जगातील सर्वांत लहान देश असलेल्या व्हॅटिकन सिटीशी आपण परिचित आहोत. युरोप खंडातील या देशाचे क्षेत्रफळ अवघे 44 हेक्टर, म्हणजेच 108.7 एकर. लोकसंख्येबद्दल बोलायचे तर, येथे फक्त 800 लोक राहतात. ख्रिश्चनांचे पवित्र शहर म्हणून व्हॅटिकन सिटीची जगभरात विशेष ओळख. ख्रिश्चन धर्माशी संबंधित सगळे महत्त्वाचे निर्णय होतात, ते याच व्हॅटिकन सिटीतून. येथूनच रोमन कॅथलिक ख्रिस्ती धर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस आपले धार्मिक मत मांडतात.
मात्र, आता व्हॅटिकन सिटीच्या धर्तीवर इस्लामिक देश अल्बानियामध्ये नवे मुस्लीम राष्ट्र निर्माण करण्याचे प्रयत्न सध्या सुरू झाले आहेत. अल्बेनियाची राजधानी तिराना येथे हा वेगळा मुस्लीम देश स्थापन होणार असून, मुस्लिमांशी संबंधित प्रकरणे येथूनच हाताळली जाणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर हा देश सुफी बेक्ताशी मुस्लिमांना समर्पित ‘मायक्रोस्टेट’ असल्याचेही सांगण्यात आले आहे.
नवीन इस्लामिक देशाच्या निर्मितीनंतर हा जगातील सर्वात लहान देश ठरेल आणि त्याचे क्षेत्रफळ सर्वसाधारणतः न्यूयॉर्कच्या पाच ब्लॉक्सएवढे म्हणजेच अवघ्या 27 एकरमध्ये पसरलेले असेल, अशी माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या नव्या इस्लामिक देशात महिलांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य असेल. मुस्लीम महिलांना याठिकाणी त्यांच्या पसंतीप्रमाणे सर्व प्रकारची वेशभूषा परिधान करण्याचे स्वातंत्र्य असेल. त्यासोबतच त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे कुठलेही बंधन नसेल. येथील नागरिकांना मद्यप्राशन करण्याची विशेष सवलतदेखील उपलब्ध असेल. नवीन देशात स्वतःचे प्रशासन असेल, त्याच्या सीमा निश्चित केल्या जातील आणि लोकांना पासपोर्टदेखील दिले जातील.
वास्तविक, 65 वर्षीय मौलवी एडमंड ब्राह्मीमाज यांची ही कल्पना असून ते एक नवीन इस्लामिक देश निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एडमंड यांना याठिकाणी ’बाबा मोंडी’ म्हणून ओळखले जाते. मौलवी ब्राह्मीमाज यांनी यापूर्वी अल्बेनियाच्या सैन्यातही काम केले आहे. जगातील लाखो मुस्लिमांमध्ये ते प्रचंड लोकप्रिय आहेत. मौलवी एडमंड ब्राह्मीमाज यांच्या कल्पनेतून साकार होणार्या या नवीन देशास अल्बानियाच्या पंतप्रधानांनीही होकार दर्शविला आहे. अल्बानियाचे पंतप्रधान एडी रामा यांच्या म्हणण्यानुसार, ते लवकरच या नवीन देशाबाबत सविस्तर घोषणा करणार आहेत. ’आपल्या इस्लामचा उदारमतवादी चेहरा जगासमोर मांडता यावा यासाठी, आपण नवा मुस्लीम देश निर्माण करत आहोत,’ असे त्यांचे म्हणणे. नवीन देश सुफी परंपरेशी संबंधित ‘बेक्ताशी’ आदेशानुसार चालवला जाईल, ज्याची मुळे तुर्कीमध्ये सापडली असून, सध्या त्याचा तळ अल्बानियात आहे. शांततापूर्ण आणि सहिष्णू सहअस्तित्वाला चालना देणे आणि अल्पसंख्याकांना त्यांच्या धार्मिक पद्धतींवर स्वायत्तता प्रदान करणे, हे यामागचे कथित उद्दिष्ट आहे.
‘बेक्ताशी’ ही एक सुफी चळवळ आहे, जी तुर्कीच्या अनातोलिया प्रदेशात उदयास आल्याचे मानले जाते. याची स्थापना तेराव्या शतकात सय्यद मुहम्मद बिन इब्राहिम अता यांनी केली होती. ज्यांना ’हाजी बेक्ताशिया वली’ म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी कायम प्रेम आणि दयाळूपणाचा उपदेश केला. असे म्हणतात की, ‘बेक्ताशी’ समुदाय ईश्वरावरही विश्वास ठेवतात. जगात एकूण 57 मुस्लीमबहुल देश असताना बाबा मोंडी यांना व्हॅटिकन सिटीच्या धर्तीवर नवा मुस्लीम देश तयार करण्याची इच्छा का निर्माण झाली? याचाच अर्थ विद्यमान मुस्लीमबहुल देशांमध्ये ‘बेक्ताशी’ समुदायाला दुय्यम वागणूक दिली जाते का? असे वाटणे स्वाभाविक.
2023च्या जनगणनेनुसार, ‘बेक्ताशी’ समुदाय अल्बानियाच्या एकूण मुस्लीम लोकसंख्येच्या अंदाजे दहा टक्के आहे. या बेक्ताशींचेच ’बेक्ताशी जागतिक केंद्र’ आहे, जे अल्बानिया सरकार एक नवीन राष्ट्र म्हणून घोषित करण्याच्या तयारीत आहे. ‘बेक्ताशी’ समुदायाच्या अनेक प्रथा मुख्य प्रवाहातील सुन्नी-वहाबी इस्लामपेक्षा भिन्न आहेत. या समुदायाला सर्वसाधारणतः इस्लामिक कायद्यांत बर्याच गोष्टीत सूट देण्याबाबतीत ओळखले जाते. त्यामुळे व्हॅटिकन सिटीच्या धर्तीवर नवा इस्लामिक देश निर्माण होणार असेल, तर ते इस्लामचे अपयश म्हटल्यास वावगे ठरणार नाही.