आपल्या देशात स्वातंत्र्यपूर्व काळात विशेषतः 1850 सालानंतर अनेक ऋषितुल्य, द्रष्टे समाजसुधारक, महापुरुष होऊन गेले. त्यांनी समाजजागृतीचे फार मोठे काम केले. त्या सर्वश्रेष्ठ राष्ट्रनिष्ठांच्या मांदियाळीमध्ये एक सुसंस्कृत राजकीय नेता, प्रकांड पंडित, तत्वज्ञ विचारवंत व सव्यसाची पत्रकार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव घेता येईल. आपल्या समाजजीवनात ‘एकात्म मानवतावादा’चा आग्रह धरणारे, ‘अंत्योदया’ची कृतिशीलता सांगणारे आणि खर्या अर्थाने सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते असलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची आज जयंती. त्यानिमित्ताने त्यांच्या विचारांचे चिंतन करणारा हा लेख...
पं. दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म दि. 25 सप्टेंबर 1916 रोजी उत्तर प्रदेशात मथुरेजवळील चंद्रभान गावात झाला. लहानपणीच पालकांचे छत्र गमावल्याने, त्यांचा सांभाळ त्यांच्या मामांनी केला. अतिशय कुशाग्र बुद्धी असलेले दीनदयाळजी मॅट्रिकची परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांना बोर्डाचे सुवर्ण पदकही मिळाले. गणित विषय घेऊन त्यांनी बीएला पण सुवर्ण पदक मिळवले.
प्रचंड बुद्धिमत्ता लाभलेल्या पंडितजींनी सिकर, आग्रा, कानपूर, पिलानी, प्रयाग अशा विविध ठिकाणी शिक्षण घेतले. विद्यार्थीदशेत असतानाच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या संपर्कात आले व त्यांच्या आयुष्याने निर्णायक वळण घेतले. ते संघात दाखल झाले व प्रचारक बनले. जणू त्यांना जीवनाचे ध्येय गवसले. त्यांनी स्वत:ला राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात झोकून दिले. त्यांनी ’राष्ट्रधर्म’ नावाचे मासिक काढले. पुढे ’पांचजन्य’ व ’स्वदेश’ या वृत्तपत्राची स्थापना केली.
1951 सालामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जींनी ’भारतीय जनसंघ’ स्थापन केला, तेव्हा पंडितजी प्रत्यक्ष राजकीय जीवनात उतरले. भारतीय जनसंघाची त्यांच्यावर जबाबदारी आली, ते पक्षाचे सरचिटणीस बनले. एका राजकीय पक्षाची संघटनात्मक जबाबदारी त्यांनी अतिशय कष्टपूर्वक पार पाडली. त्यांच्या कार्याविषयी बोलताना श्यामाप्रसादजी म्हणाले : "If I had two Deendayals, I could transform the political face of India."
समरसतेचा व्यवहार करणारे पंडितजी
दीनदयाळजी अजातशत्रू होतेच. अद्वितीय बुद्धिमत्ता, निष्कलंक चारित्र्य आणि प्रेममय आचरणातून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला. त्यांना कष्टकर्यांविषयी कळवळा होता. हातावर पोट असलेल्यांची ते काळजी घेत. प्रवास करताना रेल्वे स्टेशनवर आलेल्या कार्यकर्त्यांना ते सामान घेऊ द्यायचे नाहीत. ते म्हणायचे, “हमाल बंधूला सामान उचलून द्या. कारण, त्यांची रोजी-रोटी त्यावरच अवलंबून असते, त्यांना हमाली मिळू द्या.“ एकदा ते केस कापण्यासाठी केशकर्तनालयात गेले, तिथली गर्दी बघून ते परत वळले. पुढे एका झाडाखाली बसलेल्या नाभिक बंधूकडून केस कापून घेतले. काहींना त्याचे आश्चर्य वाटले. निरलस, साधे असलेले पंडितजी म्हणाले, “त्याला गिर्हाईकाची गरज होती अन् मला वेळेची. आम्हा दोघांची सोय झाली. त्याला पैसे मिळाले, माझा पण वेळ वाचला.”
प्रामाणिकतेचे दर्शन
पंडितजी नेहमी रेल्वेप्रवास करताना पॅसेंजरने किंवा तिसर्या वर्गाने करत. प्रवासात एकदा त्यांची श्रीगुरुजींसोबत भेट झाली. ते प्रथम वर्गातून प्रवास करत होते. त्या दोघांनी सुमारे दोन तास वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. नंतर, त्यांना जिथे उतरायचे होते, तिथे उतरून पहिल्यांदा स्टेशनमास्तरला भेटले. तिसर्या वर्गाचे तिकीट असूनही मी प्रथम वर्गातून प्रवास केला, त्याचे योग्य ते भाडे मला तुम्हाला द्यायचे आहे.
मी सरकारचे नुकसान करणार नाही. विनातिकीट प्रवाशांकडून दंड वसूल करणार्या स्टेशन मास्तरला आश्चर्य वाटले. पण, पंडितजींनी त्याला पैसे घेण्यास भाग पाडले. सामाजिक जीवनातील प्रामाणिकपणा जपणारे दीनदयाळजी होते. सद्यस्थितीत पंडितजींसारखे असे वर्तन दुर्मिळच म्हणावे लागेल.
संघ माझे घर...
एकदा एका पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी दीनदयाळजींना प्रश्न विचारला की, “काही कारणाने संघ आणि जनसंघ यांच्यामध्ये विरोध झाला तर, तुम्ही संघाला सोडून द्याल की जनसंघाला?” हे ऐकून त्यांनी त्या पत्रकाराला प्रतिप्रश्न केला की, “जर तुम्हाला जीवनात तुमचे ऑफिस किंवा घर सोडण्याचा प्रसंग आला तर तुम्ही काय कराल?” काही क्षणात तो पत्रकार म्हणाला, “यात आवडीनिवडीचा प्रश्न कसला? अर्थातच, मी नोकरी सोडेन पण, घर नाही.” त्यावर दीनदयाळजी म्हणाले, ’‘संघ माझे घर आहे.”
विशालहृदयी दीनदयाळजी
1967 सालच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या ऐन धामधुमीत संघाच्या हिवाळी शिबिरात दीनदयाळजी उपस्थित राहिले. त्यांना एका स्वयंसेवकाने प्रश्न विचारला, “या लोकसभा निवडणुकीत आपले कितीजण निवडणूक जिंकतील?” त्यावर त्यांनी उत्तर दिले, “साधारणपणे जवळपास पाचशेच्या आसपास निवडून येतील.” त्यांच्या उत्तराने तो अचंबित झाला. आता 13-14 खासदार आहेत. पण, नवीनच पक्ष असलेल्या जनसंघाचे इतके येतील? यावर विश्वास बसणे कठीण आहे. त्यावर, दीनदयाळजींचे उत्तर हे व्यापक हिंदुत्वाचे दर्शन घडवते. ते म्हणतात, ’‘अरे, तू मला प्रश्न संघाच्या शिबिरात विचारला आहेस. संघ सर्व हिंदूंचे संघटन करतो. त्यादृष्टीने जो निवडून येईल, तो हिंदू आपलाच आहे. त्यामुळे, मी पाचशेच्या आसपास येतील असे म्हणालो. पण, जनसंघाचा पदाधिकारी म्हणून माझे उत्तर असेल की, जनसंघाचे 34-35 खासदार निवडून येतील. त्यावेळच्या लोकसभेत जनसंघाचे 37 जण निवडून आले.”
सहकार हा जीवनविचार
देशभरात सहकार क्षेत्र अतिशय गतिमान होत आहे. पंडितजींच्या कार्याचा वारसा सांगणार्या भारतीय जनता पक्षाने आजवरच्या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा केंद्रात सहकार मंत्रालय निर्माण करून अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या क्षेत्राला नवसंजीवनी देण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीवर विलक्षण बुद्धिमत्ता, साधे व्यक्तिमत्त्व आणि नेतृत्व असलेल्या पं. दीनदयाळ उपाध्याय यांचे कृतिशील विचार आजही दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरले आहेत, हे निःसंशय! ते म्हणतात, “सहकार हा साम्यवादी आणि भांडवलवादी अर्थविचारांना दिलेला बंधुतेचा पाया आहे. बंधुभावाच्या कल्पनेने सर्वांनी एकत्र येऊन ’एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ असा भाव ठेवून काम करणे म्हणजे सहकार आहे. सहकार ही केवळ एक चळवळ नसून, तो एक अर्थविचार आहे आणि जीवनविचार आहे.”
एकात्म मानव दर्शन
पंडितजी तत्वचिंतक होते. हिंदुत्वाचा इतिहास व भवितव्य यांचा विचार करताना पंडितजींनी ’एकात्म मानवतावाद’ हा मूलभूत सिद्धांत मांडला. आजही, भारतीय जनता पक्षाची विचारधारा याच सिद्धांतावर आधारित आहे. दीनदयाळजी काम करत असताना, जगावर साम्यवाद आणि भांडवलशाही या दोन विचारांचा मोठा प्रभाव होता. त्यामुळे, जगाची विभागणीही या दोन परस्परविरोधी विचारांत झाली होती. माणूस हा केवळ आर्थिक प्राणी म्हणून, त्याच्या आर्थिक गरजा भागवणे, एवढाच विचार केला जात होता. आपल्याकडे या दोन्ही विचारप्रवाहांचे आकर्षण होते. त्यातूनच, आपले प्रश्न सुटतील असे मानून त्याप्रमाणे, धोरणे आखली जात होती.
माणसाचे शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा या चार गोष्टींचा स्वतंत्रपणे विचार न करता, त्यांचा एकत्रितपणे विचार केल्यास व या चारही अंगांच्या योग्य गरजा पूर्ण होऊन विकास झाल्यावर त्याचे कल्याण होईल, त्याचे जीवन सुखी, समाधानी आणि आनंदमयी होईल. हाच विचार पुन्हा एकदा समाजापुढे आणण्यासाठी ते म्हणतात, “आपल्या समाजात केवळ अतिरेकी स्वातंत्र्य आणि अतिरेकी समता या कल्पना कल्याणकारी ठरू शकत नाही. त्यांना कल्याणकारी करायचे असेल, तर त्या दोन्हीलाही बंधुतेचा आधार देणे गरजेचे असते. हा तिसरा पर्याय म्हणजेच, ‘एकात्म मानवतावाद.’ यामध्ये व्यक्ती जीवनाचा सर्वांगीण आणि संकलित विचार केला आहे. यामध्ये भौतिक उन्नतीबरोबरच नैतिक व आध्यात्मिक उन्नतीही अपेक्षित आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थाचा आदर्श ठेवून, पालन केल्यास सर्व समाजाची योग्य धारणा होऊन एक सुखकर, स्वास्थ्यकारक आणि आनंददायक समाज उभारला जाईल, यासाठी ते झटतात.” त्यासाठी, त्यांनी मुंबईमध्ये चार व्याख्याने दिली. ’भारतीय चिंतन व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी हे एकमेकांना परस्परपूरक असून या सर्वांमध्येच एक चैतन्य आहे,’ असा महत्त्वाचा विचार त्यांनी मांडला.
प्रखर राष्ट्रनिष्ठेचे दर्शन
दीनदयाळजींची वयाच्या अवघ्या 51व्या वर्षी रेल्वेप्रवासात हत्या झाली. मृत्यूच्या काही दिवस आधी कोझिकोड येथे शेकडो कार्यकर्त्यांसमोर बोलताना ते म्हणाले होते : ""We are pledged to the service not of any particular community or section but of the entire nation. Every countryman is blood of our blood and flesh of our flesh. We shall not rest till we are able to give to everyone of them a sense of pride that they are children of Bharatmata. We shall make Mother India 'sujala, suphala' in the real sense of these words. 'Dashapraharana Dharini Durga' with her ten weapons, she would be able to vanquish evil; as 'Lakshmi,' she would be able to disburse prosperity all over and as 'Saraswati,' she would dispel the gloom of ignorance and spread the radiance of knowledge all around her. With faith in ultimate victory, let us dedicate ourselves to this task.'' यातून पंडितजींची राष्ट्रनिष्ठा व स्वदेश प्रीतीचे प्रखर दर्शन घडते. त्यांच्या निधनानंतर अटलबिहारी वाजपेयीजी म्हणतात, ‘’नन्हादीप बुझ गया, हमें अपना जीवन-दीप जलाकर अंधकार से लडना होगा। सूरज छिप गया, हमें तारों की छाया मे अपना मार्ग ढुंढना होगा!”
डॉ. सुनील भंडगे
(लेखक अध्यासन प्रमुख, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहेत.)