अक्षय शिंदे काही संत नव्हता बलात्कारीच होता! एन्काऊंटर झाला तर पोलीसांचं कौतूकच केलं पाहिजे : शर्मिला राज ठाकरे
25-Sep-2024
Total Views |
मुंबई : अक्षय शिंदे काही संत नव्हता बलात्कारीच होता. त्याचा एन्काऊंटर झाला तर पोलिसांचं कौतूकच केलं पाहिजे, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी केलं आहे. अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. दरम्यान, शर्मिला ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला.
शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, "एन्काऊंटर केल्याबद्दल पोलिसांचं अभिनंदन आणि जाणूनबुजून एन्काऊंटर केलं असल्यास त्यांचं डबल अभिनंदन. जोपर्यंत कायद्याचा धाक निर्माण होत नाही तोपर्यंत वर्षभर असे एन्काऊंटर झाले पाहिजे. त्याशिवाय बलात्काऱ्यांना वचक बसणार नाही. रोज येणाऱ्या बलात्काराच्या बातम्यांमुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. राजकारणी, विरोधी पक्ष, कोर्ट हे काय बोलतात यांच्याशी माझं देणं घेणं नाही. पण एक महिला म्हणून मला या गोष्टीचा अभिमान वाटतो आणि मी त्या पोलिसांचं कौतूक करते."
"जेवढा वेळ कोर्टात अशी प्रकरणं चालतात तितकी जास्त महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. दिल्लीच्या प्रकरणात आज सहा वर्षांनंतर फाशी होते. त्यामुळे सहा वर्षे त्या माणसाला जगण्याचा अधिकार मिळतो. आपण शक्ती कायद्याबद्दल नुसते बोलतो. पण आम्हां महिलांना हा शक्ती कायदा अभिप्रेत आहे. त्या मुली लहान आहेत. त्यांना सहा वर्षांनंतर कोर्टात उभं केल्यावर हे प्रकरण त्यांच्या लक्षात राहणार का? त्यामुळे एक दोन महिन्यातच अशा प्रकरणाचे निकाल लागले पाहिजे," असे त्या म्हणाल्या.
शेवटी अक्षय शिंदे काही संत नव्हता!
"हैदराबादमध्ये एका मुलीवर बलात्कार झाला असताना तिथल्या पोलिसांनी चार बलात्काऱ्यांचं एन्काऊंटर केलं होतं. आता जे सकाळी ओरडत आहेत त्याच विरोधी पक्षांच्या वृत्तपत्रात हैदराबाद पोलिसांचा कोट घेतला होता. मग हैदराबादच्या पोलिसांना वेगळा न्याय आणि महाराष्ट्रातील पोलिसांना वेगळा न्याय का? शेवटी अक्षय शिंदे काही संत नव्हता. तो बलात्कारी होता. मुलींनी त्याला ओळखलं आहे," असेही त्या म्हणाल्या.