'अजमेर दर्गा'विरोधात हिंदू संघटनांकडून याचिका दाखल

26 Sep 2024 12:32:14

Ajmer Dargah

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Ajmer Dargah News)
राजस्थान येथील अजमेर दर्गा हे शिवमंदिर असून दर्गा बांधण्यात आल्याचे हिंदू संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे अजमेर जिल्हा न्यायालयात मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्गाविरोधात नुकताच दिवाणी दावा दाखल करण्यात आला आहे. हे ठिकाण भगवान श्री संकटमोचन महादेव विराजमान मंदिर म्हणून घोषित करावे आणि मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी केंद्राला सूचना द्याव्यात, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. त्यासोबतच दर्गा समितीला जागेवरील अनधिकृत आणि बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्याचे निर्देश द्यावेत, असेही सांगण्यात आले आहे.

हे वाचलंत का? : भिवंडीतील गणेशभक्तांवरील गुन्हे आठ दिवसात मागे घ्या अन्यथा रस्त्यावर उतरणार

याचिकेत म्हटल्याप्रमाणे, मुख्य प्रवेशद्वाराच्या छताची रचना हिंदू संरचनेसारखी असून ती जागा मूळतः मंदिर असल्याचे दर्शवते. त्यामुळे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला न्यायालयाने दर्ग्याचे सर्वेक्षण करण्यासाठी निर्देश देण्याची विनंती हिंदू संघटनांकडून करण्यात आली आहे. येथील तळघरात गर्भगृह असल्याचेही सांगितले जात आहे.

हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी आपल्या याचिकेत असा युक्तिवाद केला आहे की, अजमेर दर्गा रिकाम्या जागेवर बांधण्यात आला होता हे दाखवण्यासाठी कोणतेही रेकॉर्ड उपलब्ध नाही. त्याऐवजी, ऐतिहासिक अहवाल असे सूचित करतात की त्या ठिकाणी महादेव मंदिरे आणि जैन मंदिरे होती, जिथे हिंदू आणि जैन भाविक त्यांच्या देवतांची पूजा करतात.

याप्रकरणी मुस्लिमांचा असा दावा आहे की अजमेर दर्गा ही त्यांच्या सुफी संप्रदायातील संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांची कबर आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने मुस्लिम लोक यएथील कबरीवर चादर अर्पण करण्यासाठी येतात. त्यामुळे हिंदू सेनेच्या याचिकेवर अजमेर दर्ग्याकडून आक्षेप घेण्यात आला आहे. धार्मिक स्थळांवर खोटे आणि निराधार षडयंत्र रचले जात असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असे यांचे म्हणणे आहे. अजमेर जिल्हा न्यायालयात याबाबतची सुनावणी दि. १० ऑक्टोबरला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Powered By Sangraha 9.0