माणूस म्हणावे का?

24 Sep 2024 21:07:50
badlapur sexual harrasement case accused encounter 

बदलापूरच्या संतापजनक घटनेतील गुन्हेगार अक्षय शिंदे परवा गोळीबारात ठार झाला. शालेय बालिकांवर अत्याचार करणार्‍या गुन्हेगार मेला तर, त्या गुन्हेगाराच्या मृत्यूबद्दल प्रश्न विचारायला सर्वात पुढे कोण? तर, उद्धव ठाकरे यांच्या विश्वासू सुषमा अंधारे. अंधारे आणि त्यांच्यासारख्याच लोकांना त्या निष्पाप बालिकांवर झालेल्या अत्याचाराचे काही सोयरसुतक नाही. कारण, गुन्हेगाराच्या मृत्यूने झालेल्या दैवी न्यायातही यांना त्यांना राजकारण शोधायचे आहे. गुन्हेगाराचा मृत्यू झाल्यावर प्रश्न उपस्थित करणार्‍या सुषमा आणि त्यांच्या समविचारी नेत्यांचे माणूसपण कुठे गेले? सुषमा यांनी तर पोलीस यंत्रणेवरच प्रश्चचिन्ह उपस्थित केले आहे. ‘व्होट जिहाद’च्या माध्यमातून सत्तेवर येण्याची हिरवी स्वप्ने पाहणारे हे सत्तापिपासू लोक. यांना केवळ भाजप सत्तेत आहे, म्हणून विरोधासाठी विरोधच करायचा आहे. नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, ’माणसाने श्वासोच्छवास करणे गरजेचे आहे, तर हे लोक माणसाने श्वासोच्छवास का करू नये, असे म्हणणायला पुढे सरसावतील.” इतके टोकाचे विद्वेषी राजकारण त्यांच्यात आहे. असो. तर, सुषमा अंधारेंचे याबाबत म्हणणे काय? तर, म्हणे ’बदलापूरच्या घटनेतील शाळेच्या पदाधिकार्‍यांना अटक करावी.’ घटनेतील गुन्हेगार पुराव्यासहित सापडल्यावरही सुषमा शाळेच्या पदाधिकार्‍यांना अटक करा, असे का बोलत असतील? काही लोकांचे म्हणणे आहे की, सुषमा अंधारे यांचा इतिहासच जातीयवादी बोलण्याचा आहे. शालेय समितीच्या ज्या पदाधिकार्‍याचे नाव सुषमा घेतात, ती व्यक्ती केवळ जन्माने ब्राह्मण आहे. म्हणूनच, सुषमा अंधारेसारखे लोक त्यांचा दुस्वास करत आहेत, असे असेल तर खूपच वाईट आहे. या अनुषंगाने अंधारे बाईंचाच काय? कुणीही कुणाचा दुस्वास केवळ त्यांच्या जातीवरून केला असता तरी, मी हेच म्हणाले असते की, जातीवरून एखाद्या व्यक्तीचा आणि त्या व्यक्तीच्या संस्थेचा दुस्वास का करायचा? ही जातीयता नाही का? अशी जातीयता जोपासणार्‍या सुषमा अंधारेबाई या उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या ‘थिंकटँक’ आहेत? देवाच्या काठीचा आवाज येत नाही, पण तडाखा जबदरदस्त असतो. त्यानुसार, चिमुरड्यांवर अत्याचार करणार्‍या नराधमाचा मृत्यू झाला. सगळा महाराष्ट्र नव्हे, देश समाधानी झाला. पण, अंधारेंसह विरोधी पक्षातील नेत्यांना गुन्हेगाराच्या मृत्यूचेे प्रश्न पडले? या सगळ्यांना माणूस म्हणावे का?

संवेदना मेल्या...

बदलापूरच्या संतापजनक घटनेतील गुन्हेगार अक्षय जिवंत असता तर, काही लोकांना त्याचे राजकारण करता आले असते. मात्र, तसे होणे त्या गुन्हेगाराच्या आणि विरोधी पक्षाच्या नशिबात नव्हते. गुन्हेगाराने पोलिसांची बंदूक हिसकावली आणि स्वसंरक्षणार्थ पोलिसांना त्याच्यावर गोळ्या झाडाव्या लागल्या. ’त्याला इतके साधे मरण यायला नकोच होते. आयुष्यभराच्या यातना, दु:ख त्याला भोगले असते, मृत्यूची भीक मागत तो तडफडला असता तर, आणखीन चांगले झाले असते,’ अस समाजाचे मत आहे. त्या गुन्हेगाराच्या मृत्यूमुळे समाजात दैवी न्यायाच्या चर्चा रंगल्या. कारण, ‘निर्भया’ बलात्कार प्रकरणातील आरोपींचे काय झाले? तसेच, श्रद्धा वालकरच्या खुन्याचे म्हणजे, आफताब पुनावालाचे काय झाले? हे समाजाने पाहिले आहे. संविधानाच्या चौकटीत पीडितांना न्याय मिळतोच. मात्र, तरीही या न्यायाची कार्यवाही होताना विलंब होताना दिसतो. समाजाचा स्वभावच विसराळू आहे. अशा क्रूर घटना घडल्या की, काही दिवस मोर्चे, आंदोलन वगैरे करून मग अशा घटना विसरल्या जातात. समाजाला वाटत असते, अशा क्रूर गुन्हेगारांना तात्काळ भर चौकात फाशी द्यावी किंवा गुन्हेगाराला लोकांच्या ताब्यात द्यावे. पण, हे कायद्याच्या चौकटीत शक्यच नाही. या सगळ्यामुळे समाजात संभ्रम निर्माण झालेला असतो की, गुन्हेगारांना सजा लवकरात लवकर होणार की नाही? या पार्श्वभूमीवर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षयवर गोळ्या झाडल्या. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच तो मेला. समाजाने या घटनेचे स्वागतच केले. पण, समाजाने स्वागत केले, म्हणून काही लोकांच्या पोटात लगेच आगडोंब उसळला. पोलिसांनी त्याला मुद्दाम मारून टाकले, त्याचा एन्काऊंटर केला, असे म्हणत तेच ते ठराविक कोंडाळे कोल्हेकुई करू लागले. हो, काँग्रेसच्या राजकुमार प्रियंका गांधी यांनीही गुन्हेगाराविरोधातील पोलीस कारवाईची चौकशी करण्याचे नुकतेच म्हटले आहे. काय म्हणावे? गुन्हेगाराचा मृत्यू या सगळ्यांच्या जिव्हारी का लागला? त्याच्या अत्याचारापेक्षा त्याचा मृत्यू या राजकारण्यांना भयानक वाटला? गुन्हेगाराच्या मृत्यूने दाखवून दिले की, विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या संवेदनाही मेल्या आहेत.

9594969638
Powered By Sangraha 9.0