नाशिक : अमितभाईंच्या दौऱ्याने मविआतील नेत्यांना दोन-दोन दिवस झोप लागत नाही, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून बुधवारी नाशिकमध्ये त्यांची सभा पार पडली. यावेळी बावनकुळेंनी माध्यमांशी संवाद साधला.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "अमितभाईंच्या या दौऱ्यामुळे आम्हाला ऊर्जा मिळेल आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येण्यासाठी हा दौरा महत्त्वपूर्ण ठरेल. अमित शाहसारखे संघटनकौशल्य असलेले आणि जिंकण्याची उमेद निर्माण करणारे नेते आमचं मोठं उर्जास्त्रोत आहे. अमितभाईंच्या प्रवासात आमची संघटनशक्ती आणखी जोरात कामाला लागते. त्यामुळे अमितभाईंसारखे नेतृत्व जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात येते तेव्हा तेव्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांची घाबरगुंडी उडते. ते भाजपला काय नवा मंत्र देतील, या विचाराने त्यांना दोन-दोन दिवस झोप लागत नाही," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "विधानसभेच्या निवडणूकीत महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येईल. यामुळे होणाऱ्या भूकंपाचे हादरे अनेक वर्षांपर्यंत उद्धव ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील आणि महाविकास आघाडीला बसतील," असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.