मुंबई : कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय शो असलेला मराठी बिग बॉस सध्या चांगलाच चर्चेत आहे. पहिल्याच दिवसापासून घरातील सर्व सदस्यांनी घातलेले राडे प्रेक्षकांनी पाहात त्यावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. यंदाच्या सीझनमध्ये एकामागोमाग एक ट्विस्ट येतच गेले. आता सर्वात मोठा ट्विस्ट आणि मोठा निर्णय बिग बॉसच्या टीमकडून घेण्यात आला आहे. ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व यंदा १०० नाही तर ७० दिवसांमध्येच संपणार आहे. परंतु, या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात टीआरपी असताना अचानक असा निर्णय घेण्यात आल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
‘बिग बॉस’ने हा सीझन ७० दिवसांमध्ये संपणार असल्याची घोषणा सगळ्या सदस्यांसमोर २३ सप्टेंबरच्या भागात केली. यावेळी ‘बिग’ बॉस म्हणाले, “यंदाचा सीझन केवळ १० आठवड्यांचा असून, येत्या ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’चा महाअंतिम सोहळा पार पडेल” असं घरात जाहीर करण्यात आलं आहे.
महत्वाची बाब म्हणजे ज्यादिवशी मराठी
बिग बॉसचा ग्रॅड फिनाले होणार आहे त्याच दिवशी सलमान खानचे सुत्रसंचालन असणारा हिंदी बिग बॉसच्या १८ व्या पर्वाचा ग्रॅड प्रीमियर होणार आहे. रितेश देशमुख होस्ट करत असलेला 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनचा महाअंतिम सोहळा हा ६ ऑक्टोंबरला होणार असून त्याच दिवशी सलमान खान होस्ट करत असलेला 'हिंदी बिग बॉस'च्या १८ व्या सीझनचा ग्रँड प्रीमियरदेखील रात्री ९ वाजता होणार आहे. त्यामुळे इंडस्ट्रीत जरी मित्र असले तरी या दोन मित्रांची टक्कर होणार आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन शंभरऐवजी ७० दिवसांमध्ये संपवण्यामागे हिंदी बिग बॉस कारणीभूत ठरल्याच्या चर्चा सुरू आहेत. मेकर्सला दोन्ही ‘बिग बॉस’मध्ये क्लॅश नको असल्यामुळे जर का दोन्ही सीझन एकाच वेळी सुरू राहिले, तर प्रेक्षकवर्गदेखील विभागला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली. आणि त्याचमुळे मराठी बिग बॉसच्या पाचव्या पर्वाला ७० दिवसांत बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.