मराठा उत्कर्षाचे शिल्पकार अण्णासाहेब पाटील!

24 Sep 2024 20:04:29
annasaheb patil


मराठा उत्कर्षाचे शिल्पकार अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांच्या उत्कर्षासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे, म्हणून त्यांच्या समस्यांवर सरकार तथा सामान्य माणसाचे लक्ष वेधण्यासाठी पुढाकार घेतला. आज, दि. 25 सप्टेंबर रोजी अण्णासाहेब पाटील यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांच्या स्फूर्तिशील विचारकार्याचे स्मरण करणारा हा लेख...

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आ. अण्णासाहेब पांडुरंग पाटील यांनी मुंबईमधील विखुरलेल्या कामगारांना एकत्र करून त्यांच्या प्रगतीसाठी भरीव कामगिरी केली. त्यामुळे अण्णासाहेब पाटील यांना महाराष्ट्रात मराठा व माथाडी कामगारांच्या उत्कर्षाचे शिल्पकार म्हटले जाते. अण्णासाहेब पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा मावळा असलेला व महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक माणूस मराठा आहे, अशी विशाल व साधी सोपी मराठ्यांची व्याख्या केली. त्यातून माथाडी कामगार संघटना तथा अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना केली होती.

पाटण तालुक्यातील मंद्रूळकोळे गावामधून अण्णासाहेब मुंबईत आले. त्यांनी कामगार म्हणून आपल्या जीवनकार्याला सुरुवात केली होती. त्यावेळी मुंबईत कामगारांची अवस्था अत्यंत बिकट होती. तसेच मुंबईमधील बहुतांश कामगारवर्ग हा मराठा होता. कामगारांचा आर्थिक व सामाजिक उत्कर्ष झाला पाहिजे, असे त्यांना नेहमी वाटत असे. त्यांनी कामगारांचे प्रश्न व त्यांच्या समस्यांचा अभ्यास केला. कामगारांना संघटित करण्यास सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. कामगारांच्या प्रश्नावर त्यांनी सखोल अभ्यास करून संघटित प्रयत्न करण्यासाठी माथाडी कामगार संघटना स्थापन केली. ‘महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट’ आणि ‘जनरल कामगार युनियन’ (रजि.) ही कष्टकरी कामगारांची मोठी संघटना उभी केली. त्यावेळी कामगार क्षेत्रात केवळ कम्युनिस्ट संघटना होत्या. परंतु, त्यांनी कम्युनिस्ट विचाराला मूठमाती देऊन या मातीमधील सर्वंकष विचार मांडून कामगार संघटना स्थापन केली होती. कामगार हितासाठी मोर्चे, आंदोलन सुरू झाले. सरकार दरबारी कामगारांच्या मागण्या मांडल्या जाऊ लागल्या. कामगारांच्या मागणीचा सरकार दरबारी सकारात्मक विचार होऊ लागला. त्यातून अण्णासाहेब पाटील कामगारांचे आराध्यदैवत ठरले.


कम्युनिस्ट नव्हे, तर मातीमधील विचार मान्य

अण्णासाहेब पाटील यांनी जेव्हा माथाडी कामगार संघटना उभी केली, तेव्हा कामगारांच्या अनेक समस्या होत्या. श्रममूल्य, पुरेशा वेतनाचा अभाव, आरोग्य सुविधा आणि हक्क अशा समस्या होत्या. कामगारांचे प्रचंड शोषण व पिळवणूक होत होती. तसेच महाराष्ट्रात कम्युनिस्टांच्या ‘लाल बावटा युनियन’चा बोलबाला होता. परंतु. अण्णासाहेब पाटील यांनी कम्युनिस्टांच्या ‘लाल बावटा युनियन’ची मदत न घेता, प्रचंड मेहनत घेऊन या मातीसोबत इमान राखणार्‍या मराठी माणसांची कामगार संघटना उभी केली होती. त्यासाठी त्यांनी कामगारांच्या समस्या आणि हक्कांचा अभ्यास करून कामगारांच्या न्याय-हक्कासाठी लढा उभारला. माथाडी कामगार संघटनेची मुहूर्तमेढ रोवली. राज्य सरकारच्या दरबारी माथाडी कामगारांच्या व्यथा मांडून त्यांच्या हक्कांसाठी जीवाचे रान केले. अण्णासाहेब पाटील यांचा जन रेटा इतका प्रभावी होता की, तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण करून माथाडी संघटनेला शासकीय दर्जा प्राप्त करून दिला.दि. 5 जून 1969 रोजी महाराष्ट्रामध्ये माथाडी कामगार कायदा अस्तित्वात आला. त्यामुळे माथाडी कामगारांच्या जीवनात आनंदाचे क्षण येऊ लागले. माथाडी कामगार कायद्यामुळे नवी मुंबईमध्ये माथाडी रुग्णालय, माथाडी ग्राहक सोसायटी, सिडकोमार्फत घरे, उच्च शिक्षण, वैद्यकीय सेवा, पतपेढी अशा विविध सुविधांमुळे कामगार व त्यांच्या परिवारांचे जीवनमान उंचावले गेले. माथाडी कामगारांच्या कल्याणामध्ये अण्णासाहेब पाटील यांचे योगदान महत्त्वाचे होते.

 
मराठा आरक्षण मोर्चाचे जनक अण्णासाहेब

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. महायुतीचे सरकार सकारात्मक असतानाही, समाजात भेद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु, मराठा आरक्षणाचे जनक अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणाची मागणी करताना अवास्तव मागण्या किंवा सामाजिक वीण कधीही विस्कळीत होऊ दिली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात अण्णासाहेबांना आदराचे स्थान आहे. त्यांनी बहुतांश मराठा कामगार असलेल्या माथाडी कामगारांच्या कल्याणासाठी प्रचंड कष्ट घेतले. त्यांची प्रतिमा उभ्या महाराष्ट्रात निर्माण झाली होती. त्यांनी बारा बलुतेदार व अठरा पगड जातींना एकत्र करून मराठ्यांचे संघटन उभे राहावे, म्हणून अनेक संस्था संघटना आणि मंडळांना एकत्र आणले. ‘अखिल भारतीय मराठा महासंघा’ची स्थापना केली होती. अण्णासाहेब यांचे सक्षम व लोकप्रिय नेतृत्व लक्षात घेऊन त्यांची दि. 8 जुलै 1980 रोजी विधान परिषदेच्या सदस्यपदी नियुक्ती झाली होती. त्यावेळी मराठा समाजाला आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण मिळावे, अशी मागणी जोर धरत होती.

त्यावेळी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून आर्थिक निकषांवर मराठा आरक्षण मिळावे, म्हणून विधीमंडळावर मोर्चा काढण्याचा निश्चय केला. काँग्रेस सरकारमध्ये आमदार असताना अण्णासाहेब पाटील व अ‍ॅड. शशिकांत पवार यांच्या नेतृत्वात आझाद मैदान येथून शिवरायांचा भगवा हातामध्ये घेऊन दि. 22 मार्च 1982 रोजी विराट मोर्चा विधानसभेवर धडकला. या मोर्चातील हजारोंच्या जनसमुदायाने मुंबईकरांचे लक्ष वेधले. अण्णासाहेब पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांना नऊ मागण्यांचे निवेदन सादर केले. आरक्षण मागणीचा विचार होणार नाही, हे लक्षात येताच ‘मराठा समाजाला न्याय न मिळाल्यास आपण उद्याचा सूर्योदय पाहणार नाही,’ असे ठणकावून सांगितले. आपल्या प्रतिज्ञेनुसार त्यांनी दि. 23 मार्च 1982 रोजी जीवनयात्रा संपवून जगाचा निरोप घेतला.

अण्णासाहेब पाटील यांच्या जीवनकार्याचा विचार केल्यास किंवा मागोवा घेतल्यास असे लक्षात येते की, त्यांचे संपूर्ण आयुष्य समाजासाठी संघर्ष करण्यात खर्ची झाले होते. खर्‍या अर्थाने ते मराठा आरक्षणाचे जनक तथा मराठ्यांच्या उत्कर्षाचे शिल्पकार ठरतात. मराठा समाजच नव्हे तर सकल समाज त्यांच्या कार्यापुढे नतमस्तक आहे.भाजप,कोकण पदवीधर मतदारसंघाचा आमदार म्हणून समाजात वावरताना अण्णासाहेब पाटीलांचे भव्य कार्य मला नेहेमीच मार्गदर्शक वाटते. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन.

 निरंजन डावखरे
Powered By Sangraha 9.0