बदलापूर प्रकरणात काय घडलं? A to Z माहिती...

    24-Sep-2024
Total Views |

akshay
 
 
 
मुंबई : “बदलापूर अत्याचार घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांवर गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोळी झाडली. यामध्ये या आरोपीचा मृत्यू झाला,” अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, दि. २३ सप्टेंबर रोजी दिली.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,“आरोपीच्या पूर्व पत्नीने लैंगिक अत्याचाराची तक्रार केली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी वॉरण्ट घेऊन त्याला चौकशीसाठी नेण्यात येत होते. या आरोपीने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक हिसकावून घेत पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्याने हवेतही गोळीबार केला. यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ आरोपीवर गोळीबार केला. या आरोपीला दवाखान्यात नेण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, या आरोपीचा मृत्यू झाला आहे.” पुढे विरोधकांचा समाचार घेत फडणवीस म्हणाले, “विरोधक प्रत्येकच विषयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. याच विरोधकांनी वारंवार मागणी केली की, आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी. मात्र, हेच विरोधक पोलिसांवर गोळीबार झाल्यावर स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. अशाप्रकारे यावरून विवाद करणे चुकीचे आहे.” दरम्यान, अ‍ॅड. असीम सरोदे उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहेत.

नेमके काय घडले?
अक्षयच्या पहिल्या पत्नीने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात चौकशीसाठी बदलापूर पोलीस अक्षयचा ट्रान्झिट रिमांड घेण्यासाठी तळोजा कारागृहात गेले होते. तळोजा कारागृहातून आरोपी अक्षयला घेऊन सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास पोलीस पथक मुंब्रा बायपासजवळ पोहोचले. यावेळी, शिंदे याने एका हवालदाराची बंदूक हिसकावून गोळीबार केला. यात साहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागली. दरम्यान, स्वसंरक्षणार्थ, दुसर्‍या पोलीस अधिकार्‍याने त्याच्यावर गोळी झाडली, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेले असता, त्यांचा मृत्यू झाला. तर, जखमी साहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे यांच्यावर ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, “अक्षय शिंदे हा आरोपी बदलापूरमधील लहान मुलीवर अत्याचार प्रकरणात कोठडीत होता. या आरोपीच्या पत्नीनेही या आरोपीवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. आरोपीला तपासादरम्यान बाहेर आणल्यावर या आरोपीने एपीआय निलेश मोरे यांच्यावर गोळी झाडली. यामध्ये हे पोलीस अधिकारी जखमी झाले. अशावेळी पोलिसांनी बचावासाठी या आरोपीवर गोळ्या झाडल्या. निलेश मोरेंवरदेखील उपचार सुरू आहेत,” असे शिंदे म्हणाले.

नराधमाचा विरोधकांना इतका पुळका का?
बदलापूर प्रकरणातील हरामखोर आरोपीने स्वत:ला गोळी घालून घेतल्याची बातमी आताच समजली. सरकारने तत्काळ या प्रकरणात जे जे करता येईल, त्या सगळ्या गोष्टी केल्या; तरीही बदलापूर प्रकरणातआकांडतांडव करणारे उबाठाचे सटरफटर हे आता या प्रकरणात आरोपीला गोवण्यात येतंय म्हणून कांगावा करत आहेत. गोळी त्यानेच मारली की आणि कुणी मारली, वगैरे वगैरे, वा रे वाह काय म्हणावे आता या सटरफटरांसमोर सरडासुद्धा आत्महत्या करेल हो. त्याला जागच्या जागी फाशी झाली पाहिजे, अशी मागणी करणारे विरोधक आता चौकशीची मागणी करतात किती दुटप्पीपणा? आपल्या पोलिसांवर एखादा आरोपी हल्ला करीत असेल तर काय त्याची आरती करायची? बदलापूरच्या नराधमाचा विरोधकांना इतका पुळका का? की नुसते राजकारण करणार? राजकारण करणार्यांना या विरोधकांना लाज वाटली पाहिजे.
- चित्रा वाघ, भाजप, महिला प्रदेशाध्यक्ष

पोलिसांच्या पाठीशी उभे राहावे
बदलापूरमधील लहान मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांची बंदूक खेचून त्यांच्यावरच गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यावर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ प्रतिहल्ला केला. त्यात त्याचा मृत्यू झाला, हे छान झाले. पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न करून स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. त्याचा अंत झाला. यात आपण पोलिसांच्या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे.
- डॉ. रूपाली जोशी, सामाजिक कार्यकर्त्या, ठाणे

अशा मनोवृत्तींवर वचक आणावा
अशा प्रकारच्या गुन्हेगाराला इतक्या चांगल्याप्रकारे मरण यायला नको होते. चौकात उभे करुन येणार्‍या-जाणार्‍याकडून हाल करून जीव जाईपर्यंत सर्वांसमक्ष तडफडत तो मरायला हवा होता. तरच अशा मनोवृत्तीला जबरदस्त भीती वाटेल. पण एकाअर्थी या घटनेमुळे या केसमुळे वकिलांवर तसेच त्याच्यावरील तुरुंगात होणारा खर्च वाचला म्हणायचा.
- माधुरी श्रीकांत शेंबेकर, सामाजिक कार्यकर्त्या, मुलुंड

घटनेला राजकीय वळण देऊ नये
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्यावर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ हल्ला करून त्याला जागीच ठार केले. यात गैर काहीच नाही. या घटनेला राजकीय वळण देणार्‍यांनी आपली सदसद्विवेक बुद्घी वापरून बेताल वक्तव्ये टाळावी. आरोपीच्या अशा मृत्युमुळे त्या चिमुरडीला जलद न्याय मिळाला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
- अ‍ॅड. नेहा पाटील, कांदिवली