नवी दिल्ली : दिल्लीतील शाही ईदगाहजवळील दिल्ली डेव्हलपमेंट अथोरिटीच्या (डीडीए) जागेवरील वक्फ मंडळाचा दावा दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता या जागेवर झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची प्रतिमा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सदर बाजार येथील शाही इदगाह पार्कमध्ये झाशीच्या राणीचा पुतळा बसवण्यास बंदी घालण्याची विनंती करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
न्यायालयाने म्हटले आहे की याचिकाकर्त्या शाही ईदगाह (वक्फ) व्यवस्थापन समितीला डीडीएकडून शाही ईदगाहभोवती उद्यानाच्या देखभालीला विरोध करण्याचा कोणताही कायदेशीर किंवा मूलभूत अधिकार नाही. यासोबतच शाही ईदगाह (वक्फ) व्यवस्थापन समितीलाही दिल्ली महानगरपालिकेच्या आदेशानुसार पुतळा बसवण्यास विरोध करण्याचा कोणताही कायदेशीर किंवा मूलभूत अधिकार नाही.
दिल्ली अल्पसंख्याक आयोगाने यथास्थिती ठेवण्याचा आदेश स्पष्टपणे कोणत्याही अधिकारक्षेत्राबाहेर होता, हे सांगण्याची गरज नाही; असे सांगून न्यायालयाने सदर जागा ही वक्फ संपत्ती असल्याचाही दावा फेटाळून लावला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर डीडीए आणि दिल्ली महानगरपालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पुतळा बसवण्याचे काम सुरू केले. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इदगाह संकुलाच्या सभोवताली बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे रस्ता बंद करण्यात आला असून, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.