सहकारी कायद्यांमध्ये परिवर्तन होणे आवश्यक : संजय पाचपोर

25 Sep 2024 13:04:08

Sahakar Bharati Pradesh Adhiveshan

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Sahakar Bharati Pradesh Adhiveshan) 
"सहकारात येणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी सहकारी कायद्यांमध्ये परिवर्तन झाले पाहिजे व त्या समस्यांना सरकार दरबारी तितक्याच ताकदीने मांडले पाहिजे, त्यासाठी नवीन कार्यकारिणीने सहकार भारतीचा दबदबा सहकार श्रेत्रांमध्ये निर्माण करावा", असे प्रतिपादन सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री संजय पाचपोर यांनी केले. त्यासोबत त्यांनी पुढील तीन वर्षांत संपूर्ण महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या भेटी झाल्या पाहिजे व वर्षातून प्रत्येक कार्यकर्त्यांनी कमीत कमी १०० सहकारी संस्थांची भेट घेतली पाहिजे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशचे १४ वे प्रदेश अधिवेशन दि. २१ व २२ सप्टेंबर रोजी साई पालखी निवारा, शिर्डी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदयराव जोशी, सहकार भारती संस्थापक सदस्य व रिझर्व बँक संचालक सतीश मराठे, प्रदेश अध्यक्षा श्रीमती शशिताई अहिरे, प्रदेश महामंत्री विवेक जुगादे, अधिवेशन प्रमुख रवीकाका बोरावके व सहप्रमुख अभीनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाले. अधिवेशनामध्ये एकूण ३६ जिल्ह्यांच्या २५६ तालुक्यातून १०४६ प्रतिनिधी उपस्थित होते.

हे वाचलंत का? : मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यामुळे 'रामलीला' आयोजनातील अडथळे दूर

प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांनी सहकार भारतीचा मागील तीन वर्षांच्या कार्याचा आढावा सादर केला. अधिवेशनाच्या द्वितीय सत्रात पत्रकार मिलिंद भागवत व निकिता भागवत यांनी वर्तमान परिस्थितीत मिडियाची भूमिका आणि त्याचे सहकार क्षेत्रावर होणारे परिणाम यावर उपस्थितांना संबोधित केले. अधिवेशनाच्या तृतीय सत्रात प्रकाश पाठक यांनी संघटन व कार्यकर्ता या विषयावर उपस्थितांचे सखोल मार्गदर्शन केले. सहकार भारतीद्वारे प्रदान केला जाणारा 'स्व. अण्णासाहेब गोडबोले स्मृती पुरस्कार' राजस्थानचे महामहीम राज्यपाल हरिभाऊ बागडे व राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आण्णा आवाडे यांना प्रदान करण्यात आला. सोबतच 'सहकार महर्षी' या ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशनही झाले.


Sahakar Bharati (Mumbai)

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी (२२ सप्टेंबर) प्रथम सत्रामध्ये निर्वाचन अधिकारी अभय माटे यांच्याद्वारे निवडप्रक्रियेतून प्रदेश अध्यक्ष म्हणून दत्ताराम चाळके यांची निवड झाली तर प्रदेश महामंत्री म्हणून विवेक जुगादे निर्वाचित झाले. त्यानंतरच्या सत्रामध्ये सहकार क्षेत्रातील विविध समस्यांवर मंथन करून त्या समस्या सरकार दरबारी मांडण्यासाठी वेगवेगळे प्रस्ताव मांडण्यात आले. यात प्राथमिक कृषी सहकारी केंद्र (पॅक्स) च्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रांमध्ये मोलाते परिवर्तन घडवून आणण्यासाठी त्यासमोरील समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रस्ताव पारित झाले. बँक, पतसंस्था, हाऊसिंग या विषयावर सखोल चर्चेनंतर त्यांच्या समोरील समस्यांचे सरकार दरबारी निवेदन देणारे प्रस्ताव पारित झाले. नवनिर्वाचित अध्यक्ष व महामंत्री यांनी वर्ष २०२४ ते २७ या कालावधीसाठी महाराष्ट्र प्रदेशची कार्यकारिणी जाहिर केली.

मुंबई विभागाचे कार्य पाहता महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीने मुंबई विभागाला पुढील कार्य व सहकार दबदबा वाढवण्यासाठी प्रदेशाचा दर्जा घोषित केला. मुंबईसाठी राहुल पाटील यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यासोबतच मंगेश पवार मुंबई महामंत्री, संतोष सुर्वे संघटन मंत्री व जगदीश लाडवंजारी यांची सह संघटन मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली.

Powered By Sangraha 9.0