मुंबई : मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊतांना १५ दिवसांचा तुरुंगवास आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान, आता यावर संजय राऊतांनी पहिली प्रतिक्रिया दिली. सार्वजनिक हितासाठी प्रश्न उपस्थित केल्याने आज मला शिक्षा ठोठावली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या शिक्षेबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, "देशाच्या मुख्य न्यायाधिशांच्या घरी पंतप्रधान मोदीजी मोदक खायला जातात. त्यामुळे आमच्यासारखे लोक भ्रष्टाचाराच्या विरोधात जेव्हा आवाज उठवतात तेव्हा त्यांना न्याय कसा मिळणार? त्यामुळे हा निर्णय अपेक्षित आहे. या निर्णयासाठी मी न्यायालयाचा आदर करतो. मीरा भाईंदर परिसरात युवक प्रतिष्ठानतर्फे शौच्छालय बनवण्याचं काम झालं होतं. यात काही चुका झाल्या होत्या. या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मी केला नसून सर्वात आधी मीरा भाईंदर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रविण पाटील यांनी केला होता. याबाबत मीरा भाईंदर महानगरपालिकेचाही एक अहवाल आहे. विधानसभेतही यावर प्रश्न विचारण्यात आला आणि कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश पारित करण्यात आला. मी फक्त हा मुद्दा लोकांसमोर आणला. तर माझ्याकडून मानहानी कशी झाली? मी फक्त सार्वजनिक हितासाठी प्रश्न उपस्थित केल्याने आज मला शिक्षा ठोठावली आहे. त्यांनी मला १५ वर्षांची शिक्षा ठोठावली तरी मी सत्य बोलण्यापासून मागे हटणार नाही."
"आम्ही याप्रकरणात वरच्या कोर्टात अपील करणार आहोत. खालच्या कोर्टाने याबाबतचा पुरावा मान्य केलेला नाही. कारण संपुर्ण न्यायव्यवस्थेचं संगीकरण झालंय. या घोटाळ्याबाबत आमदार, खासदार, महानगरपालिका, विधानसभा या सर्वांनी तक्रारी केल्या. पण विधानसभेच्या निवडणूका आल्याने फक्त संजय राऊतांना फासावर लटकवलं जातंय. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सत्यासाठी लढत राहू," असेही ते म्हणाले.