मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Dnyanesh Maharao Shivaji Natyamandir) प्रभु श्रीराम, सीतामाता, उत्तरा आणि श्री स्वामी समर्थ यांच्याबाबत जाहीरपणे वादग्रस्त विधान करणारे ज्ञानेश महाराव यांच्याविरोधात सकल हिंदू समाज आक्रमक झाला आहे. मुंबई येथील प्रसिद्ध श्री शिवाजी नाट्यमंदिर या नाट्यगृहाच्या कार्यकारिणीतून ज्ञानेश महाराव यांची हकालपट्टी करावी, अशा मागणीचे निवेदन नाट्यगृहाचे अध्यक्ष कर्नल सुधीर सावंत (निवृत्त) यांना सकल हिंदू समाजाच्या वतीने नुकतेच देण्यात आले आहे.
हे वाचलंत का? : संघ केवळ एक संघटना नसून भारताच्या उत्थानाची मोहीम
वाशी येथे काही दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडच्या वतीने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ज्ञानेश महाराव यांनी प्रभु श्रीराम, सीतामाता, लक्ष्मणपत्नी उत्तरा आणि स्वामी समर्थ यांच्याविषयी बेताल व निंदनीय वक्तव्य केले होते. त्यावेळी शरद पवार आणि खासदार शाहू छत्रपती महाराज हे देखील मंचावर उपस्थित होते. असे वक्तव्य केवळ मानसिक संतुलन बिघडलेली समाजकंटक व्यक्तीच करू शकते, असे मत सकल हिंदू समाजाकडून व्यक्त करण्यात आले आहे.
त्यामुळे श्री शिवाजी नाट्यमंदिर या नामांकित संस्थेच्या कार्यकारिणीतून ज्ञानेश महाराव यांना काढून टाकण्यात यावे आणि आपल्या संस्थेचा मान कायम राखावा. आमचे देवी-देवता, साधू-संत आणि आदर्श यांचा कुणी अवमान आणि अपप्रचार करत असेल, तर आम्ही खपवून घेणार नाही. त्यासाठी आम्ही संवैधानिक मार्गाने तीव्र आंदोलन करू, असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निवेदन दिले.