"हिंमत असेल तर उद्या सकाळची पत्रकार परिषद..."; नितेश राणेंचं राऊतांना थेट आव्हान

25 Sep 2024 12:16:20
 
Raut & Rane
 
मुंबई : हिंमत असेल तर उद्या सकाळची पत्रकार परिषद पत्राचाळीत घेऊन दाखवा, असं आव्हान भाजप आमदार नितेश राणेंनी संजय राऊतांना दिलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. संजय राऊतांनी त्यांच्या दौऱ्यावर टीका केली होती. यावर आता नितेश राणेंनी त्यांना प्रत्युत्तर दिले.
 
नितेश राणे म्हणाले की, "देशाचे गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. संजय राऊतांना यावरून फार मिरच्या लागत आहेत. भाजपचा कुठलाही कार्यकर्ता कितीही मोठ्या पदावर गेला तरी पक्ष आणि संघटनेला नेहमी प्राधान्य देतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह साहेब आणि देवेंद्रजी आहेत. पक्षाचा आणि संघटनेचा विषय आला की, सगळी पदं बाजूला ठेवून पक्ष बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त परिश्रम घेण्याची त्यांची तयारी असते. पण संजय राऊतांना हा विषय कळणार नाही," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या आमदारांना आणि जिल्हाप्रमुखांना वेळ दिला नाही. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षांच्या काळात ज्यांना एकदाही भेट दिली नाही असे असंख्य शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि शिवसैनिक आहेत. त्यामुळे अमित शाहांच्या पक्षनिष्ठेबद्दल तुम्हाला कधीच कळणार नाही. कारण तुम्ही आणि तुमच्या घरकोंबड्या मालकाला सामान्य शिवसैनिकालाही वेळ देता येत नाही. म्हणून तुम्ही फक्त अमित शाहांवर टीकाच करू शकता. दुरसं काहीही करू शकत नाही. मणिपूर, जम्मू काश्मीर आणि लडाखबद्दल बोलण्याआधी तुम्ही पत्राचाळच्या चौकात जाऊन दाखवा. तुमच्यात हिंमत असेल तर उद्या सकाळची पत्रकार परिषद पत्राचाळीत घेऊन दाखवा. मग मागून चपला येतात की, नाही ते बघा," असेही ते म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0