भारतीय कलाकारांचा आणखी एक दमदार चित्रपट पोहोचला 'ऑस्कर'च्या शर्यतीत!

26 Sep 2024 14:35:17

oscar 
 
 
मुंबई : यंदाचा ऑस्कर २०२५ हा पुरस्कार सोहळा भारतासाठी फार महत्वाचा असणार आहे. नुकताच किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडिज' हा चित्रपट भारताकडून ऑस्करला पाठवण्यात आला. त्यापाठोपाठ रणदीप हुड्डा दिग्दर्शित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटानेही बाजी मारली. आणि आता 'संतोष' या भारतीय चित्रपटाचीही ऑस्कर २०२५ मध्ये वर्णी लागली आहे. 'लापता लेडीज'नंतर भारतीय कलाकारांचा आणखी एक दमदार चित्रपट 'ऑस्कर'च्या शर्यतीत आला असून याचे नाव आहे 'संतोष'.
 
ऑस्कर २०२५ साठी नामांकन मिळालेल्या या चित्रपटाचं नाव 'संतोष' असं आहे. युकेतर्फे मानाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी 'संतोष'ची निवड करण्यात आली. भारताने जशी 'लापता लेडीज'ची निवड केली अगदी त्याप्रमाणे यूकेने 'संतोष' या चित्रपटाची निवड केली आहे. हा चित्रपट संध्या सुरी यांनी दिग्दर्शित केला असून हा चित्रपट हिंदी भाषेत चित्रीत करण्यात आला आहे. यात शहाना गोस्वामी, सुनीता राजवार, संजय बिश्नोई, कुशल दुबे आणि इतर कलाकारांनी भूमिका केल्या आहेत.
 
दरम्यान, युकेने 'संतोष' चित्रपटाची निवड का केली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर त्याचं कारण असं की, तो तेथे प्रदर्शित झाला आणि त्यात ब्रिटिश निर्मात्यांचा हात आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या ७७ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अन सरटेन रिगार्ड विभागात ‘संतोष’ चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर झाला होता. या चित्रपटात उत्तर भारतातील एका विधवा महिलेची कथा दाखवण्यात आली आहे. जी पतीच्या मृत्यूनंतर आश्रित कोट्यातून हवालदार बनते. एका तरुणीच्या हत्येचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करते. यानंतर मग तिच्या आयुष्याला घडणाऱ्या घटना या चित्रपटात पाहायला मिळतात.
Powered By Sangraha 9.0