे भरण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे. त्यावर सध्या तरी कोणाकडे काही उपाय नाही.
राहुल बोरगांवकर