देवयानीची ‘योग ऊर्जा’

24 Sep 2024 20:44:49
devyani mandvagne


योग आणि अध्यात्माच्या संगमातून शरीराचे, मनाचे सामर्थ्य वाढावे यासाठी प्रयत्न करत, अनेकांना जसा आहे, तसा योग शिकवणार्‍या देवयानी एम यांच्याविषयी...

'योगः कर्मसु कौशलम्।’ हे वचनच योगसाधनेचे महत्त्व पटवून देण्यास पुरेसे. सर्व क्रियांमध्ये योग ही सर्वश्रेष्ठ क्रिया आहे, असा या वचनाचा अर्थ. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात माणूस स्वत:कडे लक्ष देणे टाळतो. कालांतराने त्याचे विपरित परिणाम आपल्याला दिसून येतात. निर्दोष शरीर आणि त्याबरोबरच सशक्त मन निर्माण करायचे असेल, तर योग महत्त्वाचा! हाच ध्यास घेऊन पुण्यामध्ये देवयानी एम या योग प्रशिक्षण वर्ग चालवत आहेत.

देवयानी यांचा जन्म सांगलीचा असला तरी, त्यांचे संपूर्ण बालपण हे पुण्यातच गेले. घरामध्ये आई, वडील आणि भाऊ असे त्यांचे कुटुंब. देवयानी यांच्या घरातील वातावरण अभ्यासाला जेवढे पोषक, तेवढेच मुलांनी अभ्यासापलीकडे देखील काही अनुभवावे, यासाठीही पालकांचा सदैव पाठिंबा. लहानपणापासून देवयानी मैदानावरच जास्त रमल्या. अ‍ॅथलिट असलेल्या देवयानी शाळेमध्येच असताना अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झाल्या. पुढे त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात उच्च शिक्षण पूर्ण केले. पण, ते करताना खेळ आणि शारीरिक तंदुरुस्ती याला त्यांनी कधीच अंतर पडू दिले नाही.

देवयानी यांच्या घरातील वातावरण हे अतिशय अध्यात्मिक. आईवडिलांचे अध्यात्म श्रवणाचे लहानपणापासूनचे संस्कार असल्याने, अध्यात्मावर भाष्य करणारी अनेक पुस्तकेदेखील लहानपणापासूनच त्यांच्या वाचनात आली. त्यामुळे योग हा विषय अगदी लहानपणीच त्यांच्या आयुष्याशी परिचित झाला होता. योग म्हणजे साधारणत: आसनांचा सराव, असा सर्वसामान्यांचा समज. मात्र, ’योगश्चित्तवृत्तिनिरोधः’ म्हणजे योग हा चित्तातील अशांत वृत्तींना शांत करतो आणि असे शांत चित्तच आपल्याला योग्य मार्गदर्शन करु शकते, असे अध्यात्म सांगते. हेच देवयानी यांना लहानपणापासून अध्यात्माच्या संगतीने शिकायला मिळाले आणि तिथूनच त्यांच्या योगसाधनेशी ओळख व्हायला सुरुवात झाली.

त्यामुळे जेव्हा जीवनात काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा आपसूकच देवयानी यांच्या मनाने योगसाधनेचा प्रसार करण्याबाबत कौल दिला. मात्र, फक्त शारीरिक सामर्थ्य यावर लक्ष न देता, मानसिक आणि शारीरिक यांच्या एकत्र सक्षमीकरणासाठी काही केले पाहिजे, याचा देवयानी यांच्या मनाने ठाव घेतला. क्रीडाक्षेत्राचा अनुभव त्यामुळे शारीरिक तंदुरुस्तीचे असलेले ज्ञान, तर अध्यात्मिक पार्श्वभूमी असल्याने मनावरच्या संस्काराचा प्रश्न सुटला होता.

सुभूमी आणि उत्तम कण
परि उगवेना पर्जन्येविण
नुसते जमीन आणि बियाणे चांगले असून चालत नाही, तर त्यासाठी चांगला पाऊसदेखील पडावा लागतो, तेव्हाच पिके उगवतात. तशीच, अवस्था देवयानी यांची होती. देवयानी यांच्यापाशी या क्षेत्राचे आवश्यक ज्ञान होते, पार्श्वभूमीही चांगली होती, यावर देवयानी यांच्या कष्टाचा पाऊस पडायला सुरुवात झाली. त्यानंतर अध्यात्म आणि योगासने यांच्या एकत्रिकरणातून मन आणि शरीर यांच्या सशक्त विकासाचा कार्यक्रम हाती घेऊन, देवयानी यांनी 2020 साली पुण्यातील कोथरूड येथे ’देवयानी’ज योग ऊर्जा’ या स्टुडिओची स्थापना केली. ’देवयानी’ज योग ऊर्जा’च्या माध्यमातून देवयानी व्यक्तीगत आणि समूहांनाही योग साधनेचे प्रशिक्षण दिले जाते. पुण्याबरोबरच, पुण्याबाहेर अगदी परदेशी नागरिकदेखील देवयानी यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने योग प्रशिक्षण घेतात. त्यांच्या स्टुडिओमध्ये फक्त आसने करुन घेण्यावरच भर दिला जात नाही, तर देवयानी यांच्या शिकवण्यामध्ये तत्वज्ञानाची जोड असते. त्यामुळे अनेक मोठ्या कंपनीदेखील आज देवयानी यांच्याशी जोडल्या गेल्या आहेत. तसेच, देवयानी अनेक मोठे उद्योजक, कलाकार यांनाही योगाचे धडे देतात. तसेच त्यांच्या स्टुडिओच्या माध्यमातून ’योग थेरपी’, समुपदेशनदेखील केले जात असून, ज्यांना काही शारीरिक-मानसिक व्याधी अथवा विकार आहेत, अशा रुग्णांना याचा खूप फायदा होतो.

“एका ठराविक काळानंतर जबाबदार्‍या माणसावर आल्या की, त्या पाठोपाठ अनेक अडचणी, त्यांच्या माध्यमातून निर्माण होणारे ताणतणाव यांची मालिका सुरु होते. त्यामुळे या शरीराच्या सुदृढतेसाठी जे करणे आवश्यक आहे, ते प्रत्येकाने केलेच पाहिजे. मात्र, त्याचबरोबर मनाच्या आनंदासाठीही सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. ही मनाची प्रसन्नताही योगसाधनेतून मिळू शकते,” असे देवयानी सांगतात. ‘’सातत्याने सुखाच्या उपभोगाची मर्यादा ही शरीराच्या पातळीवरच संपते. मात्र, आनंदलहरी आत्म्याला संतुष्ट करतात,” असेही देवयानी सांगतात.

सध्या योग प्रशिक्षणार्थींची देवयानी यांच्याकडील वाढणारी संख्या लक्षात घेता, सध्या त्या एका नवतंत्रज्ञानावर आधारित प्रयोगावार कार्य करत आहेत. प्रत्यक्षात जाऊन प्रत्येकाला शिकवणे याला खूप मर्यादा येतात. तसेच, ऑनलाईन पद्धतीने एकाचवेळी अधिक लोकांपर्यंत पोहोचता यावे, यासाठीची यंत्रणा त्या उभारत आहेत. आजकाल योग हा ही एक व्यायामप्रकार झाला असून, त्यामुळे योगसाधनेतील अनेक बाबींकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे त्याच्यापासून होणार्‍या फायद्यांना मुकावे लागत आहे. तसे होऊ नये, म्हणूनच जसा योग आहे, तसा तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य देवयानी करत आहेत. त्यांच्या या योगसाधनेच्या कार्यात अशीच वृद्धी होत राहो, याच दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
(अधिक माहितीसाठी संपर्क - 7798930608)

कौस्तुभ वीरकर 
Powered By Sangraha 9.0