मुंबई : अकोला येथे ईदच्या मिरवणुकीत औरंगजेब आणि दहशतवाद्यांचे फलक झळकावल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याविरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
भारताला गुलामीत ठेवलेले सुलतान आदर्श असल्याचे अकोल्याच्या ईदच्या जुलूसमध्ये दर्शविण्यात आले. भारताशिवाय जगात जे इस्लामिक कट्टरवादी म्हणून नावारूपास आले, त्यांचे फलकही झळकावण्यात आले. जुलूसच्या मार्गावर अल्जेरियन गुन्हेगार, इस्लामिक कट्टरपंथी हमजा बेंडेलादाज याचे पोस्टर होते. हमजावर अमेरिकेतील २१७ बँक आणि वित्तीय संस्थांमधील खासगी खाती हॅक करीत लाखो अमेरिकी डॉलर्स चोरल्याचा आरोप आहे. ‘लॉयन ऑफ अल्जेरिया’ लिहून हमजा बेंडेलादाज या जिहादी गुन्हेगाराचे पोस्टर ठिकठिकाणी लावण्यात आले होते. हमासचा प्रवक्ता अबू आबेदा याचे पोस्टर ‘रियल हिरो’ म्हणून नाचवले जात होते.
लिबियातील कट्टर ओमर अल मुख्तार, भारतावर सहावेळा आक्रमण केलेला आणि पानिपतमध्ये मराठे ज्याच्याशी लढले तो अहमद शाह अब्दाली, गुजरातमार्गे ज्याने भारतावर आक्रमण केले आणि पृथ्वीराज चव्हाण ज्याच्याशी लढले, तो शहाबुद्दीन मोहम्मद घोरी अशा परकीय आक्रमकांच्या तस्वीरी जुलूसच्या मार्गावर लावण्यात आल्या होत्या. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीने एकगठ्ठा मतदानासाठी सुरू केलेल्या मुस्लीम अनुनयाचे पडसाद गंभीर आणि चिंताजनक स्वरूपात महाराष्ट्रात उमटत असून, अकोल्यात ईदच्या मिरवणुकीत ज्यांच्या तस्वीरी नाचवल्या गेल्या, ते देशहितासाठी घातक आहे. या जिहादी मानसिकतेचे महाविकास आघाडी समर्थन करणार काय, असा सवाल भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी उपस्थित केला आहे.
ही तर जिहादी मानसिकता !
भारताला गुलाम बनवलेल्या परकीय आक्रमकांना स्वतःचे पूर्वज म्हणून गौरवण्याची जिहादी मानसिकता अकोल्यात पाहायला मिळाली. या मिरवणुकीचे रील महाराष्ट्रात इतरत्र प्रसारित होत आहेत. अफगाण एम्पायर आणि पॅलेस्टाईनच्या ध्वजाचा गौरव कशाचे द्योतक आहे? जगभरातील दहशतवादी व त्यांच्या संघटना भारतातील मुसलमानांचे प्रेरणास्थान असणे, ही मोठी धोक्याची नांदी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात सुलतान औरंगजेब ऑर्गनायझेशनच्या नावाखाली ईद साजरी करणे चिंताजनक आहे.
- शिवराय कुळकर्णी, प्रदेश प्रवक्ते भाजप